Saturday, June 13, 2026

 

पुस्तकप्रेमी समूहाचे अखंड पुस्तक परिचय अभियान

आठवडा :२८५ दिनांक :20 नोव्हेंबर २०२५

पुस्तक क्रमांक : १९९२

पुस्तकाचे नाव : ‘असत्यमेव जयते –भारताच्या इतिहासातील दिशाभूल’

लेखक: अभिजीत जोग

प्रकाशक : भीष्म प्रकाशन / पुणे

दुसरी आवृत्ती : २६ जानेवारी २०२२

पृष्ठे:४६४ मूल्य : रु. ५९९/=

परिचयकर्ता : सुरेश देशपांडे

अभिजीत जोग यांच्या ‘ असत्यमेव जयते’ या पुस्तकाचा परिचय करून देणे म्हणजे शिवधनुष्य उचलण्यासारखे आहे. अत्यंत परिश्रमपूर्वक लिहिलेले हे पुस्तक मुळातूनच वाचण्यासारखे आहे.

या पुस्तकाचा उद्देशच मुळी आतापर्यंत भारताचा जो इतिहास लिहिला गेला तो कसा जाणीवपूर्वक दिशाभूल करणारा आहे हे सांगताना मूळ इतिहास काय आहे आणि तो आतापर्यंत  कसा लपवण्यात आला हे सांगण्याचा आहे. असतो मा सद्गमय’  या उक्तीप्रमाणे ‘असत्यापासून आपण सत्याकडे जाऊ या असे लेखक म्हणतात .  

पहिल्या प्रकरणात, आर्य भारताबाहेरून रशियाच्या कॉकेशस प्रांतातून आले, असा एक सिद्धांत जो मांडला  जातो त्याचा परामर्श घेतला आहे. त्याचे कारण मोठे मनोरंजक आहे. ‘ व्हाईट मॅनस् बर्डन’ या संकल्पनेवर आधारित जगातील सर्व रानटी आणि असंस्कृत लोकांना शिकविण्याची जबाबदरी गोऱ्या लोकांवरच आहे आणि म्हणून गोरी साम्राज्यवादी राष्ट्रे इतरांवर राज्य करतात ती त्यांना सुधारण्यासाठीच असा गोऱ्यालोकांचा समज होता ! आणि  हे लोक जेव्हा भारतात आले तेव्हा त्यांना भारतीय भाषा, इतिहास, संस्कृती, ज्ञान, विद्यान आणि संस्कृत भाषेचे युरोपियन भाषेशी असलेले कमालीचे साधर्म्य पाहून हे साम्य वरवरचे नसून भाषाशास्त्रानुसार मूलभूत स्वरूपाचे आहे हे त्यांच्या लक्षात आले.

ज्यांचा जन्म गुलाम म्हणून झाला आहे त्यांची भाषा विजेत्या युरोपियन लोकांच्या भाषेशी जवळीक सांगणारी आहे हे या युरोपियन लोकांना धक्कादायक वाटले.  ईस्ट इंडिया कंपनीलादेखील  प्राचीन भारतीय संस्कृतीचे ज्ञान, विज्ञान, तत्त्वज्ञान, कला. साहित्य याच्या आश्चर्यकारक प्रगतीचे दर्शन झाले.

मग इंग्रजांच्या पुढे प्रश्न निर्माण झाला की  ज्यांच्यावर आम्ही राज्य करणार ते आमच्यापेक्षा श्रेष्ठ आहेत  हे मान्य कसे करायचे? शिवाय युरोपियन भाषेशी साधर्म्य दर्शविणारी उच्च दर्जाची भाषा यांची कशी काय असू शकते? यावर त्यांनी अतिशय सोपा  तोडगा काढला तो म्हणजे पश्चिमेकडून आर्य आले आणि त्यांनी इथल्या कृष्णवर्णीय लोकांना पराभूत केले तसेच वेदांची आणि वैदिक धर्माची स्थापनाही केली!

आर्य  भारतात येण्यापूर्वी (इ. स्. पूर्व १५०० काळात ) हा काळही चुकीचा आहे कारण ऋग्वेद आणि अन्य वैदिक ग्रंथ त्याआधीच निर्माण झाले आहेत हे अनेकांनी सिद्ध केले आहे. श्री जोग यांनी भारतीय संस्कृतीतील सरस्वती नदीचा उल्लेख, भारतीय खंडातील लोकांच्या डी एन ए चे पुरावे, भारतात सापडणारे उंदीर, तसेच हत्ती, गाय, म्हैस, गवा, मोर, चितळ या प्राण्यांचे उल्लेख, अनेक ठिकाणी केलेले उत्खनन .. असे अनेक पुरावे देऊन आर्य हे भरताबाहेरून आलेले नाहीत हे सज्जड पुराव्यानिशी सिद्ध करून दाखवलेले आहे.  असे असूनसुद्धा आमच्या येथील  मेकॉलेपुत्र आणि डावे  इतिहासकार खोटा इतिहास वर्षोनुवर्षे शिकवितच आहेत.

आपण दुसऱ्या सत्याकडे वळू या..  .. भारतीय इतिहास हा पराभूतांचा इतिहास आहे असेच आपणाला आजवर शिकविण्यात आले. परंतु जोग यांनी भारतावरील पहिले आक्रमण हे इ. स.पू ८१० मध्ये झाले ( असेरियन राणी सेमिरमिस हिचे) अर्थात  सिंधु नदीच्या किनाऱ्यावरील राजा सत्यव्रत याने तिचा दारुण पराभव केला. दुसरा उल्लेख येतो तो ग्रेट अलेक्झांडर याचा.. वास्तविक तो भारताच्या वायव्य सीमेवर येऊन थडकला परंतु तेथे असलेल्या पोरस राजाशी झालेल्या युद्धात नक्की कोणाचा पराभव  किंवा विजय झाला याचा उल्लेख इतिहासात नाही यावर अनेक मतमतांतरे आहेत परंतु या युद्धानंतर अलेक्झांडर परत गेला मग तो विजय कसा ? अलेक्झांडरच्या मृत्यूनंतर भारतात राहिलेला ग्रीक राजदूत मेगॅस्थेनीस याने ‘ इंडिका’ नावाचा ग्रंथ लिहिला आहे त्यातही त्याने पोरसचा पराभव झाला असा उल्लेख केलेला नाही. त्यानंतरचा काळ येतो इस्लामिक आक्रमणाचा. एकेश्वरवादी धर्म हे आपलाच धर्म खरा  असून इतरधर्मीय हे काफर आहेत असे समजतात तशी त्यांना शिकवण आहे,    इ.स.. ५७० मध्ये जन्म झालेल्या कुरेश जमातीतील महंमद पैगंबर यांनी इ. स. ६०० मध्ये इस्लाम धर्माची स्थापना केली आणि संपूर्ण अरबस्तानात त्यांचा प्रसार झपाट्याने झाला. इ. स. ६३२ मध्ये महमद पैगंबर यांचा मृत्यू झाल्यानंतर अबू बक्र हा खलिफा झाला आणि धर्मवेडाने झपाटलेल्या अरबांनी मग आपल्या मार्गात जो कोणी आणि कितीही येतील  त्यांना कापून काढत आपला धर्म प्रसार जारी ठेवला.

स्पेन ते पूर्वेकडे सिंधपर्यंतचा भूप्रदेश वेगाने जिंकून घेतला. आठच वर्षात संपूर्ण सिरिया इस्लामिक देश बनला. ग्रीक भाषा असलेला आणि हजार वर्षांहून अधिक काळ रोमन सामाज्य अवघ्या आठ वर्षात समाप्त झाले ! त्यानंतर इराक, इजिप्त,इराण, उत्तर आफ्रिका, मध्य आशिया, पोर्तुगाल अशा रीतीने ६३२ ते ७५० या सवाशे वर्षांच्या काळात अफगाणिस्तानपर्यन्तचा विशाल भूभाग अरबांच्या  पर्यायाने इस्लामच्या ताब्यात आला. अलेक्झांडरनेदेखील प्रचंड भूभाग जिंकलयानंतर  जिंकलेल्या प्रदेशात आपला धर्म किंवा संस्कृती लादली नाही पण इस्लामच्या मोहीमा या निव्वळ धर्मप्रसारासाठीच होत्या त्यामुळे जिंकलेल्या सर्व प्रदेशाचे त्यांनी इस्लामीकरण केले.या पार्श्वभूमीवर भारतात गुप्त साम्राज्याचा  अस्त  झाल्यानंतर हर्षवर्धन याचा ४०/४२ वर्षांचा कालखंड वगळता मोठे साम्राज्य नव्हते. आणि हिंदूंचा धर्मयुद्धावर विश्वास होता. इस्लामची नजर आता भारतीय प्रदेशावर होती. इ. स.६३६ मध्ये ठाणे येथे, नंतर बरखास (भरूच) येथे हल्ला झाला पण दोन्ही ठिकाणी त्यांचा  पराभव झाला. सिंधवरील पहिले आक्रमण  देबल (कराची) येथे मुधीरा याने हल्ला केला पण त्यात तो ठार झाला. चौथा खलिफा याने आक्रमण केले पण त्याचा प्रमुख हॅरिस अल अब्दी मारला गेला. त्यानंतर खलिफा मुआविया याने सिंधवर सहा वेळा  आक्रमणे केली पण प्रत्येक वेळेस त्याचा पराभव झाला. सातत्याने होणाऱ्या पराभवाचा परिणाम म्हणून महंमद बिन कासिम संतापून देबलवर चालून आला, फंदफितुरी करून त्याने विजय मिळवला आणि मग पुढे तीन दिवस लुटालूट आणि कत्तली  केल्या. स्त्रियांना जनानखान्यात पाठविण्यात आले .. अशा रीतीने इस्लामी आक्रमणाचे धर्मवेड, क्रौर्य अत्याचार आणि लुटालूट याची पहिली ओळख देबल येथे झाली. आलोरच्या किल्यावरच्या राजा दहिर याने कडवा प्रतिकार केला पण दुर्दैवाने त्याचा पराभव झाला. पुढे बिन कासिमने मुलतान आणि सिंध येथे कब्जा केला. हे सर्व करण्यासाठी अरबांना  ७९ वर्षे वाट पहावी लागली. ‘चचनामा’ या ग्रंथात सिंधच्या लुटीचा आणि अत्याचाराचा संपूर्ण इतिहास आहे; नंतरही अरबांचे हल्ले झाले  पण हिंदू सैन्याने एकत्र येऊन अरबांचा पराभव केला यामध्ये नागभट्ट तसेच बाप्पा रावळ (रावळपिंडी शहर वसवणारा) यांनी अरबांना धूळ चारली. काश्मीरचा सम्राट ललितादित्य मुक्तपीड याने (७२४ -७६०) अरबांचे मनसुबे उधळून लावले. पंजाबला इस्लामच्या आक्रमणापासून वाचवले. सम्राट ललितादित्य याच्याकडून मार खालेल्या इस्लामी आक्रमकांनी पुढे चारशे वर्षे भारताकडे डोळे वर करून पाहिले नाही.  आपल्या इतिहासात मात्र बाप्पा रावळ आणि ललितादित्य यांचे नावही नाही ..!   अरबांना दोनशे वर्ष झगडूनही काबूल झाबूल या लहान हिंदू राज्यांना जिंकता आले नाही.

