Wednesday, January 3, 2024




 चलो जम्मू .. !।

डोंबिवलीतील ‘हम ट्रस्ट’ कडून जम्मू आणि आसपासच्या राजौरी, पुंछ येथील  ‘विद्या भारती’ आणि ‘भारतीय शिक्षा समिती’ या संस्थांच्या मार्फत जे समजोपयोगी प्रकल्प चालविले जातात त्या प्रकल्पांना भेट देण्यासाठी ७ ऑक्टोबर २०२३ ते १४ ऑक्टोबर २०२३ असा दौरा आयोजित केला होता.. पावगीसाहेबांच्या सूचनेवरून मी या दौऱ्यात  सहभागी झालो आणि एक अतिशय छान अनुभव माझ्या पोतडीत जमा झाला, त्याचेच हे वर्णन ! आम्ही  १६ जण  होतो’

 सकाळी १०.१५ च्या विमानाने दुपारी १ च्या सुमारास जम्मूला पोहोचलो..तिथे कार्यरत असलेले संगीता आणि मनोज नशिराबादकर यांची भेट झाली आणि त्यांनी आम्हाला .’भारतीय शिक्षा समितीशी संलग्न असलेल्या ‘सेवा भारती’च्या कार्याची माहिती दिली.

वाघा बॉर्डर बहुतेक सर्वांना माहीत आहे पण सुचेतगड सीमा फारशी माहीत नाही. सुचेतगड येथे भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये केवळ तारेचे कुंपण आहे अर्थात सीमा सुरक्षा चोकी आहेच आणि वाघा सीमेवर ज्याप्रमाणे आपल्या जवानांचे  संचालन होते त्याचप्रमाणे येथेही अतिशय सुंदर संचालन होते, जवानांनी कमालीच्या कौशल्याने विविध प्रकार दाखवले एवढेच नव्हे तर लष्करातील  श्वान पथकही तिथे होते आणि दोन श्वानांनी सुंदर कसरती केल्या. हे सगळे पाहणे हा अवर्णनीय  आनंद होता. जम्मूतील सुप्रसिद्ध रघुनाथ मंदिर हे १८७३ मधील असून अतिशय देखणे आणि प्रचंड मोठे आहे. मंदिराच्या भिंतीवर काश्मीरच्या इतिहासासंबंधी सखोल माहिती असलेले फलक आहेत.

जम्मू येथे सर्वात महत्त्वाची भेट म्हणजे पंकजादीदी यांची. पकंजादीदी मूळच्या दक्षिण भारतातील पण फारच लहान वयात त्या नागपूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सहभागी झाल्या आणि समाजसेवेचे कंकण हाती बांधून संघाच्या आदेशावरून  जम्मूत काम करण्यासाठी आल्या आणि अनेक मुलांच्या त्या आई झाल्या. दहशतवाद्यांच्या गोळीबारात ज्यांचे पालक मारले गेले अशा अनेक मुलामुलींचे पालकत्व पंकजादीदी यांनी स्वीकारले आहे. “ अदिती सेवा प्रतिष्ठान” ही त्यांची संस्था असून त्यामार्फत त्या हे उदात्त कार्य करीत आहेत. त्या मुलांची केवळ राहण्याची व्यवस्था त्या करीत नाहीत तर त्यांच्या शिक्षणाची व्यवस्थादेखील त्या बघतात. आम्ही गेलो तेव्हा तिथे बारा तेरा जण होते आणि त्यात एम.ए. करणारी  एक मुलगी होती जिला लहानपणीच गोळी लागली होती. पायाभूत कार्य करणाऱ्या पंकजादीदी या एकट्याच नाहीत तर आणखीनही बरेच जण आहेत.

जम्मूपासून १९ किलोमीटर दूर भारत पाकिस्तान सीमेच्या आत पाच सात  किलोमीटर अंतरावर मुलींसाठी “दृष्टी” नावाचे  वसतिगृह होते, ७ ते १७ वयोगटातील जवळपास १९ मुली होत्या. या सर्व मुली जम्मूच्या आसपास राहणाऱ्याच पण आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील होत्या. या वसतिगृहात त्या मुलींची शिक्षणासह  व्यवस्था केली जाते. इथे कॉम्प्युटर रूम होती, मुलींना खेळण्यासाठी आत आणि बाहेर साधने होती, झोपण्यासाठी बंक बेड होते, मुख्य म्हणजे मोठ्या मुली लहान मुलींची काळजी घेतात. राजौरी येथेही अशा प्रकारचे मुलांचे वसतिगृह होते . एका अतिशय चुणचुणीत मुलीने आम्हाला या वासतिगृहाची सर्व माहिती सांगितली. एवढेच नव्हे तर प्रार्थनेची वेळ झाली तसे तिने अत्यंत नम्रपणे आपण आधी प्रार्थना करू असे सांगितले आणि क्षणात सर्व मुली प्रार्थनेला जमल्या.

अतिरेक्यांची जास्त भीती आणि दहशत असलेला भाग म्हणजे राजौरी आणि  पूंछ, तिथल्या डंगरी  या गावातील एका  शाळेला आम्ही भेट दिली. भारतीय शिक्षा समितीमार्फत चालविली जाणारी  ही  शाळा सर्व साधनांनी युक्त आहे,  प्रयोगशाळा, ग्रंथालय वगैरे सोयी आहेत; दहशत आहेच, पण तरीदेखील शाळा निर्धाराने सुरू आहे. कौशल्य विकास शिकवले जाते..  इथल्या शिक्षकांना अत्यंत कमी पगार आहे त्यामुळे शिक्षक मिळणे, दुर्गम प्रदेश या अडचणीतून निष्ठावान कार्यकर्ते शाळा नेटाने चालवीत आहेत.

या शाळेनंतर दोन कुटुंबांना आम्ही भेटलो. काही महिन्यांपूर्वी या दोन कुटुंबतील तीन तरुण मुलांना अतिरेक्यांनी समोरून गोळ्या घालून मारले होते. हे ऐकताना डोळ्यात पाणी  दाटले होते तर मनात संताप .. त्या कहाण्या ऐकताना अंगावर काटा येत होता..

राजोरी येथे नतमस्तक व्हावे असे एक ठिकाण म्हणजे बलिदान भवन!  १९४७ सलो फाळणी झाल्यावर या गावावर गुंडांनी हल्ला केला तेव्हा प्रतिकारात पुरुष मारले गेले आणि त्यांच्या स्त्रियांनी गुंडांच्या हाती लागू नये म्हणून विहिरीत जीव दिला , त्याची आठवण म्हणून इथे बलिदान स्तंभ उभारला  आहे, त्यावेळच्या दंगलीतील वाचलेली त्यावेळची एक मुलगी आता जवळपास ८५ वर्षांची आम्हाला  भेटली. तिला अजूनही सर्व आठवते.       

