Monday, June 22, 2020

कवी कुलगुरू कालिदासाचे कवित्व:

आषाढ महिना सुरु होण्याआधीच कवी कालिदासाची आठवण यायला लागते. उद्या आषाढ महिन्याचा पहिला दिवस म्हणजे

‘आषाढस्य प्रथम दिवसे मेघमाश्लीष्टसानु

वप्रक्रीडापरिणतगजप्रेक्षणीयं ददर्श ...  

या श्लोकाची आठवण येते.

कालिदासाच्या संदर्भात अनेक आख्यायिका आहेत. त्या सर्वांचे सार एकच की एक राजकन्येच्या नशिबी एक मतिमंद मुलगा नवरा म्हणून येतो आणि ती त्याचा धिक्कार करून हाकलून देते. पुढे हाच तरुण देवीची आराधना करून सरस्वतीला प्रसन्न करून घेतो आणि पुढे फार मोठा कवी म्हणून प्रसिद्ध होतो.

त्या आख्यायिका सांगण्यापेक्षा प्रतिभा, श्रुत आणि अभियोग या गुणांनी अलंकृत झालेले त्याचे कवित्व, सहज आणि उत्पाद्य प्रतिभेचा कुशल आविष्कार,आणि शीघ्रकवित्व याचे एक उदाहरण पाहण्यासारखे आहे.

भोजराजा आणि कालिदास यांच्यात  मैत्रीचे नाते होते. एकदा भोजराजाने कालिदासाला म्हटले की,

‘तुम्ही नेहेमी माझ्या स्तुतीपर काव्य करता तर एखादवेळेस माझ्या मृत्यूवर काही काव्य लिहा.’

राजाच्या सूचेनेचे कालिदासाला अत्यंत वाईट वाटले आणि तो धारा नगरी सोडून वेश पालटून  अन्यत्र राह्यला गेला.

बरेच दिवस कालिदास दरबारात न आल्य्मुळे अस्वस्थ झालेला भोजराजा कालिदासाला शोधत  वेश पालटून फिरत फिरत नेमका कालिदासाच्या निवासस्थानी आला. दोघांनीही एकमेकांना ओळखले नाही. कालिदासाने त्याला विचारले’आपण कुठून आलात?’

‘मी धारा नगरीतून आलो आहे’ असे राजाने उत्तर दिल्यावर कालिदासाने लगेच विचारले

‘धारा नगरी कशी आहे ?’

‘धारा नगरीत भोजराजा मृत्यू पावला आहे’ असे भोजराजाने सांगितल्यावर अत्यंत दु:खी झालेल्या

कालिदासाच्या मुखातून काव्यपंक्ती बाहेर पडल्या

“अद्य धारा निरा धारा निरालम्बा सरस्वती

पंडिता: खंडिता:  सर्वे भोजराजा दिवंगते” म्हणजे भोजराजाचा मृत्यू झाल्यामुळे धारा नगरी पोरकी झाली असून सरस्वती (कला काव्य)अनाथ झाली आहे;

त्या उत्स्फूर्त ओळी ऐकून भोजराजाची खात्री पटली की हाच कालिदास! त्याला मिठी मारून भोजराजा म्हणाला “मित्रा, मी भोजराजा!” ते त्याचे शब्द ऐकून दु:ख विसरून आनंदित झालेल्या

कालिदासाच्या तोंडून पुन्हा उत्स्फूर्त उद्गार बाहेर पडले

“अद्य  धारा सदा धारा सदालम्बा सरस्वती

पंडिता: मंडिता: सर्वे भोजराजा भुवंगते” म्हणजे भोजराजा पृथ्वीवर राज्य करीत असल्यामुळे

धारा नगरी आणि पंडित, सरस्वती आधारयुक्त सुशोभित झाले आहेत.

आधीच्याच ओळीतील शब्दात किंचित बदल करून कालिदासाने शीघ्र काव्य रचले.

अशा या व्युत्पन्न कालिदासाने ‘ऋतुसंहार’(लघुकाव्य), ‘कुमारसंभव, रघुवंश’ ही महाकाव्ये,

‘मेघदूत’ हे खंडकाव्य तसेच ‘मालविकाग्निमित्रम्’ ‘विक्रमोर्वशीयम्’ आणि सर्वात प्रख्यात असे

‘अभिज्ञानशाकुंतलम्’ अशी तीन नाटके इतके साहित्य निर्माण करून रसिकांना न संपणारा आनंद दिला आहे.

आपल्या सर्वच साहित्यातून नवरसांचे परिपोषण करणाऱ्या कालिदासाने आपल्या साहित्यातून  शुद्ध, सात्विक प्रेमाचे, अशरीरी प्रेमाचे महत्त्व अधोरेखित केले आहे.

कालिदासाची अखेर मात्र अतिशय दुर्दैवी पद्धतीने झाली. श्रीलंकेत एका नर्तिकेने त्याचे हत्या केली आणि त्याच्या साहित्यावर प्रेम करणाऱ्या कुमारदास याने आत्यंतिक दु:खाने कालिदासाच्या चितेवर उडी मारून आपलेही जीवन संपविले.        