महंमद घोरी, गझनी, बाबर या क्रूर तुर्की लोकांचे पूर्वज बौद्ध होते . सातव्या आठव्या शतकात मुस्लिम आक्रमणामुळे हे मुस्लिम झाले. महमद गजनीने इ. स. 1001 ते 1027 या काळात एकूण 17 वेळा हल्ले केले.  डावे इतिहासकार महमुदचा  उद्देश लुटीचा होता असे लिहितात. परंतु त्याने हजारो मंदिरांचा विध्वंस केला, अत्याचार केले, स्त्री पुरुषांना गुलाम म्हणून विकले. हजारो किलो सोने, हिरे माणके,नगरकोटचे मंदिर, मथुरेचे मंदिर, सोमनाथचे मंदिर सर्वत्र त्याने लुटालूट करून राखरांगोळी केली. मुलतान आणि पंजाबमधील काही भाग सोडता अनेक हिंदू राजांनी त्याला येथे स्थिरावू दिले नाही. गझनी काय किंवा घोरी काय यांना केवळ नशिबाने साथ दिली. पृथ्वीराज चौहान यांचा घोरीशी अनेक वेळ संघर्ष झाला पण युद्धे मात्र दोन किंवा तीनच झाली. घोरी  पळून गेला होता पण पराजिताला  मारायचे नाही या सद्गुण विकृतीमुळे पृथ्वीराज यांनी त्याला सोडून दिले आणि त्याने विश्वासघात करून पृथ्वीराज चौहान यांचा वध केला. पृथ्वीराज चौहान हे अखेरचे  हिंदू सम्राट होते. महमद घोरी यांचा सूडदेखील काही हिंदूंनी तो तंबूत झोपला असचा वध करून घेतला. त्याच्यानंतर त्याचा गुलाम कुतुबुद्दिन एबक याने  सजमेर आणि गुजराथवर  कब्जा करून दिललीवर वर्चस्व प्रस्थापित केले तरी हिंदूंचा संघर्ष संपला नव्हता.. राजपूतरागिणी कूर्मादेवी, कामरूपचा राजा पृथू याने, नालंदाचा  विध्वंस करणाऱ्या बख्तियार खिलजीशी निकराचा संघर्ष केला आणि पळणाऱ्या खिलजीच्या सैन्याचा पाठलाग करून त्यांची कत्तल केली. तसेच ओरिसचा राजा नारसिंहदेव, वरंगळचा नायक कपाय,राणा हमिरसिंग सिसोदिया, रंपयरी गुर्जर, महाराणा कुंभ,राणी कर्णवती, लचीत बोरफुकन, सुहेलदेव इत्यादी वीरांनी इस्लामी  राज्याला सशस्त्र विरोध  केला.

मात्र डाव्या इतिहासकारांना हे मान्य करायला अवघड जाते म्हणून त्यांनी खोटा इतिहास लिहिला आणि आपल्या शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट केला.

  

 नकारविकृती.! काही विद्वान मंडळी, इतिहासातील झालेल्या अत्यंत वाईट गोष्टी, झालेला नरसंहार, विध्वंस केली गेलेली मंदिरे, भस्मसात करण्यात आलेले नालंदा विद्यापीठ, आणि अगदी अलीकडील  काश्मीरमधून विस्थापित्त करण्यात आलेले पंडित या सर्व गोष्टी झाल्याच नाहीत असे ठामपणे ठोकून सांगतात. यालाच अभिजीत जोग नकार विकृती म्हणतात.

स्वातंत्र्यानंतरची भारतातील शासनव्यवस्था, देशाच्या विचारधारा आणि शैक्षणिक, इतिहास धोरणावर नियंत्रण ठेवणारी इकोसिस्टिम आणि लॉबी यांनी असे काही घडलेच नाही शिवाय पूर्वीचे भारतीय हिंदू हे मागासलेले आणि असहिष्णू ठरवून सतत हिंदूंना अपमानित करण्याचे धोरण ठेवले जे आजही सुरूच आहे ..  भारत हा एक अतिशय प्रगत अशी संस्कृती होता असे काही मुस्लिम इतिहासकारांनी नोंदवून ठेवले आहे. विज्ञान, तत्त्वज्ञान, कला आणि साहित्य यातील प्रगतीबरोबरच सहिष्णुता आणि नैतिकता ही फार उच्च दर्जाची होती आणि त्याचा प्रभाव त्या इतिहासकारांवरदेखील पडला होता. हीच गोष्ट चीनी प्रवाशांनीदेखील नोंदवून ठेवली आहे. मुस्लिम इतिहासकारांनी असे लिहिले आहे की  हिंदू राजवटीत मुस्लिमांना अतिशय अतिशय आदराने वागणूक दिली जायची

आक्रमकांचा  उद्देश लुटीचा होता, मंदिरे उद्ध्वस्त करण्याचा नव्हता असे नेहरू म्हणतात अशा  सर्व प्रकारच्या नकारविकृतीवर इतिहासातील दाखले देऊन जोग यांनी आपले म्हणणे सिद्ध केले आहे.

४ .

चंद्रगुप्त मौर्य याने आर्य चाणक्याच्या मार्गदर्शनाखाली भारताचे एक साम्राज्य ( हिमालय ते संपूर्ण दक्षिण भारत आणि आसाम ते अफगाणिस्तान, बलुचिस्तानपर्यन्त) उभे केले. होते. त्याच्या मृत्युनंतर त्याचा मुलगा सुशील हा राजा होणार होता पण अशोकाने  त्याचा खून करून राज्य बळकावले.. आपल्या राज्यातील जैन, आजीवक यांचा त्याने संहार केला अशी नोंद ‘अशोकवदन’ या ग्रंथात आहे. कलिंगच्या युद्धातील नरसंहारानंतर अशोकला पश्चाताप होऊन त्याने बौद्ध धर्म स्वीकारला असे आपण वाचतो पण त्या युद्धापूर्वी दोन वर्षे आधीच अशोकाने बौद्ध धर्म स्वीकारला होता. इतिहासात आपली प्रतिमा क्रूरकर्मा होऊ नये यासाठी अशोकानेच सर्वत्र आपल्या नावाचे शिलालेख उभे केले. स्वत:विषयी इतके शिलालेख लिहिणारा सम्राट अशोक हा  पहिलाच राजा!

अकबराने राजपूत घराण्यांशी सोयरीक केली आणि हिंदुबद्दल सहिष्णूतेचे धोरण स्वीकारले आणि सर्वधर्मसमभाव पाळला असा एक समज दृढ आहे. त्याला टाचणी लावताना जोग लिहितात हुमायूनच्या मृत्यूनंतर दिल्लीचे राज्य हेमचंद्र विक्रमादित्य याच्याकडे होते पण नशिबाची साथ मिळाली आणि अकबर हेमचंद्राचा पराभव करून गादीवर आला. अकबराला इराणी आणि तुराणी या लोकांचा भरवसा वाटत नव्हता. त्यांना शह देण्यासाठी कोणीतरी तुल्यबळ असायला हवे म्हणून त्याने रजपुतांची  निवड केली. त्यांच्याशी सोयरीक जुळवली आणि त्यांच्या स्वभावानुसार  रजपूत स्वामीनिष्ट आणि विश्वासू राहिले,

आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीला अकबर हिंदू तर सोडाच पण मुस्लिमांमधील सुन्नी वगळता इतर पंथांच्या  बाबतीत अतिशय असहिष्णू होता. तो स्वत:ला गाझी म्हणजे धर्मयोद्धा समजत असे. जबलपूरजवळील गडकटांग येथे १५६० च्या मोहिमेत त्याने ४०००० मजुरांची हत्या केली. १५८० मध्ये पोर्तुगीज पाद्री  मोन्सेरात, अक्काव्हीय आणि एनरीक यांनी अकबराच्या राज्यातून प्रवास करताना लिहिले आहे की धर्मांध मुसलमानांनी हिंदूंची मंदिरे उद्ध्वस्त करून त्या जागी कबरी आणि दर्गे  उभे केले आहेत. यावरूनही अकबराचा ग्रेटनेस पोकळ होता हे जाणवते.