पूंछ येथील भारत पाकिस्तानी सीमारेषेवर पोहोचलो. दोन किलोमीटर दूर थांबलो होतो. या सीमारेषेवरून दोन्ही देशात स्थानिक मालाचा थोडाफार व्यापार चालतो. येणाऱ्या जाणाऱ्यांची  तपासणी येथे झाल्यावर त्यांना प्रवेश दिला  जातो.  ( LOC TRADE CENTER) सीमारेषेपासून थोड्या अंतरावर आजोटे युद्ध स्मृतिस्थळ आहे. अतिशय सुंदर बांधलेलें हे स्थळ  स्फूर्तिदायक आहे. आपली छाती अभिमानाने भरून येते.  तिथल्या मेघडंबरीत बसून आम्ही सावरकरांचे “जयोस्तुते “ हे मातृभूमीच्या  स्तवनाचे उच्च रवात  गायन केले. त्या स्थळावर उभारलेला भारतीय तिरंगा पाकिस्तानातूनही दिसतो!

इथल्या “रिवर व्यू” या हॉटेलमध्ये आम्ही उतरलो होतो त्याचे संबंधित रवी शर्मा हे इथले कार्यकर्ते आहेत. ते आमच्याबरोबर होते. त्यांचे बंधु सुधीर शर्मा यांनी आम्हाला “रोहित शर्मा मेमोरियल ट्रस्ट” येथे नेले. ज्यांच्या नावाने हा ट्रस्ट स्थापन केला आहे ते रोहित शर्मा हे अतिरेक्यांना कंठस्नान घालून हुतात्मा झाले होते. या ट्रस्टची स्थापना श्री अली आणि त्यांची पत्नी शाहिस्ता तबस्सुम यांनी केली असून इथे पंतप्रधान कौशल्य विकास योजना,   शिलाई शिक्षण दिले जाते. श्री अली यांना या कार्यासाठी अनेक वेळा धमक्या आल्या आहेत. तिथेच पुलित्स नदीच्या काठावर असलेल्या एक सेंटरवर काही मुली शिलाई काम शिकत होत्या. ती शिलाई मशीन्स हम ट्रस्टनेच दिलेली होती.

एक महत्त्वाचे ठिकाण म्हणजे आखरोट येथील विस्थापित  पंडितांची कॉलनी.! १९९० ला काश्मीरमधून विस्थापित झालेल्या पंडितांसाठी ही कॉलनी उभारण्यात आली होती. आम्हाला  त्या पंडितांपैकी काही जण भेटले, त्या कॉलनीच्या हॉलमध्ये एक फिल्म दाखविण्यात आली जी “काश्मीर फाइल्स “ पेक्षाही करूण  होती. ज्या पंडितांनी हे सर्व प्रत्यक्ष भोगले ती माणसे  आमच्या आसपास होती. त्यांची घरे त्यांच्या डोळ्यादेखत जाळली गेली, अत्याचार  केले गेले ; ते सर्व त्या फिल्ममध्ये होते ते पाहताना  अंगावर शहारे येतात.      

बाकी जम्मू आणि आसपासची बरीच मंदिरे रामेश्वर मंदिर, कृष्ण मंदिर, काशी विश्वेश्वर मंदिर,मार्गात लागलेली दोन सुंदर  प्राचीन शंकर मंदिरे, बुढा अमरनाथ, नवग्रह मंदिर असे सर्व [याहून तिथला सुंदर निसर्ग आणि मनाला चटका लावणारे वास्तव अनुभवले.

डोंबिवलीतील मनोज आणि संगीत नशिराबादकर दाम्पत्य मागील काही वर्षे तिथे कार्यरत आहे. जम्मू काश्मीरला भेट देणाऱ्या मंडळींनी विद्या भारती आणि भारतीय शिक्षा समिति यांनी चालविलेल्या कार्यासही आवर्जून भेट द्यावी.       

 

   .           .

 

 

 

 

 

Thursday, December 21, 2023



लेखनाचे सर्वच प्रकार मला आवडतात, म्हणून माझ्याकडून कादंबरी आणि कथालेखन आणि ललित लेखन झाले.

२०१९ मध्ये मेहता पब्लिशिंग हाऊस यांनी इंग्रजी कादंबऱ्यांचे अनुवाद करण्याची संधी दिली आणि

रॉबर्ट क्रेस यांच्या चार कादंबऱ्या मी अनुवादित केल्या. त्यानंतर मेहता पब्लिशिंग हाऊस यांनी पुनः एकदा एक मोठी संधी दिली; ती म्हणजे माध्यमतज्ज्ञ नलिन मेहता यांनी लिहिलेल्या

MODI – AND THE MAKING OF WORLD’S LARGEST POLITICAL PARTY  

THE NEW B J P ; या ८५० पृष्ठांच्या बृहत ग्रंथातील ६०० पृष्ठांचे अनुवाद करण्याची जबाबदारी सोपवली. आधी मी एवढे मोठे काम स्वीकारण्यास काहीसा अनुत्सुक होतो; परंतु माझी पत्नी अनघा हिने मला प्रोत्साहन दिले आणि, एक आव्हान’ म्हणून मी हे काम स्वीकारावे असे सांगितले. तिच्या आग्रहाखातर आणि प्रोत्साहनाने मी हे काम स्वीकारले.

रोज सकाळी ५.३०, ५.४० च्या दरम्यान माझे काम सुरू व्हायचे आणि दिवसभरात ते सुरूच राहायचे; मला लागणाऱ्या सर्व गोष्टी ती टेबलवर आणून द्यायची. ‘किती काम झाले’ याची रोजच चौकशी करायची एवढेच नव्हे तर मला कंटाळा येऊ नये म्हणून माझ्यासमोर बसून तीही ‘गजानन विजय’ गुरुचरित्र’ आणि ;श्रीपाद श्रीवल्लभ’ या मोठ्या पोथ्या स्व हस्ताक्षरात लिहीत बसायची. रात्री अकरापर्यंत हे काम चालायचे. साधारण चार महिने झाले आणि माझे अनुवादाचे  काम संपत आले होते आणि तिच्या पोथ्याही लिहून झाल्या असताना अचानक ती २ जुलैला आजारी  पडली आणि ६ जुलैच्या पहाटे तिचे दू:खद निधन झाले. माझ्यावर हा असह्य असा आघात होता पण त्यातून सावरून केवळ तीची इच्छा म्हणून मी अनुवादाचे काम पूर्ण केले आणि मेहता पब्लिशिंग हाऊस त्यांच्याकडे पाठवून दिले. आणि आज २० डिसेंबर २०२३ रोजी सुंदर रीतीने छापलेल्या या अनुवादाच्या  प्रती माझ्या हातात पडल्या.

