Monday, November 7, 2022

 सहल कोकणातील ..!

यंदा गणपतीत आणि दिवाळीत कोकणात जायचा योग आला. गणपती उत्सवात कोकणातील आरत्यांचा अतिशय प्रसन्न करणारा अनुभव घेतला होता. तो मागच्या लेखात इथे लिहिला होता. अनेकांना तो लेख आवडला, शेअर केला गेला, कोकणातील आरती म्हणणाऱ्या मंडळींना काही ठिकाणची “सुपारीही” मिळाली असे

कळले. असो

आता मी दिवाळीच्या सुटीत कोकणात गेलो तिथला अनुभव मांडतो आहे. राजापूर जवळील कोंडीये या लहानशा खेड्यात निलेश हर्डीकर यांच्या बंगल्यात मुक्काम होता. खेडे जरी असले तरी आम्ही राहात होतो त्या ठिकाणी चांगल्याप्रकारे व्यवस्था होती.   

आश्विन महिना असल्यामुळे छानपैकी थंडीला सुरुवात झाली होती. सुखद थंडीत रात्री हिंडायला मजा यायची. सकाळीसुद्धा अंगावर शिरशिरी येई इतकी थंडी होती. बंगल्याच्या मागे नारळाची सुंदर बाग, छानशी विहीर, गवत वाढलेले, त्या गवतावर अनवाणी पायाने चालताना खूपच सुख वाटायचे, त्यातच, अलीकडच्या पिढीला माहीत नसलेल्या तांब्याच्या बंबामध्ये लाकडाच्या ढलप्या टाकून मस्तपैकी कडकडीत पाणी तापवायचो. मुंबईत गिझरच्या गरम पाण्यात आणि बंबात तापवलेल्या गरम पाण्यात फरक जाणवतो. किती वर्षांनी बंब पेटवून पाणी तापवून आंघोळ केली. जवळपास पंचावन्न वर्षे मी मागे गेलो.

गेल्या गेल्या मी , माझी नात श्रिया आम्ही दोघांनी मिळून लाल माती कालवून कुंपण भिंतीला लागून किल्ला बनवला. त्यावर महाराजांना स्थानपण केले! मावळे आजूबाजूस उभे होते. किल्ला बनविण्याची कल्पना आज किती जणांना माहीत असे कोण जाणे!

दुसऱ्या दिवशी बंगल्यात काम करायला येणाऱ्या मावशीच्या मैत्रिणीच्या शेतात गेलो. यापूर्वी शेतीचा तसा डायरेक्ट संबंध आला नव्हता. गाडीतून प्रवास करताना दिसणारी हिरवीगार शेते पाहून मनाला आनंद होत असे. पण या वेळेस आम्ही डायरेक्ट शेतातच गेलो. शेतात ओणवे उभे राहून पिवळ्या भाताच्या रोपांची कापणीही केली. हा अनुभव मात्र आयुष्यात प्रथमच घेतला.! पाच मिनिटात कंबर भरून आली आणि हातातील दातेरी कोयती खाली ठेवली.! कापलेल्या भाताच्या जुडया कशा तयार करतात, अनेक जुड्यांचे भारे बांधून मग गिरणीत कांडायला पाठवतात. प्रत्यक्ष लावणी करण्यापासून ते तांदूळ तयार होईपर्यंतची कार्यपद्धती समजून घेतली आणि मग शेतकरी किती कामात बुडलेला असतो याची मनोमन जाणीव झाली.  त्याला नसतो ओवरटाइम, त्याला नसतो बोनस,  निसर्गावर पूर्णपणे अवलंबून असणारा, मातीशी नाळ न तोडणारा आमचा शेतकरी हा आमच्या देशाचा कणाच म्हणायला हवा!

तिसऱ्या दिवशी साधारणपणे दोन किलोमीटर अंतरावरील लहानशा झऱ्यावर गेलो आणि झऱ्याच्या पाण्यात मनसोक्त फिरलो. शेवाळलेल्या आणि पायाला टोचणाऱ्या दगडांची पर्वा न करता गुडघ्याएवढ्या पाण्यात बराच वेळ लहान मुलासारखे हुंदडत बसलो.

संध्याकाळी राजापूरच्या धोपेश्वर मंदिरातील शंकराचे दर्शन म्हणजे एक अद्वितीय, अपूर्व असा आध्यात्मिक अनुभव म्हणावा लागेल. एक तर मंदिरापर्यन्त जाणारा रस्ता हा  सुंदर चढउतारांचा आणि आजूबाजूच्या भरगच्च दाट जंगलाचा. आमची गाडी  जणू काही हिरव्या रंगांच्या विविध छटांच्या लाटांतून हेलकावे खत जात होती! आजूबाजूला पसरलेली नीरव शांतता, अस्ताला जाणारा सहस्ररश्मी, त्याची हळुवार,

सोनेरी रंगीत किरणे झाडांच्या पानांतून आमच्यापर्यंत येत होती. त्यांत सुंदर रमणीय अशा या परिसराची एक अदृश्य मोहिनी मला वेढून टाकत होती आणि अचानक आम्ही धोपेश्वर मंदिराजवळ पोहोचलो.      