जोग यांनी याच पुस्तकात सूफी संतांच्या  बाबतीतील सच्चाई उलगडून दाखविली आहे. प्रमुख सूफी संतांनी हिंदू मुसलमान यांच्या संबंधाने लिहिलेली मते पहा.. निजमुद्दिन अवलिया म्हणतात ‘नरकाची आग हेच हिंदूंचे भवितव्य’.. ख्वाजा मोईनुद्दिन चिश्ती : अजमेरला आल्यावर त्याने शपथ घेतली  होती की एक दिवस अल्लाच्या आणि प्रेषितच्या मदतीने इथली सर्व मंदिरे पाडून टाकीन, मंदिराजवळ रोज एक गाय कापण्याचा आदेश त्याने दिला होता. अमिर खुसरो, याचे काव्य आणि संगीत श्रेष्ठ जरी असले तरी तो धर्मांध होता आणि त्याने मूर्तिपूजकांची कत्तल करण्याचा हकूम इस्लामने दिला  याबद्दल आभार  मानले होते. अशा अनेक सूफी संतांबद्दल जोग यांनी इतिहासातील दाखले देऊन आपले म्हणणे सिद्ध केले आहे.

या प्रकरणात जोग भारताचे सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक मागासलेपण याची कारणे आणि हे आपल्यावर लादणे यावर विस्तृत भाष्य केले आहे. सती, बालविधवा, बालविवाह आणि केशवपन  इत्यादी कुप्रथा  आणि स्त्री आणि शिक्षण, जातीव्यवस्था,जोहार आणि सती, गरिबी, असे अनेक विषय जोग यांनी हाताळले आहेत. हे सर्व मुळातून वाचायला हवे.

 पुढच्या प्रकरणात ते गांधी आणि भारतीय स्वातंत्र्य यावर अत्यंत आक्रमकपणे लिहितात. चरखा चालवून फार तर सूत मिळेल पण स्वातंत्र्य मिळणार नाही.   जोग लिहितात, गांधींनी सुरू केलेले एकही आंदोलन पूर्णत्वास गेले नाही.  मिठाचा सत्याग्रह तर त्यांनी अर्धवट सोडून दिला आणि फलश्रुती काय तर ब्रिटिशांनी मीठावरचा कर वाढवला! चले जाव चळवळ अर्धवट गुंडाळण्यात आले, अहिंसेचा पुरस्कार करणारे गांधी दक्षिण आफ्रिकेत तिथल्या गोऱ्या सरकारला मदत करत होते एवढेच नव्हे तर बोअर युद्धात ते सक्रिय होते आणि त्याबद्दल त्यांना पुरस्कारही मिळाला होता. मुस्लिम अनुनयासाठी तुर्कस्थान येथे केमाल पाशासाठी ‘खिलाफत चळवळीला ‘  पाठिंबा दिला. वास्तविक भारताचा आणि खलिफा यांचा काहीच संबंध नव्हता, केरळमध्ये मोपलयांनी हिंदूंवर केलेले रक्तरंजित अत्याचार याकडे गांधींनी डोळेझाक केली. त्याबद्दल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिले की या रक्त गोठवणाऱ्या अत्याचाराचे वर्णन करणे अशक्य आहे. गांधी भगतसिंग यांना वेडपट देशभक्त असे म्हणतात.

शेवटच्या प्रकरणात जोग म्हणतात की आता हे सर्व उगाळून का काढायचे तर  डॉ. आंबेडकर यांच्याच शब्दात सांगायचे तर राष्ट्रनिर्मितीसाठी लोकांकडे भूतकाळाचे सम्यक आकलन आणि भविष्याचा वेध असणे आवश्यक आहे..

आर्यांचा सिद्धांत असो वा अन्य कोणत्याही गोष्टीवरून आपल्या वैभवशाली इतिहासची दिशाभूल दूर करण्यासाठीच या ग्रंथाचा उद्देश आहे, असत्याकडून सत्याच्या मार्गाकडे जाण्याचा हा प्रयत्न आहे.

 

 

 

 

 

 

 

                                                   

 

 

 

 

 

 

 

 

पुस्तकप्रेमी  समूहाचे ‘अखंड पुस्तक परिचय अभियान’

आठवड क्रमांक- २८५ दिनांक – १९ नोव्हेंबर २०२५

पुस्तक क्रमांक : १९९१

पुस्तकाचे नाव : “मरणात खरोखर जग जगते”

लेखक :  बाळ सामंत

किमत :  रु.३००/ आवृत्ती : २७ मे १९९४.

प्रकाशक : परचुरे प्रकाशन मंदिर, मुंबई  

परिचयकर्ता : सुरेश देशपांडे

मृत्यू हा  विषय साहित्याचा, लिहिण्याचा होऊ शकतो का? का होऊ नये? आयुष्यात निश्चित अशी घडणारी मृत्यू ही एकमेव घटना आहे ( फक्त केव्हा येईल हे अनाकलनीय आहे) जन्म आपल्या हातात नाही. महत्त्वाचे म्हणजे साहित्यातून मानवी जीवनाचे प्रतिबिंब पडावे हे अपेक्षित आहे तर मानवी जीवनाचे अविभाज्य अंग असलेल्या मृत्यूचा विचार का नसावा.?

मृत्यूला आपण अभद्र समजतो पण  खरे तर मृत्यू हा एक सोहळाच  आहे! संतांनी तर त्याला अनुपम सोहोळा म्हटले आहे. अशा या मृत्यूवर सुप्रसिद्ध लेखक बाळ सामंत यांनी अतिशय सुंदर असा ग्रंथ लिहिला आहे.

पुस्तकाच्या सुरुवातीसच मृत्यू म्हणजे काय आणि मृत्यूच्या व्याख्या यासंबंधी लिहिताना ते म्हणतात भारतीय भाषेत मृत्यू या विषयावर फार साहित्य  नाही पण इंग्रजीत मात्र विपुल साहित्य आहे. मृत्यू या विषयाचे नेमके स्वरूप अनेक शरीर शास्त्रज्ञ किंवा तत्त्वचिंतक, आणि वैद्यकीय क्षेत्रातील धुरीणांना समजलेले नाही. एवढेच नव्हे तर मृत्यूची नेमकी व्याख्याही करता आलेली  नाही. मानवी शरीरातील कोट्यवधी पेशी प्रत्यही मरत असतात आणि  तेवढ्याच पेशी निर्माणही होत असतात. कालांतराने नवीन पेशी निर्माण होणे बंद होते. पेशींची नवनिर्मिती थांबते. शरीरातील ही महत्त्वाची निर्मिती  बंद होते म्हणजे नेमके काय होते? युनोच्या व्हायटल स्टॅटिस्टिक्स डिपार्टमेंटने मृत्यूची एक सर्वसाधारण व्याख्या  अशी केली आहे “ The permanent cessation of all vital functions” परंतु या व्याखेने मृत्यूचे स्वरूप स्पष्ट होत नाही. मृत्यूची प्रमुख लक्षणे : बुद्धीचा अभाव,(अर्थात हे मत निर्णायक नाही), संज्ञाहीन अवस्था, बेशुद्धी (श्वास थांबणे, जाणीव नसणे, ज्ञानेंद्रिये कार्यरत नसणे,डोळे निस्तेज ) तरीही व्यक्ती मृत्यू पावली असे म्हणता  येत नाही. मेंदू मृत झालेल्या व्यक्तीच्या इतर अवयवांचे कार्य  सुरू असते , आणि मेंदू मृत व्यक्तीला  मृत्यूच्या व्याख्येत समाविष्ट केले असले तरी तरी याला सर्वत्र कायदेशीर मान्यता मिळालेली नाही.

बाळ सामंत यांनी या विषयावर बऱ्याच काळ चिंतन केल्यावर ह ग्रंथ साकारला. आपल्या अभ्यासासाठी त्यांनी ज्या  ग्रंथांचे संदर्भ घेतले त्याची विस्तृत यादी ग्रंथाच्या अखेरीस असून ४३५ पृष्ठांच्या या ग्रंथात एकूण २४ प्रकरणे आहेत. त्या प्रकरणांची नावे  वाचूनच वाचकांना ग्रंथातील मजकुराचा अंदाज येऊ शकेल.

‘मृत्यूचे भय, मृत्यू कसा यावा, अतींद्रिय अनुभव (पूर्वजन्म आणि तत्सम अनुभव) मृत्यूच्या दारातून परत आलेल्या  व्यक्तींना मृत्यू कसा वाटला त्याचे  भयकारी आणि रोमांचक अनुभव, मृत्यूचा साक्षात्कार, निसर्ग आणि मृत्यू, नरबळी, खून, आत्महत्या, संत आणि विचारवंतांचे मृत्यू, समाधी, साहित्यातील मृत्यू दर्शन, धर्म आणि मृत्यू, प्रेम आणि मृत्यू, स्वेच्छामरण, नचिकेत आणि यमाचा संवाद, अंत्यसंस्कार आणि त्याच्या पद्धती, मी आणि मृत्यू, अशा अनेक प्रकरणातून सामंत यांनी मृत्यू या विषयाचे विविधांगी दर्शन घडविले आहे. अतींद्रिय अनुभव या प्रकरणात मृत्यूच्या जवळ गेलेल्या व्यक्तींच्या शरीरातून सूक्ष्म देह बाहेर पडून आपल्या स्थूल देहाकडे कसं पाहतो याचे प्रत्यक्ष वर्णन आहे. वेदांतात मृत्यूसमबंधी सखोल विवेचन आहे तेही वाचण्यासारखे आहे. 