जिच्या प्रोत्साहनाने हे काम स्वीकारले, जिने मला साथ दिली ती मात्र पूर्ण झालेले काम पाहायला आज नाही, ही खंत आणि सल माझ्या मनात कायमची राहील. अनुवंडकाचे मनोगत म्हणून ही साहित्यकृती

तिलाच अर्पण करण्याची माझी विनंती मान्य केली गेली आणि तशी अर्पण पत्रिका पुस्तकात आहे.    

सुरुवात करणारा शेवटपर्यंत नसावा, जीवनात अपूर्णता राहावी, हीच तर नियती !         

Tuesday, December 12, 2023

 




मध्यंतरी एक विडिओ बराच व्हायरल झाला  होता. मुंबईहून द्रुतगती मार्गाने पुण्याला जाताना खालापूर टोल नाक्यानंतर लागणाऱ्या मॉलमधील पुस्तकाच्या दालनाचा तो व्हिडिओ होता.

त्या व्हीडिओमध्ये मराठी  मालिकेतील एक अभिनेते श्री मिलिंद गवळी या मॉलमधील पुस्तकाच्या दालनासंबंधीची माहिती सांगून, असे आवाहन करीत होते की पुण्याला जाणाऱ्या लोकांनी आवर्जून या पुस्तक दालनाला  भेट द्यावी. असे सांगताना ते त्यांच्या हातातील चार पुस्तके दाखवत होते आणि त्यात मी अनुवादित केलेले “आर्ट ऑफ वोर “ हे   पुस्तक होते. तो व्हिडिओ माझ्याही पाहण्यात आला होता.

आता परवा ९ डिसेंबरला  मी माझ्या मुळीसह पुण्याला जाताना त्या मॉलमध्ये गेलो आणि मी लगेच व्हीडिओमध्ये दाखविण्यात आलेल्या पुस्तक दालनात गेलो. पूर्वी मी फक्त जिन्याच्या बाजूला असलेली पुस्तके चाळत असे पण या वेळेस वरच्या मजल्यावर गेलो. तिथे असंख्य पुस्तके होती ती. सर्व पुस्तके बघून झाल्यावर खाली आलो आणि तिथे पुस्तके विक्री करत असलेल्या  गृहस्थांची +वीरेन्द्र गुप्ता यांची ओळख करून घेतली. गुप्ताजी  केवळ पुस्तक विक्रेते नाहीत तर ते पुस्तकप्रेमीही आहेत आणि अनेक पुस्तकांची माहिती  त्यांना आहे. मी  व्हीडिओमाधील पुस्तकाचा अनुवादक  आहे असे कळल्यावर त्यांनी अत्यंत आदराने मला बसावयास सांगितले. माझ्या अन्य पुस्तकांची चौकशी केली . निघताना मी गुप्ताजींबरोबर फोटो  घ्यावा अशी विनंती केली तर त्यांनी मला श्रीमंद भागवद्गीतेची प्रत   भेट देताना फोटो काढावा असे सुचवले आणि तो फोटो घेतला गेला.

मित्रांनो, आपण अनेकदा जेव्हा कधी पुण्यास जाल तेव्हा  आवर्जून या मॉलमधील पुस्तक दालणाला भेआवर्जून  आणि पुस्तकपरेमी असलेल्या श्री वीरेन्द्र गुप्ता यांनाही भेटा.      






















Saturday, August 5, 2023

 आपल्याला नोंदी : अहमेदनगऱ् १

 

अहमदनगर या शहराशी माझा तसा कधी संबंध आला नव्हता. तो आला ‘कांकरिया कार्डक’ या

बालनाट्य क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेमुळे. या संस्थेने नुकतीच २५ वर्षे पूर्ण केली आणि त्या निमित्ताने त्यांना एक स्मरणिका प्रकाशित करावयाची होती आणि त्या स्मरणिकेच्या संपादनात साहाय्य आणि मुद्रित शोधन  करावे अशी विनंती माझे नगरकर मित्र जयंत एलुलकर यांनी केली आणि या निमित्ताने माझा नगरशी संबंध आला.

काना, मात्रा, वेलांटी नसलेले गाव अशी नगारची  एक ओळख आहे. तसेही ते गाव अत्यंत रुक्ष आहे असा माझा समज होता. प्रा. मधुकर तोरडमल, सदाशिव अमरापुरकर असे नाट्यकर्मी या गावाचे आहेत अशी ,माहिती होती.

‘रं ग मं च’ या स्मरणिकेचे काम करताना, त्यातील लेख वाचताना लक्षात आले की, कांकरिया करडकाचे डॉ. प्रकाश कांकरिया आणि डॉ. सुधा कांकरिया यांनी फार मोठे काम केले आहे. मागील पंचवीस वर्षे बालनाट्य स्पर्धा आयोजित करणे, तेही कोणाकडून आर्थिक साहाय्य न घेता ही खरोखरीच रंगभूमीची सेवाच म्हटली पाहिजे. मागील पंचवीस वर्षात निदान काही हजार कलाकार या रंगमंचावर येऊन गेले आहेत; आणि आज त्यातील अनेक जण विविध मालिकांतून तसेच हिंदी, मराठी चित्रपटांतून तसेच ओटीटी पटलावर, काही दिग्दर्शक म्हणून काही तंत्रज्ञ म्हणून  आपल्या कलेचे दर्शन घडवित आहेत. कांकरिया करंडकाच्या रंगमंचावर जी लहान पावले पडली त्यांचा मोठा ठसा पुढे कलक्षेत्रावर        

उमटला त्याचे सर्व श्रेय कांकरिया या कलासक्त दाम्पत्याला जाते. स्मरणिकेतील लेखातून

नगरच्या अनेक कलाकारांचा परिचय होतो. तसेच प्रकाश योजना, रंगभूषा, वेशभूषा, दिग्दर्शन, संहिता, सादरीकरण या अंगाने आणि एकूणच बालनाट्य चळवळीची, त्याच अनुषंगाने महाराष्ट्रातील बालनाट्य चळवळीचे अध्वर्यू रत्नाकर मतकरी, सुद्धा करमरकर, ग्रीप्स चळवळ अशी अनेक प्रकारची माहिती मिळते त्यामुळे ही स्मरणिका, संस्मऱणिका झाली आहे असेच म्हणावे लागेल. बालनाट्य चळवळीची विविधांगी माहिती आणि महाराष्ट्रातील बालनाट्य शिबिरे आणि स्पर्धा घेणाऱ्या संस्थांची सूची असल्यामुले या संस्मऱणिकेला एका संदर्भ ग्रंथाचे स्वरूप आले असून ऐतिहासिक दस्तऐवज म्हणूनही उल्लेख करता येईल.