कालिदासाला आणि त्याच्या साहित्याला वंदन...!

सुरेश देशपांडे -८३५६०३१७१० / E mail-scd2000@gmail.com                               

  

 


Tuesday, June 9, 2020

एका कवीची भेट...!

१९७२/७३ ची गोष्ट असेल. त्यावेळेस डोंबिवली किती लहान होती! आधुनिक जीवनपद्धतीचा स्पर्श अजून व्हायचा होता. साधी माणसे, साधी राहणी, आर्थिक मान तसे बेताचेच पण गाव मनाने श्रीमंत! कोणाच्याही घरी जर एखादा चांगला कार्यक्रम, म्हणजेशास्त्रीय संगीताची मैफल म्हणा किंवा काव्यवाचनाचा तर आपण ओळखदेख नसताना देखील जाऊ शकत होतो, त्यात ना जाणाऱ्याला कमीपणा वाटत असे ना यजमानाला ओझे वाटत असे.

अशाच एका संध्याकाळी मला कळले की सरखोतांच्या घरी साक्षात बाकीबाब बोरकर, पुरुषोत्तम पाटील आणि वा.रा.सोनार येणार आहेत आणि रात्री त्यांचे काव्यवाचन होणार आहे. अशी संधी नेहेमी येत नाही हो, मोठ्या उत्साहाने मी त्या कार्यक्रमाला गेलो आणि आयुष्यभर लक्षात राहील असा तो कार्यक्रम अनुभवला!  

बोरकर नेहेमीच्याच उत्साहाने, आपल्या अनुनासिक स्वरात कविता म्हणत होते, अगदी

“माझ्या गोव्याच्या भूमीत...” पासून ते “सरीवर सारी आल्या गं, गोपी सचैल न्हाल्या गं” इथपर्यंत! हे लिहिताना आजदेखील माझ्या अंगावर काटा येतो! त्यांचा आवाज कानात घुमायला लागतो!

बोरकरांनंतर अमळनेरच्या वा. रा. सोनार यांनी कविता म्हटल्या, त्याही कविता छानच होत्या; त्यातील (बहुधा) ‘खिडकी नावाची कविता मला आठवतेय.

पण मला सांगायची आठवण आहे ती पुरुषोत्तम पाटील यांची.

त्यांनीही त्यांच्या काही रचना सादर केल्या, त्यातील एक कविता, आता त्या कवितेचे शब्द माझ्या लक्षात नाहीत पण आशय मात्र लक्षात आहे, त्या कवितेत पुरुषोत्तम पाटील

असं म्हणतात: कोकणातल्या एका सुंदरशा खेडेगावातील एक तरुणी जिने नुकतेच तारुण्यात

पदार्पण केले आहे अशी, पहाटेच्या वेळी आपल्या चंद्रमौळी घरामागील न्हाणीघरात आंघोळ करतेय. आता ते न्हाणीघर म्हणजे केळीचे खांब लावून आडोसा उभा केलेला! अशा त्या न्हाणीघरात आंघोळीला गेलेल्या त्या तरुणीला स्पर्श करण्यासाठी सूर्याच्या किरणांची लगबग सुरु असते आणि या इथे पुरुषोत्तम पाटील यांच्यातील कवी असं म्हणतो

“त्या दिवसापासून सूर्यकिरणांच्या रंगात भांडणे सुरु झाली म्हणतात!” या शेवटच्या ओळीने कविता एकदम उंचीवर पोचली! आणि त्या ओळीचा अर्थ लक्षात यायला काही क्षण लागले आणि मग टाळ्यांच्या कडकडाटाचा  उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला!

ही कविता, हा आशय माझ्या अजूनही लक्षात आहे, आणि या कवितेमुळे पुरुषोत्तम पाटील हे नावही लक्षात राहिले.

पुढे जवळपास २५/२६ वर्षांनी पुरुषोत्तम पाटील पुण्याला एक पुस्तकांच्या दुकानात भेटले.

अर्थात  मी त्यांना ओळखले नाही पण दुकानाच्या मालकांनी त्यांची ओळख करून दिली.

पुरुषोत्तम पाटील म्हटल्यावर मी चटकन उभा राहिलो, त्यांना नमस्कार केला आणि त्यांनाच वरील कविता अनेक वर्षांपूर्वी ऐकल्याचे सांगितले आणि ती कविता अजूनही लक्षात आहे असं सांगितल्यावर त्यांना खूप आनंद झाला. एका रसिकाने आपल्या साहित्याची आठवण अनेक वर्षे आपल्या मनाशी जपून ठेवावी यातच त्या साहित्यकृतीचे यश तर आहेच पण ती साहित्यकृती निर्माण करणाऱ्याचेही यश आहे!

अशा रसिकांच्यासाठीच तर साहित्यकृती निर्माण होत असतात!

सुरेश देशपांडे