हे पुस्तक वाचून आपली मृत्यूविषयीची  भीती नक्कीच लोप पावेल. मृत्युकडे  पाहण्याचा दृष्टिकोणही बदलले. मला वाटते वेदनारहित, सुखाने येणारा, शांत झोपेत असताना येणारा मृत्यू सर्वांनाच आवडेल.

हे पुस्तक वाचताना मला आश्चर्य एकच वाटले की सामंतांनी ,धर्म आणि मृत्यू, किंवा ‘अंत्यसंस्कार, या प्रकरणात मृत्यूचा  धार्मिक, पारमार्थिक अंगाने विचार केला असूनसुद्धा ‘गरुड पुराणाचा, न केलेला उल्लेख! वास्तविक ,गरुड पुराण’ हे एखाद्या घरात मृत्यू झाल्यानंतरच वाचले जाते, अन्यथा वाचत नाहीत. त्यात मृत्यूनंतर आत्म्याचा प्रवास, दहा दिवस सूतक का पाळावे , दहा दिवस दिवा  का ठेवावा,मासिक आणि वर्षश्राद्ध का करावे असे अनेक तपशील असून दर्भ आणि दूर्वा (दर्भ आणि दूर्वा शिळे होत नाहीत, पुन्हा वापरता येतात) का वापरतात असे अनेक उल्लेख आहेत; या गरूड पुरणाचा संदर्भ द्यायला हवा होता असे मला वाचक म्हणून वाटले.

या पुस्तकाच्या वाचनाच्या निमित्ताने मला लहानपणी मृत्यूविषयक वाचलेली एक कविता आठवली

“पोर खाटेवारी मृत्यूच्याच दारा ,  कुणा गरिबाचा तळमळे बिचारा }} त्यानंतर लक्षात राहिलेली सुरेश भट यांची  “ मरणाने सुटका केली, जगण्याने छळले होते.. . मानवी जीवनाला मृत्यूमुळे अर्थ प्राप्त होतो, एक ग्रीक लेखकाने म्हटल्याप्रमाणे मृत्यू हा मिठासारखा आहे त्यामुळे जगण्याला चव येते!

आपल्याकडील पौराणिक साहित्यात सत्यवान सावित्रीची कथा आहे. त्यात सावित्री आपल्या चतुर संभाषणाने यमाला  निरुत्तर करते आणि त्याच्याकडून तीन वर मागून आपल्या नवऱ्याचे प्राण वाचवते, आणि अंध सासऱ्यांना राज्य मिळवून देते.

या ग्रंथातील सर्वात मनोरम प्रकरण आहे ते ‘ यम आणि नचिकेत यांचा संवाद!’ सर्व काही लिहीत नाही; फक्त महत्त्वाचे _ “हृदयात एकूण १०१ नाड्या आहेत, त्यातील एक नाडी मूर्धाकडे गेली आहे (कपाळाकडे)हिला सुषुम्ना म्हणतात.. तिच्याद्वारे वरच्या लोकी जाऊन मानव अमरत्व प्राप्त करू शकतो.” योगशास्त्रातील नाड्या शरीरशास्त्रात नाहीत .. योग सूक्ष्म शरीराबद्दल बोलतो. पाश्चात्य संशोधकांनी त्याचा शोध घेण्याचा अविरत प्रयत्न केला त्याला ते energy body असे म्हणतात तर रशियन शास्त्रज्ञ bioelecricity असे म्हणतात.

हा अल्प परिचय आहे .. मुळातून हे पुस्तक वाचावे ..!            

 


 

    

 

  


 

 

                      

 

पुस्तकप्रेमी समूहाचे अखंड पुस्तक परिचय अभियान

आठवडा २८५ - दिनांक २३ .११.२०२५

पुस्तक क्रमांक -१९९५

पुस्तकाचे नाव – भारतीय गणितींची चरित्रे अर्थात

                           भारतीय गणिताचा जगात गौरव

लेखक – श्याम मराठे

प्रकाशक – साहित्य प्रसार केंद्र , नागपूर

द्वितीय आवृत्ती – १० मे १९८९

परिचयकर्ता -  सुरेश देशपांडे

आज ज्या पुस्तकाचा मी परिचय करून देणार आहे ते एक प्रचंड  पुस्तक आहे आणि त्या पुस्तकाचा परिचय करून देण्याचा  प्रयत्न करतोय  कारण या पुस्तकासंबंधी किती लिहू आणि काय लिहू हा प्रश्न आहे.  १० मे १९८९ या दिवशी हे पुस्तक प्रसिद्ध झाले आणि मी ते २५ सप्टेंबर १९८९ या दिवशी खरेदी केले.  (गणित हा विषय माझ्या आवडीचा म्हणून!)

नावाप्रमाणेच या पुस्तकात भारतीय गणितींची चरित्रे आहेत परंतु मुख्य म्हणजे गणिताविषयी किंवा गणित म्हणजे काय अशी सुरुवात करून लेखक श्याम मराठे गणिताविषयी एवढी मूलभूत माहिती देतात की आपण किती मोजणार याचे गणितच करायचे विसरून जातो !

अनुक्रमणिकेतील काही विषय बघा. १) माणूस जेव्हा ‘मोजू’ लागला २) संख्येची जाण- गणित इतिहास! ३) हातापायांची बोटे ४) प्राचीन भारतीय गणितींचे लेखन साहित्य ५) अंक -सुंदरीची विविध रूपे  ६) ‘एकूण किती? ७) अंक लेखनकलेचे वेदकालीन ज्ञान ८) वेदकालीन संख्याज्ञान ९) भारतीय दशमान पद्धती १०) भारताला गणितात ‘शून्य मिळाले! ११) भारत आणि गणित प्रतीके १२) पायथागोरस थेरम, छे! हे तर शुल्बसूत्र १३) ‘२ या संख्येचे  वर्गमूळ काढणे इत्यादी इत्यादी ... असे एकूण ३३ लेख आहेत . २७० पृष्ठांचे हे पुस्तक मी आता तिसरयादा वाचले तरीही सर्व  समजले आहे असे नाही हे एक आणि जेवढे समजते आहे ते लक्षात आणून वाचण्यासही जवळपास २० दिवस लागले ! 

 गणित‘गम्य’ व्हायचे असेल तर प्रथम ते रम्य व्हायला हवे ! गणित हे तर्कशास्त्राच्या सामर्थ्यावर उभे राहिले आहे.  श्रवण, दृष्टी, गंध, स्पर्श, आणि चव अशी पाचही इंद्रिये जेव्हा थिटी पडतात तेव्हा न कळलेल्या गोष्टींविषयी अनुमान करणे , निष्कर्ष काढणे असे ज्ञान, तर्कशक्ती माणसाला मिळवून देते.. उदाहरण म्हणजे चंद्रावर जाण्यासाठी किती वेळ लागेल हे जाणण्यासाठी प्रत्यक्ष प्रवास करावा लागत नाही तर ते गणिताने समजू शकते म्हणजेच तर्काने कळू शकते!  गणिताच्या जागतिक इतिहासात भारतीय गणितींनी अजरामर कार्य करून ठेवलेले आहे. गणित हे असे एक ज्ञानक्षेत्र आहे की ज्यात भारताला एक खास अधिकार प्राप्त झाला आहे.

संख्यांची जाण अन् संख्याचिन्हे या दोन गोष्टी पूर्णपणे वेगळ्या आहेत.  आकडे म्हणजे संख्यांना ठरवून दिलेली चिन्हे. आणि हे आकडे देश कालपरत्वे वेगळे असतात. आकडे म्हणजे संख्या नव्हे ! आता ८ म्हणजे आठ या संख्येला दिलेले एक दृश्य रूप आहे पण प्रत्यक्षात आठ ही केवळ एक कल्पनाच आहे कारण संख्या ही डोळ्यांना दिसत नाही.  ती एक जाणीव आहे

विचारप्रवर्तक माहिती देत हे पुस्तक पुढे जाते -  भारतात करंगळीच्या बाजूचे बोट पूर्वी हिशेबासाठी धरत नसत. ( अनामिका) त्त्रिमान, चतुर्मान पद्धत प्रचारात होती. पंजाची पाचही बोटे धरून पंचमान पद्धतही अस्तित्वात होती. पुढे षष्ठमन पद्धती त्याही पुढे दहाही बोटे धरून दशमान पद्धती क्रमप्राप्त होती. पण अंकगणना इथे थांबली नाही तर प्रत्येक बोटाला तीन पेरे, अंगठ्याला दोन पेरे  असे भरपूर उपभाग लक्षात आल्यावर द्वादशमान पद्धत आली आणि माणूस द्वादश म्हणजेच बाराच्या प्रेमात पडला .... बारा राशी, बारा महिने, बारा ज्योतिर्लिंगे, घड्याळाचे बारा आकडे, बारा बलुतेदार इत्यादी! परंतु त्यानंतर हे लक्षात आले की दशमान पद्धती ही अधिक सोयीची असल्याने गणना दशमानावर स्थिरावली ! मग पुढे हाताच्या बोटावर माणूस ९९,९९९ पर्यंतच्या संख्येचे हिशेब करायला लागला ! ( त्याची अनेक उदाहरणे या पुस्तकात आहेत. १४७ * ९ असे गुणाकार बोटांवर करता येतात! ( हे वाचून बोटे तोंडात { स्वत:च्याच } जातील!)  