महत्त्वाचे म्हणजे रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने कांकरिया दांपत्याने शहरातील १०१ कलाकारांचा सत्कार त्यांच्या घरी जाऊन केला आणि त्यांच्या प्रती समाजाला वाटणारी कृतज्ञता व्यक्त केली.

स्मरणिकेचे प्रकाशन ७ मे रोजी नगरच्याच माउली हॉलमध्ये अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत ज्येष्ठ कवी श्री फ. मु  शिंदे यांच्या हस्ते झाले.   

डॉ. सुधा  कांकरिया या स्वत: नृत्यांगना आहेत. सलग बारा तास शास्त्रीय नृत्य करण्याचा विकर्म त्यांच्या नावावर आहे. डॉ. प्रकाश आणि डॉ. सुधा  हे दोघेही नेत्रतज्ज्ञ आहेत आणि त्यांचा मुलगा आणि सूनही नेत्रतज्ज्ञ आहेत. आपल्या व्यवसायास अनुसरून ही मंडळी विनामूल्य शिबिरे आयोजित करतात. नगरसारख्या काहीशा रुक्ष वातावरण असलेल्या शहरात कांकरिया दांपत्याने कलेचे नंदनवन फुलविले आहे असेच म्हणावे लागेल.

आणि खरोखरीच अहमदनगरमध्ये कांकरिया दांपत्याने ‘साई बन’ येथे १०० एकर जमिनीवर नंदनवन उभे केले आहे. नगरच्या बाहेर १०० एकर जमीन १९९२ साली घेऊन, जिथे  शब्दश: माळरान होते ,

गवताचे पातेही नव्हते तेथे डॉ. प्रकाश यांनी औद्योगिक क्षेत्रातील सांडपण्यावर प्रक्रिया करून, सर्व जमिनीची यथायोग्य मशागत करून तेथे आज दाट झाडी असलेले जंगल, एक विस्तीर्ण तळे, त्यात नौका विहाराची सोय, झिपलाइन, ध्यानगृह, सूर्योदय आणि सूर्यास्त पाहण्याच्या जागा, कठपुतळीचा खेळ असे अनेक उपक्रम आहेत. या सर्व उपक्रमाचे म्हणजे  शुष्क माळरान ते आजचे ‘साई बन’ येथपर्यंतच प्रवास दर्शविणारी फोटो गॅलरीही तिथे आहे. मुख्य म्हणजे अतिशय सुंदर आणि उत्तम ध्वनि व्यवस्था असलेले देखणे अॅम्फी थिएटर आहे. आजूबाजूला पसरलेल्या निसर्गरम्य वातावरणात कोणत्याही कलाकाराला, कलावंताला इथे कार्यक्रम करायची इच्छा होईल. ८ मे २०२३ या दिवशी डॉ. प्रकाश आणि डॉ. सुधा यांनी, रौप्य महोत्सवाच्या आयोजनात सहभागी असलेल्या सर्वांच्या सन्मान साई बन येथेच केला आणि त्यानंतर स्वादिष्ट भोजनाचा रुचकर अनुभव, म्हणजे आईस्क्रीमवर विराजमान झालेली चेरीच! आवर्जून अनुभव घ्यावा असे हे साई बन आहे.

कांकरिया दांपत्याच्या कला आणि नाट्यप्रेमामुळे हे सर्व घडून आले आणि  जयंत येलुलकर यांनी हे घडवून आणले त्यांचे  आभार                    

                   

     

 नोंदी: अहमदनगर २

कांकरिया करंडकाच्या रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने अहमदनगर जाणे झाले. अहमदनगर येथे माझी आते बहीण डॉ. लीला गोविलकर राहतात. माझे पुण्यात अनेकदा जाणे झाले /होते पण पुण्यापासून जवळ असलेल्या नगरला जाणे झाले नाही आणि त्यामुळे डॉ. लीला गोविलकर यांची भेट कित्येक वर्षांत झाली नाही. आता कांकरिया करंडकाच्या निमित्ताने जातोय तर त्यांची भेट घ्यायचीच असं म्हणत त्यांना फोन केला आणि अपेक्षेप्रमाणे त्यांनीही अतिशय प्रेमाने त्यांच्याच बंगल्यात मुक्कामास  यायला सांगितले.

डॉ. लीला गोविलकर, वय वर्षे फक्त ८५ , ( म्हणून मी ‘अहो जाहो’ असा उल्लेख करतो )असूनही शारीरिक आणि बौद्धिकदृष्ट्या तेज, तल्लख ! त्याचाच अनुभव इथे मांडण्याचा प्रयत्न.