आधी लागले ते नवलादेवी मंदिर, बाजूलाच बैठी कौलारू प्राथमिक शाळा (अशी शाळादेखील अनेक वर्षांनंतर बघितली) आणि पुढे धोपेश्वर मंदिर! आणि बाजूला

शुभ्रधवल पाण्याचा खडकावरून उड्या मारत धावणारा धबधबा! कसले मोहक दृश्य होते ते! निसर्ग किती करांनी आपला खजिना उधळत होता ते पाहून आपले क्षुद्रपण ठळक हट होते.

 एका अनामिक अशा भारलेल्या मानसिक अवस्थेत मी मंदिरात प्रवेश केला. देवापुढे उभा राहिलो आणि मला काही सुचेनाच! अत्यंत पवित्र, पायस अशा त्या वातावरणात हात जोडले आणि माझे मन शून्यवत झाले.! विषय वासना काहीच उरल्या नाहीत !! जणू मी त्या निसर्गाचा, त्या चैतन्याचा एक भाग झालो होतो, विश्वाकाराशी तादात्म्य पावलो होतो!!! जणू माझे अस्तित्व आजूबाजूच्या वातावरणात विरघळून गेले. देवापुढे काही मागावयाचे असते हे विसरूनच गेलो, हात जोडलेले आणि डोळे मिटलेल्या अवस्थेत माझ्या ओठांतून माझ्याही नकळत शब्द बाहेर पडायला लागले “ॐ त्र्यंबकं यजामहे ..” किती वेळ उभा होतो कुणास ठाऊक, मनावर मोहिनी घालणारा निसर्ग आणि या सृष्टीचा निर्माता, संहारकर्ता समोर; इथे काही मागणे म्हणजे आपला करंटेपणा ! कसले गारुड झाले माहीत नाही, पण झरणाऱ्या  डोळ्यातील पाण्यामुळे धूसर होणारा देव ! काही न मागता मी बाहेर आलो, इतस्तत: पाहत बसलो. धोपेश्वर मंदिरामागे दिसणाऱ्या दत्त महाराजांच्या मंदिरात जाऊन त्यांचे दर्शन घेतले. माझे मन इतके शुद्ध आणि पवित्र झाले होते की मनात कोणतीही वासना उरली नव्हती.!

काहीच न बोलता आमचा परतीचा प्रवास झाला. एक उन्मनी अवस्थेत रात्र गेली.

पुढच्या दिवशी आम्ही देवगडच्या समुद्र किनारी गेलो. नजरेत न सामावणारा समुद्राचा विस्तीर्ण पट, अविरत, अविश्रांत खळाळत वाहणाऱ्या लाटा, माणूस सागरात काहीही टाकतो ते आपल्या पोटात न ठेवता सर्वच्या सर्व किनाऱ्यावर परत पाठवणारा हा सागर , त्याच्या विशालतेपुढे आपलं खुजेपण जाणवतेच!

पांगऱ्याचे लहानसे धरण पाहून आलो आणि रात्री अंगणात (अलीकडे अंगण म्हणजे काय रे भाऊ? असा प्रश्न पडू शकतो!) विशाल नभाखाली गप्पा मारत सहलीची अखेरची रात्र सरली.

दुसऱ्या दिवशी सकाळी नारळाच्या झाडांवरून काढलेली शहाळी, लोखंडी चिमटा वापरुन नारळ कसे सोलायचे ते आधी शिकून घेतले आणि मग एकामागोमाग एक अशी जवळपास ४० शहाळी सोलली! एवढ्यात बाजूच्या घरच्या मागून आरडाओरडा ऐकायला आला म्हणून बघितले तर एक वानर झाडावर बसले होते. त्याला हुसकाविण्याचा प्रयत्न चालला होता, कारण तो खूप नुकसान करतो म्हणे! झऱ्यावर, शेतात, धोपेश्वर मंदिरात जाताना झाडांवर दिसणारी विविधरंगी फुलपाखरे, शहरी वातावरणात ज्यांच्याकडे कधीही लक्ष गेले नाहीत ते  विविध पक्षी, लहानपणी आम्ही ज्यांच्या शेपट्यांना दोऱ्या बांधून बाटलीत भरायचे ते चतुर, पाच दिवसाच्या सहवासात आम्ही खायला घातल्यामुळे शेपूट हलवित येणारा कुत्रा, मागच्या दरवाजात बसून राहणारी मांजर असे सगळे सगळे सोडून आम्ही परतीचा रस्ता धरला !

परत येताना आठवणीने, आमच्याबरोबर नेलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या, वेष्टणे हा सर्व कचरा एक पिशवीत भरून आणला आणि पुनर्वापरासाठी पाठवून दिला. निसरागाचा आनंद लुटायचा असेल तर निसर्गाची हनीही आपण करायची नाही हा दंडक आपण सर्वांनीच पाळायला हवा नाही का?

सुरेश देशपांडे/ डोंबिवली