प्राचीन भारतीय गणितींचे लेखन साहित्य म्हणजे ताडपत्र, भूर्जपत्र, पाटी-गणित, फलकवांङमय, कौशेयपट, चर्मपट     ताम्रपट, शिलालेख इत्यादी. वृक्षाच्या सालीस तेल लावून, घोटून, हव्या त्या आकाराची पाने कापून घेता येतात. पानाच्या लांबी रुंदी इतक्या आकराच्या लाकडी फळ्या पानांच्या खालीवर ठेवून मग एका बाजूस सलग भोके पडून त्यातून दोरा ओवून म्हणजेच सूत्राने पोथी बांधणी होई.  हे अविनाशी साहित्य जर प्राचीन भारतीय गणितींनी उपयोगात आणले नसते तर आपण फार मोठ्या सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि वैचारिक वांङमयास मुकलो असतो.

दशमान पद्धतीत पुढे  संख्या लेखनात शब्दांक हा  प्रयोग करण्यात आला. शब्दांकाच्याबाबतीतला इतिहास आणि माहिती खूप आहे ती सर्व इथे देणे शक्य नाही. परंतु ही पद्धत भारतभर वापरली जात होती. इ.स. ९४५ मधील एका दानपत्रात शब्दांकाचा वापर केला गेला आहे.

ऋग्वेदात १००० अष्टकर्णी गाई दान दिल्याचा उल्लेख आहे म्हणजे वेदकाळात संख्या ज्ञान होते हे सिद्ध होते. आणि अंकलेखनाची पद्धतही होती. गुणय (गुणाकार) विभज् ( भागाकार) परिणाह (परिघ) विष्कम्भ (व्यास) असे अनेक शब्द अनेक वेळा आहेत. दशमान पद्धतीचा वापर वेदांत अनेक ठिकाणी आहे. युज. वाज.संहितेमधून पुढीलप्रमाणे संख्या मिळतात. एक दश, शत, ..........अयुत (१०,०००) नियुत, प्रयुत, अर्बुद, न्युर्बुद, समुद्र, मध्य अंत, परार्ध (आजच्या भाषेत एक लाख कोटी!) दशमान पद्धतीचे श्रेय भारताचे आहे असे जगातील अनेक गणितींनी मोकळ्या मानाने मान्य केले आहे.

शून्याचा शोध लागल्यामुळे गणिताला पूर्णत्व आले आणि संख्यांना त्या त्या ठिकाणच्या किमतीही लागू शकल्या आणि सगळेच सोपे झाले. भारताबाहेर शून्याला अशी नावे होती. शून्य = निर्वात जागा, शून्य= सायफोस, शून्य =झेफिरो, शून्य= झिफ्रा (याचेच पुढे झिरो झाले) हिंदू वांङमयात जसा गणिताचा उल्लेख आहे तसेच अनेक उल्लेख जैन आणि बौद्ध वांङमयातही आहेत.  थोडे पुढे जाऊ, याच वेदकालीन गणितात यज्ञाच्या मांडणीचे शास्त्र दिले असून यज्ञ कोणी कसा करावा याविषयी माहिती आहे,

भारतीय गणिताविषयी सिरीया, अरब ( सेबेरस ६६२, इब्न वहशिया ८५५,ज्याहीज ८६९, अल मसौडी ९४३ असे अनेक  )

युरोपीय उल्लेख -आसोडोरस, रब्बी बेन एजरा, ल्योनार्डो, अलेक्झांदर डे विला दाई, माग्सिसुस ) असे उल्लेख आहेत.

भारतीय गणिताला जगात हिंदसा गणित म्हणून ओळखले जात होते आणि ते प्रथम अरबस्थानात तिथून स्पेन इटली आणि मग युरोपात पसरले. हे गणित तिथे जाईपर्यंत त्या लोकांना गणित माहीत नव्हते असे नाही तर अनेक त्रुटी होत्या. विशेषत: ‘वजा’  करणे या क्रियेसाठी चिन्ह नव्हते. त्यासाठी ते क्वचित टिंब वापरात असत किंवा अंकाच्या डोक्यावर आडवी रेघ मारली जात असे.

शुल्ब याचा अर्थ दोरी असा होतो आणि यज्ञवेदी होमकुंड यांचे आकार निश्चित करणारे नियम म्हणजे सूत्र म्हणून शुल्बसूत्र ! आजमितीला फार थोडी शुल्बसूत्रे उपलब्ध आहेत. कात्यायन, बौधायन, आपस्तंभ, सत्यासंध , मानव, मैत्रायणीय, वरः, वाधुल अशी काही मोजकीच शुल्बसूत्रे उपलब्ध आहेत बाकीची नष्ट झाली.

आयताच्या कर्णाचा वर्ग = त्याच्या दोन संलग्न बाजूंच्या वर्गाची बेरीज हा पायथागोरसचा सिद्धांत असे म्हटले जात असले तरी त्याचा काल इ.स. पूर्व ५६८ ते ५०० असा होता तर शुल्बसूत्रांचा काळ इ.स. पूर्व ३००० वर्षांचा आहे आणि ते शुल्बसूत्र असे आहे- “दीर्घस्याक्ष्णया रज्जु: पार्श्वमानी तिर्यङमानी च यत्पृथग्भूते कुरूत स्तदुभयं  करोति”  हे  सूत्र भारतातून पर्शियात आणि तिथून ते त्याच्यापर्यंत पोहोचले असावे असा समज आहे.

दोन या संख्यचे वर्गमूळ काढण्याचेही प्रयत्न वेदकाळात झाले होते.त्याचे सविस्तर सोदाहरण विवेचन दिले आहे.

सर्वच शुल्बसूत्रांनी असा एक प्रयत्न केला की वर्तुळाच्या क्षेत्रफळाइतका चौरस किंवा चौरसाच्या क्षेत्रफळाइतके वर्तुळ कसे काढायचे? यासाठी क्षेत्रफळ, व्यास आणि परीघ तसेच    √२ ( २ चे वर्गमूळ) याची माहिती आवश्यक आहे. या कूट प्रश्नाचेही साधार स्पष्टीकरण पुस्तकात गणितींची माहिती देताना दिली आहे.

प्राचीन भारतीय ज्योतिर्गणित आणि पंचांग गणित याविषयीही सविस्तर माहिती देण्यात आली आहे. गणिताच्या इतिहासात ज्योतिर्गणित गणितापासून वेगळे करता येणारच नाही अशा प्रकारे या दोन्ही शस्त्रांचा एकत्र प्रवास झालेला आहे. वैदिक काळात चांद्रवर्ष आणि सौरवर्ष यातील भेद लक्षात घेऊन ‘अधिक मास धरण्याची व्यवस्था होती. वैदिक काल इ.स.पूर्व ५००० वर्षे इतका जुना मानला जातो. इ.स.पूर्व ३००० या काळातील ऐतरीय ब्राह्मण ग्रंथात वर्षाचे सहा ऋतू, महिन्याचे शुक्ल आणि कृष्ण पक्ष तसेच सूर्य चंद्र बृहस्पती शुक्र आणि २७ नक्षत्रे यांचा उल्लेख आहे. हा फक्त ढोबळ उल्लेख आहे , त्यात अजून खोल जाता येईल इतके ज्ञान आहे.

गणिताचा जन्म या भूमीत झाला हे सिद्ध करण्याची गरज का पडावी ? याचे कारण मध्यंतरीच्या काळात आपले वैदिक ज्ञान लुप्त झाल्याने आणि युरोपात १६ ते १९ व्या शतकात गणित शास्त्रात बरीच प्रगती झाल्याने युरोपियांनी एक खोटाच गणेतिहास जगापुढे मांडला. त्यांच्या मते ग्रीकांच्या आधी अंकगणित नव्हते, डायफांटसच्या आधी बीजगणित नव्हते आणि पायथागोरसच्या आधी भूमिती नव्हती! पण हे त्यांचे सर्व दावे बखशाली हस्तलिखित  मिळाल्यामुळे  फोल ठरले आहेत.

बखशाली हस्तलिखित  इ.स. तिसऱ्या शतकातील असून भारताच्या उत्तर पश्चिम सीमेवरील बखशाली (पेशावरजवळील मार्दन जिल्ह्यात) खेड्यात एका शेतकऱ्याला पाण्यासाठी जमीन खोदताना सापडले. भूर्ज पत्रावर लिहिलेला हा ग्रंथ होता. एका जाडजूड दगडाच्या त्रिकोणी आकाराच्या भिंती, खालीवर शिळा ठेवून बंदिस्त केलेले असे पेटाऱ्यासारखे त्या शेतकऱ्याला सापडले. आत एक पोकळी होती आणि ७० भूर्जपत्रे होती. या ग्रंथात गणिताविषयी प्रचंड माहिती आहे आणि हे जेव्हा उघड झाले तेव्हा गणित विश्वात खळबळ माजली कारण तोपर्यंतचे गणित ज्ञान हे इसवीसनानंतरचे होते आणि या हस्तलिखिताने ते ज्ञान त्याही आधीपासूनचे आहे हे सांगितले! 