सकाळी त्यांच्या बंगल्यात पहिल्या मजल्यावर असलेल्या गोलाकार बाल्कनीत लीलाताईंशी गप्पा रंगल्या. आधी मुंबईत आणि नंतर अहमदनगरला अध्यापनाचे  काम करणाऱ्या लीलाताईंना  स. ग. मालशे, अ. का. प्रियोळकर यांच्यासारख्या गुरूंचे मार्गदर्शन लाभलेले. भाषा विज्ञान या विषयात त्यांनी डॉक्टरेट जरी केली असली तरी त्यांना सगळ्याच विषयात रस होता. त्यांच्या टेबलावर एकाच वेळेस तीन पुस्तकांची कामे पडलेली होती. लिहून झालेले बरेचसे फूलस्केप तिथे होते. लीलाताईंचे ‘ज्ञानेश्वरीचे वाङमयीन वैभव हे पुस्तक मी वाचले होते. तो धागा मनात ठेवून मी त्यांना म्हटले की “ ज्ञानेश्वरीवर मुकुंदराजांच्या विवेकसिंधुचा  काही अंशी परिणाम आहे असे तुम्ही म्हणता, यात ज्ञानेश्वरांना गौणत्व येत नाही का?” त्या म्हणाल्या “ नाही, तसे होत नाही, विवेकसिंधु आणि ज्ञानेश्वरीतील काही ओव्या यात निश्चितच साम्य आहे पण अभिव्यक्तीत फरक आहे , आणि तसेही मुकुंदराज आणि ज्ञानेश्वर यांच्यात जवळपास १०० वर्षांचे अंतर आहे, या दीर्घ काळात भाषेच्या सर्वच स्वरूपात आमूलाग्र बदल होतो “ आणखीन महत्त्वाचे विधान त्यांनी केले की अनेक साहित्यिक असो, धार्मिक असो, अशा साहित्यकृतीत लोकसाहित्याचा अंश असतोच! श्रवणीयता हा मौखिक साहित्याचा लक्षणीय गुण आहे.” अशा प्रकारे सुरू झालेली ही बौद्धिक चर्चा, अनेक वळणे घेत अनेक तास चालू होती. नामदेव हे खरे सर्वसामान्यांचे संत, ज्ञानेश्वरांच्या  समकालीन असलेले नामदेव, त्यांच्याकडे ज्ञानेश्वरांनी पुढारीपण देऊन टाकले. ज्ञानेश्वर हे काहीसे वरिष्ठ वर्गाशी जोडलेले तर नामदेव यांची सर्व सामान्य लोकांशी नाळ जुळलेली. शिवाय नामदेव हे संसारी होते, तुकाराम संसारी होते, संसारात राहून परमार्थ करता येतो, महदंबा, मुक्ताई , जनाबाई, चोखामेळा, कान्होपात्रा, रामदास अशी चर्चेची रंगत वाढत ती खांडेकर, फडके, जीवनासाठी कला की कलेसाठी जीवन हा वाद; तसेच आर्य हे भरतीयच होते, भारताच्या बाहेरून आलेले नाही, इंडो आर्यन भाषा, भाषेचे संक्रमण, अवेस्ता आणि ऋग्वेद यांच्या भाषेतील साम्य, एका विष्यवारून दुसरा विषय असे कितीतरी  थांबे घेत घेत मी दीड दिवस यथेच्छ बौद्धिक आनंद घेतला.

आपल्या मताविषयी लीलाताई ठाम असतात. एक दोनदा मी थोडेसे वेगळे बोलताच  त्यांनी त्यातील वैचारिक फरक उलगडून दाखविला. सध्या त्यांच्या हातातील तिन्ही प्रकल्प त्यांना वेळेच्या मर्यादेत पूर्ण करायचे होते. त्याविषयी त्यांनी माहिती सांगितली.

त्यांच्याशी बोलताना मला सारखी दुर्गाबाईंची  आठवण येत होती. त्याही बोलण्यात ठाम असत, एक वैचारिक, बौद्धिक करारीपणा त्यांच्या चेहऱ्यावर आणि त्या बोलत असताना जाणवत असे, तोच अनुभव मला लीलाताईंशी बोलताना आला.

“बौद्धिक चर्चेने पोट काही भरत नाही तेव्हा आता जेवायला चला” अशी प्रेमळ सूचना माझ्या सौने आणि पुतणीने  केली तेव्हा आम्ही उठलो. आणि पुन्हा जेवताना तास दीड तास गप्पा रंगल्याच.

त्यांचा निरोप घेऊन निघताना असे वाटले की हा ज्ञानाचा खजिना, स्त्रोत माझ्या इतक्या जवळ असताना मागील अनेक वर्षांत त्यांची माझी भेट झाली नाही. जवळपास २५/३० वर्षांपूर्वी ‘वर्णनात्मक भाषाविज्ञान’

या संदर्भ ग्रंथाचे प्रकाशन आमच्या आरती प्रकाशनातर्फे प्रकाशित झाले होते. त्यानंतर आताची ही भेट  ! खूप काही राहिले असल्याची खंत जाणवणारी आणि बरेच काही मिळाले याचे समाधान देणारी.!

निघताना त्यांनी मला त्यांची २०२१ आणि २०२२ मध्ये प्रकाशित झालेली दोन पुस्तके “जावे संतांच्या गावा’ आणि “संत नामदेव ::अंतरंग दर्शन” ही भेट म्हणून दिली. 

एका उत्तम भेटीची उत्कट आठवण घेऊन आम्ही परतलो.

सुरेश देशपांडे / डोंबिवली                                   

   नोंदी: अहमदनगर २

कांकरिया करंडकाच्या रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने अहमदनगर जाणे झाले. अहमदनगर येथे माझी आते बहीण डॉ. लीला गोविलकर राहतात. माझे पुण्यात अनेकदा जाणे झाले /होते पण पुण्यापासून जवळ असलेल्या नगरला जाणे झाले नाही आणि त्यामुळे डॉ. लीला गोविलकर यांची भेट कित्येक वर्षांत झाली नाही. आता कांकरिया करंडकाच्या निमित्ताने जातोय तर त्यांची भेट घ्यायचीच असं म्हणत त्यांना फोन केला आणि अपेक्षेप्रमाणे त्यांनीही अतिशय प्रेमाने त्यांच्याच बंगल्यात मुक्कामास  यायला सांगितले.

डॉ. लीला गोविलकर, वय वर्षे फक्त ८५ , ( म्हणून मी ‘अहो जाहो’ असा उल्लेख करतो )असूनही शारीरिक आणि बौद्धिकदृष्ट्या तेज, तल्लख ! त्याचाच अनुभव इथे मांडण्याचा प्रयत्न.