पुढील प्रकरणात भारतात आर्यभट प्रथम याच्याविषयी विस्तृत माहिती आली आहे.

सूर्य स्थिर असून पृथ्वी त्याच्या भोवती फिरते असे सांगणारा आर्यभट पहिला !एका वर्षात ३६५.२५८ दिवस असतात हे त्याने सांगितले. सूर्य पृथ्वी आणि चंद्र यांच्यातील अंतर त्याने सांगितले. विश्वासंबंधी माहिती देणारा आर्यभट याने स्वत:बद्दल एका अक्षरही लिहून ठेवले नाही. डॉ. भाऊ दाजी लाड यांनी जंग जंग पछाडून ‘आर्यभटीय’ या ग्रंथाचा शोध लावला आणि डॉ.केर्न यांनी १८७५ मध्ये हॉलंडमध्ये प्रकाशित केला. मात्र आर्यभट याचा दुसरा ग्रंथ ‘ तंत्र हा मात्र मिळाला नाही हे दुर्दैव! मानवीय ज्ञानाच्या क्रांतीतील दोन महत्त्वाचे शोध म्हणजे

१)पृथ्वी स्वत:च्या अक्षाभोवती फिरत असते आणि २) पृथ्वी आणि इतर ग्रह हे सूर्याभोवती फिरतात. या दोन महत्त्वाच्या मुद्यावरून ज्ञानाने प्रगती केली! आर्यभट हा पहिला आचार्य ज्याने आपल्या ‘ज्योतिषसिद्धांत या ग्रंथात अंकगणित, बीजगणित आणि रेखागणिताचे प्रश्न दिले. वर्ग, वर्गक्षेत्र, घन, घनफळ, घनमूळ, वर्गमूळ, त्रिकोण, वृत्तचित्ती

वर्तुळ अशी अनेक सूत्रे आणि नियम त्याने दिले आहेत. त्याने ० अंशापासून ९० अंशापर्यंतचे भूज-ज्या ( SINE TABLE) दिले आहे!   

त्यानंतर येतो वराहमिहिर! त्याच्या आसपास प्रद्युम्न हाही गणिती होता. त्याशिवाय लाटदेव,  नि:शंक, विजयनंदिन, सिंह, पांडुरंग हेही महत्त्वाचे गणिती होऊन गेले.  वराहमिहीर याचे ‘पंचसिद्धांतिका’ ‘सिद्धांतपंचक’ असे ग्रंथ प्रसिद्ध आहेत.   फलज्योतिष छंद सोडून त्याने जर पदार्थाच्या गुणधर्माचाच अभ्यास केला असता तर वराहमिहीर हा जगातील पहिला पदार्थ वैज्ञानिक ठरला असता.  भारताने विज्ञानात युरोपला मागे टाकले असते.  गुरुत्वाकर्षणाच्या अस्तित्वाची जाणीव त्यानेच प्रथम करून दिली! असे त्याच्याबद्दल खूप सांगता येईल.

‘आर्यभट याच्या सर्व सिद्धांताचे खंडन करणारा बंडखोर गणिती’ अशी प्रसिद्धी मिळविण्याचा ध्यास घेणारा ब्रह्मगुप्त हा आर्यभटचा टीकाकार. त्याने तीन ग्रंथ लिहिले १) ब्रह्मस्फुट सिद्धांत २) खंड- खाद्यक ३) उत्तर खंड-खाद्यक . या ग्रंथात आधीचा काही ग्रंथांवर टीका आहे अंकगणित, बीजगणित यावरही टीका आहे. अकराव्या अध्यायात त्याने इतकी दूषणे दिली आहेत की त्याला ‘दूषणाध्याय ‘ असेच म्हणावे लागेल.

भास्कर (प्रथम), लल्ल, पद्मनाथ, श्रीधर, माधव, मुंजल आणि शतानंद असे आणखीन काही गणिती होऊन गेले. त्यांचे नाव आपण जरी ऐकले नसतील तरी प्रत्येकाने आपापल्या परीने गणितात मोलाची भर घातली आहे.

द्वितीय आर्यभट याचे ‘कटपयादि’ सूत्र प्रसिद्ध आहे. त्याने एकच ग्रंथ लिहिला. या ग्रंथात पाटी – गणित किंवा अंकगणित आहे. त्यासाठी त्याने दशमान पद्धती आणि ० ते ९ आणि १० असे अंक वापरले आहेत.

‘लीलावती हा ग्रंथ लिहिणारे गणिती भास्कर द्वितीय किंवा भास्कराचार्य म्हणून प्रसिद्ध आहेत. वरील सर्व उल्लेखित ग्रंथाचा एक विशेष असा सांगता येईल की या ग्रंथांत गणित आणि काव्य हे हातात हात घालूनच आले आहेत. संख्या संकेत हा भास्कराचार्य यांचा विशेष होता.’ सिद्धांत शिरोमणी  हा त्यांचा पहिला ग्रंथ. या ग्रंथावर अनेक टीका उपलब्ध आहेत. ‘करणकुतूहल’ हा त्यांचा दुसरा ग्रंथ. आणि जगप्रसिद्ध असलेला ‘लीलावती’ हा त्यांचा तिसरा ग्रंथ! ‘लीलावती’

या ग्रंथात अंकगणित, क्षेत्रमापन, घनमापनश्रेढी, अंकपाश, पाक्षिक आणि सर्वांशिक विपर्यय हे विषय आहेत.  लीलावती ही त्यांची लाडकी कन्या. यासंबंधी कथा अशी की, भास्कराचार्य हे गणिती होते तसेच ते ज्योतिषीही होते आणि आपली कन्या विवाहानंतर विधवा होणार हे त्यांना कळले होते म्हणून त्यांनी असा मुहूर्त काढला की ज्यावर विवाह झाला असता तिला सौभाग्य लाभेल पण नियती अशी की तिच्या मस्तकावर पडलेल्या अक्षता ओघळून घटिकापात्रात पडल्या आणि ते घटिकापात्र दोन पळेआधीच बुडाले आणि नेमका तो क्षण तिचा वैधव्याचा मुहूर्त होता आणि खरोखरीच लीलावती वर्षभरात विधवा झाली! या लाडक्या आणि दुर्दैवी कन्येसाठी त्यांनी ग्रंथाला ‘लीलावती’ हे नाव दिले. गणिताच्या इतिहासात आपल्याबरोबर तिलाही त्यांनी स्थान दिले. ‘लीलावती’तील सर्व विषयांचा उल्लेख करणे शक्य नाही पण अनेक विषय त्यात आहेत. त्याच्यावर अनेक टीकाही उपलब्ध आहेत. भास्कराचार्य उत्तम कवीही होते. पावसाळ्यात राजहंस मानससरोवराकडे जातात ह्यावरून त्यांनी काव्यात एक गणित रचले, ‘सुवर्ण गणित’ यात त्यांनी सुवर्ण धातूबद्दल किती किती लिहिले आहे, शुद्धतेपासून किमतीपर्यंत! हिंदू धर्माच्या साऱ्या श्रद्धा आणि कल्पना भास्कराचार्यांच्या गणितातून डोकावतात. ते दोन अर्थी काव्याची रचना करतात. ‘लीलावती हा गणिती ग्रंथ असला तरी ते एक श्रेष्ठ काव्यही आहे!

बाराव्या शतकातच भारतातील गणिताला ओहोटी लागली. नवीन गणित काही लिहिले गेले नाही. जे कोणी गणिती या काळात होते त्यांनी नवीन काही न शोधता जुन्या ग्रंथांवर टीकाच लिहिली.यातील काही नावे अशी – महादेव पहिला, महेंद्रसुरी, दामोदर, गणेश दैवज्ञ, नृसिंह धुंडिराज, कृपाराम, रंगनाथ, दिनकर, ज्ञानराज, सूर्य, अनंत प्रथम, महादेव दुसरा, लक्ष्मीदास, कृष्ण दैवज्ञ, मुनीश्वर रंगनाथ, दिवाकर नृसिंह, कमलाकर, असे आणखीन काही!

असे असले तरी पुढच्या काळात काही जणांनी गणिताचा झेंडा फडकवत ठेवला आहे. ते म्हणजे जयसिंह, चिंतामणी दीक्षित (१७३६) नारायणदादा भातगावकर(१७३८) , विनायक उर्फ केरो नाना छत्रे (१८२४) रघुनाथाचार्य चिंतामणी (१८२८) बापुदेव शास्त्री ( १८२९) कृष्णशास्त्री गोडबोले( १८३१) मल्हार नारायणशास्त्री थत्ते ( १८४०) व्यंकटेश बापूजी केतकर (१८५३) शंकर बाळकृष्ण दीक्षित(१८५३) विनायक पांडुरंग खानापूरकर ( १८५८) सुधाकर कृपाल द्विवेदी (१८६०) शिवकर बापूजी तळपदे ( १८६४)

त्यानंतर THE GREAT श्रीनिवास रामानुजन (१८८७)! त्यांची स्मरणशक्ती, बालपणापासून अभ्यासाचा ध्यास गणिताचा नाद यातून त्यांनी पृथ्वीची लांबी रुंदी मोजली, परिघ मोजला! रामानुजन यांनी काय शोधले यासाठी हा ग्रंथ मुळात वाचायला हवा ..