सकाळी त्यांच्या बंगल्यात पहिल्या मजल्यावर असलेल्या गोलाकार बाल्कनीत लीलाताईंशी गप्पा रंगल्या. आधी मुंबईत आणि नंतर अहमदनगरला अध्यापनाचे  काम करणाऱ्या लीलाताईंना  स. ग. मालशे, अ. का. प्रियोळकर यांच्यासारख्या गुरूंचे मार्गदर्शन लाभलेले. भाषा विज्ञान या विषयात त्यांनी डॉक्टरेट जरी केली असली तरी त्यांना सगळ्याच विषयात रस होता. त्यांच्या टेबलावर एकाच वेळेस तीन पुस्तकांची कामे पडलेली होती. लिहून झालेले बरेचसे फूलस्केप तिथे होते. लीलाताईंचे ‘ज्ञानेश्वरीचे वाङमयीन वैभव हे पुस्तक मी वाचले होते. तो धागा मनात ठेवून मी त्यांना म्हटले की “ ज्ञानेश्वरीवर मुकुंदराजांच्या विवेकसिंधुचा  काही अंशी परिणाम आहे असे तुम्ही म्हणता, यात ज्ञानेश्वरांना गौणत्व येत नाही का?” त्या म्हणाल्या “ नाही, तसे होत नाही, विवेकसिंधु आणि ज्ञानेश्वरीतील काही ओव्या यात निश्चितच साम्य आहे पण अभिव्यक्तीत फरक आहे , आणि तसेही मुकुंदराज आणि ज्ञानेश्वर यांच्यात जवळपास १०० वर्षांचे अंतर आहे, या दीर्घ काळात भाषेच्या सर्वच स्वरूपात आमूलाग्र बदल होतो “ आणखीन महत्त्वाचे विधान त्यांनी केले की अनेक साहित्यिक असो, धार्मिक असो, अशा साहित्यकृतीत लोकसाहित्याचा अंश असतोच! श्रवणीयता हा मौखिक साहित्याचा लक्षणीय गुण आहे.” अशा प्रकारे सुरू झालेली ही बौद्धिक चर्चा, अनेक वळणे घेत अनेक तास चालू होती. नामदेव हे खरे सर्वसामान्यांचे संत, ज्ञानेश्वरांच्या  समकालीन असलेले नामदेव, त्यांच्याकडे ज्ञानेश्वरांनी पुढारीपण देऊन टाकले. ज्ञानेश्वर हे काहीसे वरिष्ठ वर्गाशी जोडलेले तर नामदेव यांची सर्व सामान्य लोकांशी नाळ जुळलेली. शिवाय नामदेव हे संसारी होते, तुकाराम संसारी होते, संसारात राहून परमार्थ करता येतो, महदंबा, मुक्ताई , जनाबाई, चोखामेळा, कान्होपात्रा, रामदास अशी चर्चेची रंगत वाढत ती खांडेकर, फडके, जीवनासाठी कला की कलेसाठी जीवन हा वाद; तसेच आर्य हे भरतीयच होते, भारताच्या बाहेरून आलेले नाही, इंडो आर्यन भाषा, भाषेचे संक्रमण, अवेस्ता आणि ऋग्वेद यांच्या भाषेतील साम्य, एका विष्यवारून दुसरा विषय असे कितीतरी  थांबे घेत घेत मी दीड दिवस यथेच्छ बौद्धिक आनंद घेतला.

आपल्या मताविषयी लीलाताई ठाम असतात. एक दोनदा मी थोडेसे वेगळे बोलताच  त्यांनी त्यातील वैचारिक फरक उलगडून दाखविला. सध्या त्यांच्या हातातील तिन्ही प्रकल्प त्यांना वेळेच्या मर्यादेत पूर्ण करायचे होते. त्याविषयी त्यांनी माहिती सांगितली.

त्यांच्याशी बोलताना मला सारखी दुर्गाबाईंची  आठवण येत होती. त्याही बोलण्यात ठाम असत, एक वैचारिक, बौद्धिक करारीपणा त्यांच्या चेहऱ्यावर आणि त्या बोलत असताना जाणवत असे, तोच अनुभव मला लीलाताईंशी बोलताना आला.

“बौद्धिक चर्चेने पोट काही भरत नाही तेव्हा आता जेवायला चला” अशी प्रेमळ सूचना माझ्या सौने आणि पुतणीने  केली तेव्हा आम्ही उठलो. आणि पुन्हा जेवताना तास दीड तास गप्पा रंगल्याच.

त्यांचा निरोप घेऊन निघताना असे वाटले की हा ज्ञानाचा खजिना, स्त्रोत माझ्या इतक्या जवळ असताना मागील अनेक वर्षांत त्यांची माझी भेट झाली नाही. जवळपास २५/३० वर्षांपूर्वी ‘वर्णनात्मक भाषाविज्ञान’

या संदर्भ ग्रंथाचे प्रकाशन आमच्या आरती प्रकाशनातर्फे प्रकाशित झाले होते. त्यानंतर आताची ही भेट  ! खूप काही राहिले असल्याची खंत जाणवणारी आणि बरेच काही मिळाले याचे समाधान देणारी.!

निघताना त्यांनी मला त्यांची २०२१ आणि २०२२ मध्ये प्रकाशित झालेली दोन पुस्तके “जावे संतांच्या गावा’ आणि “संत नामदेव ::अंतरंग दर्शन” ही भेट म्हणून दिली. 

एका उत्तम भेटीची उत्कट आठवण घेऊन आम्ही परतलो.

सुरेश देशपांडे / डोंबिवली                                   

    

Monday, November 7, 2022

 सहल कोकणातील ..!

यंदा गणपतीत आणि दिवाळीत कोकणात जायचा योग आला. गणपती उत्सवात कोकणातील आरत्यांचा अतिशय प्रसन्न करणारा अनुभव घेतला होता. तो मागच्या लेखात इथे लिहिला होता. अनेकांना तो लेख आवडला, शेअर केला गेला, कोकणातील आरती म्हणणाऱ्या मंडळींना काही ठिकाणची “सुपारीही” मिळाली असे

कळले. असो

आता मी दिवाळीच्या सुटीत कोकणात गेलो तिथला अनुभव मांडतो आहे. राजापूर जवळील कोंडीये या लहानशा खेड्यात निलेश हर्डीकर यांच्या बंगल्यात मुक्काम होता. खेडे जरी असले तरी आम्ही राहात होतो त्या ठिकाणी चांगल्याप्रकारे व्यवस्था होती.   

आश्विन महिना असल्यामुळे छानपैकी थंडीला सुरुवात झाली होती. सुखद थंडीत रात्री हिंडायला मजा यायची. सकाळीसुद्धा अंगावर शिरशिरी येई इतकी थंडी होती. बंगल्याच्या मागे नारळाची सुंदर बाग, छानशी विहीर, गवत वाढलेले, त्या गवतावर अनवाणी पायाने चालताना खूपच सुख वाटायचे, त्यातच, अलीकडच्या पिढीला माहीत नसलेल्या तांब्याच्या बंबामध्ये लाकडाच्या ढलप्या टाकून मस्तपैकी कडकडीत पाणी तापवायचो. मुंबईत गिझरच्या गरम पाण्यात आणि बंबात तापवलेल्या गरम पाण्यात फरक जाणवतो. किती वर्षांनी बंब पेटवून पाणी तापवून आंघोळ केली. जवळपास पंचावन्न वर्षे मी मागे गेलो.

गेल्या गेल्या मी , माझी नात श्रिया आम्ही दोघांनी मिळून लाल माती कालवून कुंपण भिंतीला लागून किल्ला बनवला. त्यावर महाराजांना स्थानपण केले! मावळे आजूबाजूस उभे होते. किल्ला बनविण्याची कल्पना आज किती जणांना माहीत असे कोण जाणे!

दुसऱ्या दिवशी बंगल्यात काम करायला येणाऱ्या मावशीच्या मैत्रिणीच्या शेतात गेलो. यापूर्वी शेतीचा तसा डायरेक्ट संबंध आला नव्हता. गाडीतून प्रवास करताना दिसणारी हिरवीगार शेते पाहून मनाला आनंद होत असे. पण या वेळेस आम्ही डायरेक्ट शेतातच गेलो. शेतात ओणवे उभे राहून पिवळ्या भाताच्या रोपांची कापणीही केली. हा अनुभव मात्र आयुष्यात प्रथमच घेतला.! पाच मिनिटात कंबर भरून आली आणि हातातील दातेरी कोयती खाली ठेवली.! कापलेल्या भाताच्या जुडया कशा तयार करतात, अनेक जुड्यांचे भारे बांधून मग गिरणीत कांडायला पाठवतात. प्रत्यक्ष लावणी करण्यापासून ते तांदूळ तयार होईपर्यंतची कार्यपद्धती समजून घेतली आणि मग शेतकरी किती कामात बुडलेला असतो याची मनोमन जाणीव झाली.  त्याला नसतो ओवरटाइम, त्याला नसतो बोनस,  निसर्गावर पूर्णपणे अवलंबून असणारा, मातीशी नाळ न तोडणारा आमचा शेतकरी हा आमच्या देशाचा कणाच म्हणायला हवा!

तिसऱ्या दिवशी साधारणपणे दोन किलोमीटर अंतरावरील लहानशा झऱ्यावर गेलो आणि झऱ्याच्या पाण्यात मनसोक्त फिरलो. शेवाळलेल्या आणि पायाला टोचणाऱ्या दगडांची पर्वा न करता गुडघ्याएवढ्या पाण्यात बराच वेळ लहान मुलासारखे हुंदडत बसलो.

संध्याकाळी राजापूरच्या धोपेश्वर मंदिरातील शंकराचे दर्शन म्हणजे एक अद्वितीय, अपूर्व असा आध्यात्मिक अनुभव म्हणावा लागेल. एक तर मंदिरापर्यन्त जाणारा रस्ता हा  सुंदर चढउतारांचा आणि आजूबाजूच्या भरगच्च दाट जंगलाचा. आमची गाडी  जणू काही हिरव्या रंगांच्या विविध छटांच्या लाटांतून हेलकावे खत जात होती! आजूबाजूला पसरलेली नीरव शांतता, अस्ताला जाणारा सहस्ररश्मी, त्याची हळुवार,

सोनेरी रंगीत किरणे झाडांच्या पानांतून आमच्यापर्यंत येत होती. त्यांत सुंदर रमणीय अशा या परिसराची एक अदृश्य मोहिनी मला वेढून टाकत होती आणि अचानक आम्ही धोपेश्वर मंदिराजवळ पोहोचलो.      

आधी लागले ते नवलादेवी मंदिर, बाजूलाच बैठी कौलारू प्राथमिक शाळा (अशी शाळादेखील अनेक वर्षांनंतर बघितली) आणि पुढे धोपेश्वर मंदिर! आणि बाजूला

शुभ्रधवल पाण्याचा खडकावरून उड्या मारत धावणारा धबधबा! कसले मोहक दृश्य होते ते! निसर्ग किती करांनी आपला खजिना उधळत होता ते पाहून आपले क्षुद्रपण ठळक हट होते.

 एका अनामिक अशा भारलेल्या मानसिक अवस्थेत मी मंदिरात प्रवेश केला. देवापुढे उभा राहिलो आणि मला काही सुचेनाच! अत्यंत पवित्र, पायस अशा त्या वातावरणात हात जोडले आणि माझे मन शून्यवत झाले.! विषय वासना काहीच उरल्या नाहीत !! जणू मी त्या निसर्गाचा, त्या चैतन्याचा एक भाग झालो होतो, विश्वाकाराशी तादात्म्य पावलो होतो!!! जणू माझे अस्तित्व आजूबाजूच्या वातावरणात विरघळून गेले. देवापुढे काही मागावयाचे असते हे विसरूनच गेलो, हात जोडलेले आणि डोळे मिटलेल्या अवस्थेत माझ्या ओठांतून माझ्याही नकळत शब्द बाहेर पडायला लागले “ॐ त्र्यंबकं यजामहे ..” किती वेळ उभा होतो कुणास ठाऊक, मनावर मोहिनी घालणारा निसर्ग आणि या सृष्टीचा निर्माता, संहारकर्ता समोर; इथे काही मागणे म्हणजे आपला करंटेपणा ! कसले गारुड झाले माहीत नाही, पण झरणाऱ्या  डोळ्यातील पाण्यामुळे धूसर होणारा देव ! काही न मागता मी बाहेर आलो, इतस्तत: पाहत बसलो. धोपेश्वर मंदिरामागे दिसणाऱ्या दत्त महाराजांच्या मंदिरात जाऊन त्यांचे दर्शन घेतले. माझे मन इतके शुद्ध आणि पवित्र झाले होते की मनात कोणतीही वासना उरली नव्हती.!

काहीच न बोलता आमचा परतीचा प्रवास झाला. एक उन्मनी अवस्थेत रात्र गेली.

पुढच्या दिवशी आम्ही देवगडच्या समुद्र किनारी गेलो. नजरेत न सामावणारा समुद्राचा विस्तीर्ण पट, अविरत, अविश्रांत खळाळत वाहणाऱ्या लाटा, माणूस सागरात काहीही टाकतो ते आपल्या पोटात न ठेवता सर्वच्या सर्व किनाऱ्यावर परत पाठवणारा हा सागर , त्याच्या विशालतेपुढे आपलं खुजेपण जाणवतेच!

पांगऱ्याचे लहानसे धरण पाहून आलो आणि रात्री अंगणात (अलीकडे अंगण म्हणजे काय रे भाऊ? असा प्रश्न पडू शकतो!) विशाल नभाखाली गप्पा मारत सहलीची अखेरची रात्र सरली.