लोकमान्य टिळक हेही गणितीच होते! ‘ वेदिक क्रोनोलोजी अॅंड वेदांग ज्योतिष हा त्यांचा ग्रंथ त्यांच्या  मृत्युनंतर प्रसिद्ध झाला. ‘ओरायन’ हा त्यांचा ग्रंथ, ओरायन हे तारकापुंजाचे नाव आणि मृगशीर्ष पुंजाच्या  अग्रायण या नावावरून ओरायन आले आहे. अखेरीस डॉ. जयंत नारळीकर यांच्या विश्व उत्पत्तीच्या संशोधनाची  माहिती आणि नारळीकरांचे गणितातील योगदान याचा आहे!

हुश्श .. हा अत्यंत त्रोटक परिचय आहे ... कदाचित वाचूनही दमला असाल .. पण हे वाचून वाचकांत उत्सुकता निर्माण झाली तर मला आनंद वाटेल!             

शेवटचे एक भरतवाक्य.. पृथ्वीवरील एकूण वाळूच्या सर्व कणांची मोजदाद करता येईल, असे लेखक म्हणतात!!! ८४ चा २८ घात म्हणजे १६४ अंकी संख्या तिचा शीर्षप्रहेलिका असा उल्लेख आहे !

 

Sunday, January 11, 2026


पुस्तक परिचय (१) 

आकारावरून  आणि प्रकाशनाच्या नावावरून हे पुस्तक लहान मुलांसाठी आहे, असे वाटेल; पण प्रत्यक्षात हे पुस्तक सर्वांनी वाचावे असेच आहे.
दुसऱ्या महायुद्धाशी संबंधित असंख्य पुस्तके अनेक भाषांत आहेत, हेही पुस्तक त्याच संबंधात असून देखील अत्यंत वेगळे आहे.
ज्यू लोकांवरील अनन्वित अत्याचार हे दुसऱ्या महायुद्धाचे व्यवच्छेदक लक्षण ! ज्यू लोकांचे जे हत्याकांड झाले त्याला हॉलोकॉस्ट असे म्हणतात. अनेक छळ छावण्या, गॅस चेम्बर्समधून जवळपास ६० लक्ष लोकांना ठार करण्यात आले. महायुद्ध संपल्यावर या हत्याकांडातून वाचलेल्या लोकांनी आपल्या  कहाण्या जगासमोर मांडल्या, या हत्याकांडात १५लक्ष लहान मुले बळी गेली..
युद्धानंतर अनेक देशांत या हॉलोकॉस्टसंबंधी अनेक संग्रहालये उभारण्यात आली. जपानमध्ये एका सहृदयी गृहस्थाने ' टॉकीयो  हॉलोकॉस्ट एज्यूकेशन रिसॉर्स सेंटर' उभे केले जेणेकरून लोकांना खरी माहिती मिळावी. येथे एक संग्रहालयदेखील होते आणि या संग्रहालयाची देखरेख करणारी फ्यूमिको इशिओका ही अतिशय धडपडी मुलगी होती. आपल्या संग्रहालयात हॉलोकॉस्टसंदर्भात काही वस्तू हव्यात  यासाठी तिने जगभरच्या संग्रहालयात, ‘ काही वस्तू पाठवा ’ अशी विनंती करणारी पत्रे ईमेल पाठविले. आणि एके दिवशी छळ छावणी म्हणून कुप्रसिद्ध असलेल्या ओउसश्विट्स या शहरातील संग्रहालयाकडून एक पार्सल आले ज्यात होता एक पायमोजा, बूट,, लहान स्वेटर आणि विषारी वायूचा रिकामा डबा! आणि एक सूटकेस! त्या सूटकेसवर नाव होते हॅना ब्रॅडी 1१६ मे १९३१ .खाली जर्मन भाषेत उल्लेख होता ' अनाथ '! ( WaisnKInd)
ही सूटकेस जेव्हा जपानच्या संग्रहालयात आली तेव्हा फ्यूमिकोसह सर्वच जणांना ' ही हॅना कोण?' असा प्रश्न पडला आणि हिचे काय झाले असेल असेही वाटले. फ्यूमिकोने  हॅनाचा शोध घेण्याचे ठरवले.
हॅना ( वय ९)आणि तिचा भाऊ जॉर्ज (वय ११) हे आईवडिलांसह चेकोस्लाव्हाकियातील एका लहान गावात राहत होते. युद्ध सुरु झाल्यावर काही दिवसांनी जर्मन सैनिकांनी या मुलांच्या आईवडिलांना पकडून नेले. या लहान मुलांना कळलेच नाही की त्यांना कुठे नेले. गावातील एक सहृदयी लुडवीक दाम्पत्याने या दोन लहान मुलांचा सांभाळ केला  पण काही दिवसांनी या दोन्ही मुलांनाही पकडण्यात येते आणि लहान मुलांसाठी असलेल्या छावण्यात ठेवण्यात नेले. तिथे या दोघांची ताटातूट झाली आणि ही लहानगी हॅना आपला भाऊ कुठे गेला म्हणून शोध घेत छावणीत हिंडत असे.. काही दिवसांनी या छावणीतील सर्वांना दुसऱ्या छावणीत नेण्यात आले  तेव्हा रेल्वे स्टेशनवर हॅनाला तिचा भाऊ क्षणभर दिसला  पण भेट झाली नाही. पुढे त्या दुसऱ्या छावणीत हॅनाचा दुर्दैवी अंत झालाअशी ही सर्व हृदय पिळवटून टाकणारी कथा ! पण ही कथा इथेच संपत नाही.....

जपानच्या संग्रहालयात जेव्हा हॅनाची सूटकेस आल्यावर तिथली चुणचुणीत फ्युमिको, हॅनाचा शोध घेण्यासाठी जिवाचे रान केले.  अनेक प्रयत्नानंतर ती एका अशा एका  ठिकाणी येऊन पोहोचते जिथे
0000 ज्यू कैद्यांची माहिती असते. त्यात तिला हॅना ब्रॅडी आणि तिचा भाऊ जॉर्ज ब्रॅडी या दोघांची नावे दिसली आणि हॅनाच्या तसेच आणखीन कित्येक नावापुढे बरोबर अशी खूण केलेलीही दिसली. अधिक चौकशीअंती तिला कळले की ज्यांच्या नावापुढे टिक मार्क आहे त्या सर्वांना मारण्यात आले आहे! तिला खूप वाईट वाटते की हॅनाला मारण्यात आले पण जॉर्जच्या नावापुढे मात्र तशी खूण नव्हती! म्हणजे हॅनाचा भाऊ जिवंत आहे!
आता शोध सुरू होततो जॉर्जला शोधण्याचा, आणि तिला जॉर्ज सापडतो कॅनडामध्ये! हर प्रयत्नाने ती जॉर्जशी संपर्क साधते आणि त्याला टोकियोला आणते. तो आता 72 वर्षांचा असतो! तो येतो, जपानमधल्या मुलांशी बोलतो आणि जेव्हा सूटकेस पाहतो तेव्हा तो म्हणतो की हे सूटकेस हॅनाची नाही! झाले होते असे की हॅनाला मारण्यापूर्वी तिच्या सामानाचे फोटो काढलेले असतात आणि संग्रहालय बनवताना त्या फोटोवरून ती सूटकेस बनवलेली असते.

अशी ही हृदय पिळवटून टाकणारी कथा, मला हे एवढे लिहितानाही अश्रू आवरत नव्हते. म्हणून त्यातील काही प्रसंग लिहिण्याचे टाळले.

 हॅनाला जेव्हा लहान मुलांच्या छळ छावणीत होती तिथे या लहान मुलांकडून काही कामे करून घेतली जात. खायला एखादा पाव किंवा पचपचीत सूप दिले जाई.  हॅनाची भूक भागात नसे तेव्हा तिथलाच एक दयाळू माळी तिला एखादा टॉमॅटो किंवा असेच काहीतरी खायला देई. तिथे हॅना जमेल तेव्हा चित्रे काढायची. ती चित्रेही या टोकियोच्या संग्रहालयात आहेत.मी हे सर्व अत्यंत त्रोटक लिहिले आहे कारण त्यातले प्रसंग लिहिले तर वाचकांच्या डोळ्यातही अश्रू येतील. पुस्तकात फोटो आहेत तेही पाहून मन गलबलून जाते. पुस्तक प्रेमींनी हे पुस्तक आवर्जून वाचावे.  

वाचकांपैकी कोणी जर टोकियोला गेलात तर आवर्जून या संग्रहालयाला भेट द्या. मानवतेच्या इतिहासातील एक अत्यंत काळाकुट्ट अध्याय म्हणजे दुसरे महायुद्ध होय!

 

 

 


Wednesday, January 3, 2024




 चलो जम्मू .. !।

डोंबिवलीतील ‘हम ट्रस्ट’ कडून जम्मू आणि आसपासच्या राजौरी, पुंछ येथील  ‘विद्या भारती’ आणि ‘भारतीय शिक्षा समिती’ या संस्थांच्या मार्फत जे समजोपयोगी प्रकल्प चालविले जातात त्या प्रकल्पांना भेट देण्यासाठी ७ ऑक्टोबर २०२३ ते १४ ऑक्टोबर २०२३ असा दौरा आयोजित केला होता.. पावगीसाहेबांच्या सूचनेवरून मी या दौऱ्यात  सहभागी झालो आणि एक अतिशय छान अनुभव माझ्या पोतडीत जमा झाला, त्याचेच हे वर्णन ! आम्ही  १६ जण  होतो’

 सकाळी १०.१५ च्या विमानाने दुपारी १ च्या सुमारास जम्मूला पोहोचलो..तिथे कार्यरत असलेले संगीता आणि मनोज नशिराबादकर यांची भेट झाली आणि त्यांनी आम्हाला .’भारतीय शिक्षा समितीशी संलग्न असलेल्या ‘सेवा भारती’च्या कार्याची माहिती दिली.