दुसऱ्या दिवशी सकाळी नारळाच्या झाडांवरून काढलेली शहाळी, लोखंडी चिमटा वापरुन नारळ कसे सोलायचे ते आधी शिकून घेतले आणि मग एकामागोमाग एक अशी जवळपास ४० शहाळी सोलली! एवढ्यात बाजूच्या घरच्या मागून आरडाओरडा ऐकायला आला म्हणून बघितले तर एक वानर झाडावर बसले होते. त्याला हुसकाविण्याचा प्रयत्न चालला होता, कारण तो खूप नुकसान करतो म्हणे! झऱ्यावर, शेतात, धोपेश्वर मंदिरात जाताना झाडांवर दिसणारी विविधरंगी फुलपाखरे, शहरी वातावरणात ज्यांच्याकडे कधीही लक्ष गेले नाहीत ते  विविध पक्षी, लहानपणी आम्ही ज्यांच्या शेपट्यांना दोऱ्या बांधून बाटलीत भरायचे ते चतुर, पाच दिवसाच्या सहवासात आम्ही खायला घातल्यामुळे शेपूट हलवित येणारा कुत्रा, मागच्या दरवाजात बसून राहणारी मांजर असे सगळे सगळे सोडून आम्ही परतीचा रस्ता धरला !

परत येताना आठवणीने, आमच्याबरोबर नेलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या, वेष्टणे हा सर्व कचरा एक पिशवीत भरून आणला आणि पुनर्वापरासाठी पाठवून दिला. निसरागाचा आनंद लुटायचा असेल तर निसर्गाची हनीही आपण करायची नाही हा दंडक आपण सर्वांनीच पाळायला हवा नाही का?

सुरेश देशपांडे/ डोंबिवली     

        

 

                

 










Saturday, April 9, 2022

 

वाढदिवस --!

अलीकडे वाढदिवस साजरा करणे म्हणजे एक इव्हेंट झाला आहे. वाढदिवस, मग तो जन्माचा

म्हणजे वय वाढल्याचा असो, लग्नाचा असो, नोकरीला लागल्याचा दिवस असो किंवा कोणताही

असो तो साजरा करण्याकडे कल आहे/असतो.

वाढदिवस साजरा करण्याच्या काही पद्धती आता रूढ झाल्या आहेत. एक भला मोठा केक

आणायचा ( त्याची किमत जेवढी जास्त तेवढे आपले प्रेस्टीज जास्त!), मग मध्यभागी एक टेबलावर

ठेवून त्यावर मेणबत्ती ठेवायची, मेणबत्ती पेटवून मग ज्याचा वाढदिवस असेल तो टेबलाजवळ उभा

राहिला की सर्वांनी गोळा व्हायचे, जल्लोष करायचा, मोठ्या आवाजात गाणी लावायची मग फुंकर मारून मेणबत्ती विझवायची, कसले तरी फवारे उडवायचे आणि मग, पित्झा, बर्गर, पास्ता असे पदार्थ

खायला द्यायचे. मुख्य म्हणजे जमणाऱ्या माणसांनी/मुलांनी भेट वस्तू /गिफ्ट द्यायच्या आणि परत भेट

रिटर्न गिफ्ट घ्यायच्या. (कधी, काही ठिकाणी मद्यदेखील दिले जाते )शाळेत वर्गातील मित्र, मैत्रिणींना महाग चॉकलेट वाटायची इ . इ .

या सर्व इव्हेंटमध्ये निश्चितच काही हजार रुपये उडतात.

या सर्व प्रकारची काही आवश्यकता आहे का, हा प्रश्न माझ्या मनात येतो याचे कारण असे की, माझ्या ओळखीचे एक गृहस्थ म्हणाले की, वाढदिवस त्यांच्या मुलाचा किंवा मुलगी म्हणा साजरा करायचा आहे

आणि एवढे पैसे कुठून आणायचे? कारण दोनच महिन्यांपूर्वी अन्य कोणाकडे ते गेले होते तर त्यांनी किती खर्च कला होता, महाग  रिटर्न  गिफ्ट दिल्या होत्या आणि आता जर आम्ही त्यापेक्षा कमी काही दिले तर लगेच चर्चा होणार आणि घरातून हट्ट तर असा आहे की सोसायटीत राहायचे आहे तर खर्च

करायलाच हवा. म्हणजे मग या वाढदिवस साजरा करण्यात व्यवहार आला नि आनंद नाहीसा झाला . कोणाला तरी दाखविण्यासाठी, इंप्रेशन मारण्यासाठी, बरोबरी करण्यासाठी वाढदिवस आणि तत्सम इव्हेंट करायचे. परवडत नसताना, खोट्या प्रतिष्ठेसाठी ही सगळे करायचे.

आनंद वगैरे साजरा करणे ही ठीक आहे, पण  कोणत्या मर्यादेपर्यंत? आपण जर कोणती लहान वस्तू किंवा स्वस्त वस्तू दिली तर लोक आपल्याला हसतील, मागच्या वर्षी आपण त्यांना काय दिले होते आणि आता ते आपल्याला काय देतात या प्रकारच्या चर्चा नंतर होतातच! बरे महाग वस्तू भेट द्यायची इच्छा नसेल, परवडत नसेल तर इव्हेंटला नाही गेलो तरी चर्चा होणार! अगदी फेसबुक आणि व्हाटस आप वर जरी

कोणी शुभेच्छा दिल्या नाहीत तरी चर्चा होते. मग आपल्या समूहावर एखाद्याने शुभेच्छा दिल्या की आपण मागे राह्यला नको म्हणून पटकन एखादे चित्र टाकून मोकळे व्हायचे आणि तोंडदेखलेपणा केला जातो.       

 मला वाटते की आता या पद्धती बदलायला हव्यात. मी अजिबात संस्कृति रक्षण वगैरेच्या गोष्टी सांगत नाही. वरील सर्व गोष्टींची खरेच काही आवश्यकता आहे का याचा विचार व्हायला हवा. वाढदिवस असला की घरच्या घरी औक्षण करावे, घरीच बनविलेले किंवा फार फार तर दुकानातून आणलेली मिठाई किंवा पेढे अशाप्रकारचे गोड पदार्थ वाटावेत आणि त्यातूनही जर तुम्हाला  खरोखरीच खर्च करायची इच्छा असली तर अनाथाश्रम, सार्वजनिक आरोग्यासाठी मदत किंवा सरकारी मदत निधी

अशा ठिकाणी पैसे, कपडे, औषधे वाटावेत.             

मी एक विचार मांडला आहे. कोणाला पटेल नाही पटेल पान आमच्या घरी आम्ही अशा प्रकारे वाढदिवस साजरे करतो .