वाघा बॉर्डर बहुतेक सर्वांना माहीत आहे पण सुचेतगड सीमा फारशी माहीत नाही. सुचेतगड येथे भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये केवळ तारेचे कुंपण आहे अर्थात सीमा सुरक्षा चोकी आहेच आणि वाघा सीमेवर ज्याप्रमाणे आपल्या जवानांचे  संचालन होते त्याचप्रमाणे येथेही अतिशय सुंदर संचालन होते, जवानांनी कमालीच्या कौशल्याने विविध प्रकार दाखवले एवढेच नव्हे तर लष्करातील  श्वान पथकही तिथे होते आणि दोन श्वानांनी सुंदर कसरती केल्या. हे सगळे पाहणे हा अवर्णनीय  आनंद होता. जम्मूतील सुप्रसिद्ध रघुनाथ मंदिर हे १८७३ मधील असून अतिशय देखणे आणि प्रचंड मोठे आहे. मंदिराच्या भिंतीवर काश्मीरच्या इतिहासासंबंधी सखोल माहिती असलेले फलक आहेत.

जम्मू येथे सर्वात महत्त्वाची भेट म्हणजे पंकजादीदी यांची. पकंजादीदी मूळच्या दक्षिण भारतातील पण फारच लहान वयात त्या नागपूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सहभागी झाल्या आणि समाजसेवेचे कंकण हाती बांधून संघाच्या आदेशावरून  जम्मूत काम करण्यासाठी आल्या आणि अनेक मुलांच्या त्या आई झाल्या. दहशतवाद्यांच्या गोळीबारात ज्यांचे पालक मारले गेले अशा अनेक मुलामुलींचे पालकत्व पंकजादीदी यांनी स्वीकारले आहे. “ अदिती सेवा प्रतिष्ठान” ही त्यांची संस्था असून त्यामार्फत त्या हे उदात्त कार्य करीत आहेत. त्या मुलांची केवळ राहण्याची व्यवस्था त्या करीत नाहीत तर त्यांच्या शिक्षणाची व्यवस्थादेखील त्या बघतात. आम्ही गेलो तेव्हा तिथे बारा तेरा जण होते आणि त्यात एम.ए. करणारी  एक मुलगी होती जिला लहानपणीच गोळी लागली होती. पायाभूत कार्य करणाऱ्या पंकजादीदी या एकट्याच नाहीत तर आणखीनही बरेच जण आहेत.

जम्मूपासून १९ किलोमीटर दूर भारत पाकिस्तान सीमेच्या आत पाच सात  किलोमीटर अंतरावर मुलींसाठी “दृष्टी” नावाचे  वसतिगृह होते, ७ ते १७ वयोगटातील जवळपास १९ मुली होत्या. या सर्व मुली जम्मूच्या आसपास राहणाऱ्याच पण आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील होत्या. या वसतिगृहात त्या मुलींची शिक्षणासह  व्यवस्था केली जाते. इथे कॉम्प्युटर रूम होती, मुलींना खेळण्यासाठी आत आणि बाहेर साधने होती, झोपण्यासाठी बंक बेड होते, मुख्य म्हणजे मोठ्या मुली लहान मुलींची काळजी घेतात. राजौरी येथेही अशा प्रकारचे मुलांचे वसतिगृह होते . एका अतिशय चुणचुणीत मुलीने आम्हाला या वासतिगृहाची सर्व माहिती सांगितली. एवढेच नव्हे तर प्रार्थनेची वेळ झाली तसे तिने अत्यंत नम्रपणे आपण आधी प्रार्थना करू असे सांगितले आणि क्षणात सर्व मुली प्रार्थनेला जमल्या.

अतिरेक्यांची जास्त भीती आणि दहशत असलेला भाग म्हणजे राजौरी आणि  पूंछ, तिथल्या डंगरी  या गावातील एका  शाळेला आम्ही भेट दिली. भारतीय शिक्षा समितीमार्फत चालविली जाणारी  ही  शाळा सर्व साधनांनी युक्त आहे,  प्रयोगशाळा, ग्रंथालय वगैरे सोयी आहेत; दहशत आहेच, पण तरीदेखील शाळा निर्धाराने सुरू आहे. कौशल्य विकास शिकवले जाते..  इथल्या शिक्षकांना अत्यंत कमी पगार आहे त्यामुळे शिक्षक मिळणे, दुर्गम प्रदेश या अडचणीतून निष्ठावान कार्यकर्ते शाळा नेटाने चालवीत आहेत.

या शाळेनंतर दोन कुटुंबांना आम्ही भेटलो. काही महिन्यांपूर्वी या दोन कुटुंबतील तीन तरुण मुलांना अतिरेक्यांनी समोरून गोळ्या घालून मारले होते. हे ऐकताना डोळ्यात पाणी  दाटले होते तर मनात संताप .. त्या कहाण्या ऐकताना अंगावर काटा येत होता..

राजोरी येथे नतमस्तक व्हावे असे एक ठिकाण म्हणजे बलिदान भवन!  १९४७ सलो फाळणी झाल्यावर या गावावर गुंडांनी हल्ला केला तेव्हा प्रतिकारात पुरुष मारले गेले आणि त्यांच्या स्त्रियांनी गुंडांच्या हाती लागू नये म्हणून विहिरीत जीव दिला , त्याची आठवण म्हणून इथे बलिदान स्तंभ उभारला  आहे, त्यावेळच्या दंगलीतील वाचलेली त्यावेळची एक मुलगी आता जवळपास ८५ वर्षांची आम्हाला  भेटली. तिला अजूनही सर्व आठवते.       

पूंछ येथील भारत पाकिस्तानी सीमारेषेवर पोहोचलो. दोन किलोमीटर दूर थांबलो होतो. या सीमारेषेवरून दोन्ही देशात स्थानिक मालाचा थोडाफार व्यापार चालतो. येणाऱ्या जाणाऱ्यांची  तपासणी येथे झाल्यावर त्यांना प्रवेश दिला  जातो.  ( LOC TRADE CENTER) सीमारेषेपासून थोड्या अंतरावर आजोटे युद्ध स्मृतिस्थळ आहे. अतिशय सुंदर बांधलेलें हे स्थळ  स्फूर्तिदायक आहे. आपली छाती अभिमानाने भरून येते.  तिथल्या मेघडंबरीत बसून आम्ही सावरकरांचे “जयोस्तुते “ हे मातृभूमीच्या  स्तवनाचे उच्च रवात  गायन केले. त्या स्थळावर उभारलेला भारतीय तिरंगा पाकिस्तानातूनही दिसतो!

इथल्या “रिवर व्यू” या हॉटेलमध्ये आम्ही उतरलो होतो त्याचे संबंधित रवी शर्मा हे इथले कार्यकर्ते आहेत. ते आमच्याबरोबर होते. त्यांचे बंधु सुधीर शर्मा यांनी आम्हाला “रोहित शर्मा मेमोरियल ट्रस्ट” येथे नेले. ज्यांच्या नावाने हा ट्रस्ट स्थापन केला आहे ते रोहित शर्मा हे अतिरेक्यांना कंठस्नान घालून हुतात्मा झाले होते. या ट्रस्टची स्थापना श्री अली आणि त्यांची पत्नी शाहिस्ता तबस्सुम यांनी केली असून इथे पंतप्रधान कौशल्य विकास योजना,   शिलाई शिक्षण दिले जाते. श्री अली यांना या कार्यासाठी अनेक वेळा धमक्या आल्या आहेत. तिथेच पुलित्स नदीच्या काठावर असलेल्या एक सेंटरवर काही मुली शिलाई काम शिकत होत्या. ती शिलाई मशीन्स हम ट्रस्टनेच दिलेली होती.

एक महत्त्वाचे ठिकाण म्हणजे आखरोट येथील विस्थापित  पंडितांची कॉलनी.! १९९० ला काश्मीरमधून विस्थापित झालेल्या पंडितांसाठी ही कॉलनी उभारण्यात आली होती. आम्हाला  त्या पंडितांपैकी काही जण भेटले, त्या कॉलनीच्या हॉलमध्ये एक फिल्म दाखविण्यात आली जी “काश्मीर फाइल्स “ पेक्षाही करूण  होती. ज्या पंडितांनी हे सर्व प्रत्यक्ष भोगले ती माणसे  आमच्या आसपास होती. त्यांची घरे त्यांच्या डोळ्यादेखत जाळली गेली, अत्याचार  केले गेले ; ते सर्व त्या फिल्ममध्ये होते ते पाहताना  अंगावर शहारे येतात.      

बाकी जम्मू आणि आसपासची बरीच मंदिरे रामेश्वर मंदिर, कृष्ण मंदिर, काशी विश्वेश्वर मंदिर,मार्गात लागलेली दोन सुंदर  प्राचीन शंकर मंदिरे, बुढा अमरनाथ, नवग्रह मंदिर असे सर्व [याहून तिथला सुंदर निसर्ग आणि मनाला चटका लावणारे वास्तव अनुभवले.

डोंबिवलीतील मनोज आणि संगीत नशिराबादकर दाम्पत्य मागील काही वर्षे तिथे कार्यरत आहे. जम्मू काश्मीरला भेट देणाऱ्या मंडळींनी विद्या भारती आणि भारतीय शिक्षा समिति यांनी चालविलेल्या कार्यासही आवर्जून भेट द्यावी.       

 

   .           .