Tuesday, December 29, 2020

 

द्वारा: सुरेश देशपांडे/बँक ऑफ इंडिया/ पत्ता: बी-१२,आसावरी, गुप्ते रस्ता, विष्णूनगर,डोंबिवली (प)४२१२०२/मो. ८३५६०३१७१०                    

नाते बँकींगपलीकडले......(Relation Beyond Banking…!)

मी बँक ऑफ इंडियात ४० वर्षे एक दिवस नोकरी करून सप्टेंबर २०१४मध्ये निवृत्त झालो.

आता माझे स्वत:चे छंद जोपासत आणि  जुन्या आनंददायी स्मृतींच्या स्मरणरंजनात रमत मी माझा वेळ व्यतीत करत असतो. बऱ्याचदा असंही वाटतं की ते दिवस किती छान होते!किती अडचणी आल्या, त्यातून कसे निभावून गेलो,बँकींग क्षेत्रातील किती बदलांना सामोरे गेलो, अनेक शाखांतून काम करताना भेटलेले सहकारी आणि विविध प्रकारचे ग्राहक या सर्वांच्या आठवणी,अनुभव हे माझ्या जीवनाचे संचित झाले. आणि हे सगळं अनुभव संचित मनाच्या तळाशी साठवत निवृत्तीची वेळ कधी आली हे कळलंच नाही.!   

आता पुलाखालून इतकं पाणी वाहून गेलं असलं तरी कधी एखाद्या निवांत संध्याकाळी शांतपणे बसलो असताना मनाच्या तळाशी साठलेले आठवणीचे क्षण अचानकपणे तरंगत वर येतात आणि मला सुखावतात.

असाच एक हृदयस्पर्शी अनुभव मला अनेकदा आठवतो.

त्या वेळेस मी मांडवी शाखेत स्पेशल असिस्टंट म्हणून सुरक्षित जमा कक्ष विभागात कार्यरत होतो. सुरुवातीचे काही दिवस कामाचे स्वरूप समजून घेण्यात आल्यावर लक्षात आले की अनेक ग्राहकांनी आपल्या कक्षाचे भाडे अनेक वर्षे भरलेच नव्हते. मी अशा ग्राहकांची यादी करून ज्यांचे  फोन क्रमांक उपलब्ध होते त्या सर्वांना फोन करून भाडे भरण्याविषयी सूचित केले, ज्यांचे फोन क्रमांक नव्हते अशांना पत्र पाठवले.

एकदा असाच मी  फोन केला. समोरच्या व्यक्तीने फोन उचलल्यावर मी त्या व्यक्तीला सुरक्षित जमा कक्षाचे भाडे भरण्याविषयी सांगितले. त्या व्यक्तीने उत्तर दिले की सुरक्षित जमा कक्ष ज्या व्यक्तीच्या नावावर आहे ते त्यांचे वडील होते आणि त्यांचे काही वर्षांपूर्वीच निधन झाले होते. फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीला असा काही सुरक्षित जमा कक्ष आहे हेही माहीत नव्हते, तरीदेखील वडिलांच्या नावावर आहे म्हणून ती व्यक्ती बँकेत येऊन सर्व व्यवहार पूर्ण करण्यास तयार होती.

त्याप्रमाणे ते गृहस्थ बँकेत आले. मला भेटले, मी त्यांना त्यांच्या वडिलांच्या सुरक्षित जमा कक्षाचे भाडे किती थकले आहे ते सांगितल्यावर  त्यांनी सर्व पैसे भरले एवढेच नव्हे तर सुरक्षित जमा कक्ष रद्द करण्याविषयीची औपचारिकता पूर्ण केली. दरम्यान ते माझ्याशी बोलत होते. त्यांचे वडील माथाडी कामगार होते, आई गृहिणी होती आणि आईवडिलांनी  बरेच कष्ट करून या मुलांना शिकविले होते. गरिबी होती पण मुलांना त्यांनी काही कमी पडून दिले नव्हते आणि आता मुले चांगली मार्गाला लागलीत तर ते पाहायला  त्यांचे आईवडील हयात नव्हते. त्यांच्या बोलण्यात ती खंत आणि आई वडिलांविषयी खूपच प्रेम, जिव्हाळा जाणवत होता. बोलता बोलता मी त्यांच्या वडिलांच्या नावाचे कार्ड सहज म्हणून त्यांना दाखवले . कार्डावर त्यांच्या वडिलांचा आणि आईचा फोटो होता. तो फोटो पाहाताच त्या व्यक्तीच्या चेहऱ्यात फरक पडला, ते भावूक झाले आणि त्यांच्या डोळ्यात हळूहळू अश्रू जमा व्हायला लागले, माझ्या हातून त्यांनी कार्ड घेतले, काही न बोलता बराच वेळ कार्डाकडे पाहत ते बसले आणि मग मला गदगददलेल्या स्वरात म्हणाले “साहेब, माझ्या वडिलांचा आणि आईचा एकही फोटो आमच्याकडे नाही, हा फोटो मला द्याल का?”      

त्या गृहस्थाच्या सर्व प्रतिक्रिया मी ते आल्यापासून न्याहाळत होतो. केवळ वडिलांच्या नावावर काही व्यवहार बाकी होतं म्हणून ते आले होते, ते आले नसते तरी बँक त्यांना काहीच करू शकत नव्हती पण आपल्या वडिलांचे काहीतरी

आहे या भावनेतूनच त्यांनी व्यवहार पूर्ण केला होता. त्यांच्या आईवडिलांविषयीच्या भावनेची कदर, जाणीव मला निश्चितच होती. मी त्या गृहस्थांना आईवडिलांचा फोटो दिला, त्यांनी तो कपाळाला लावून आपल्या खिशात ठेवला आणि लाख मोलाचा ऐवज मिळाल्याच्या आनंदात ते गेले. मला वाटते माझ्या कृतीने ‘नाते बँकींगपलीकडले’ या माझ्या संस्थेच्या ‘बँक ऑफ इंडियाच्या’ ब्रीदाला मी जागलो आणि व्यवहारापलीकडेही माणुसकीचे म्हणून एक नाते असते ते नाते मी जपले...!

सुरेश देशपांडे/बँक ऑफ इंडिया/ पत्ता: बी-१२,आसावरी, गुप्ते रस्ता, विष्णूनगर,डोंबिवली (प)४२१२०२/मो. ८३५६०३१७१०                    

Monday, July 13, 2020

साक्षात्कार...!
खरंतर मी लिहित असलेल्या अनुभवाला साक्षात्कार म्हणावे की आणखी काही म्हणावे हे कळत नाही पण अनुभव मात्र विलक्षण होता; कदाचित अनेकजणांना अशा प्रकारचा अनुभव आला असण्याची शक्यता आहे; कदाचित थोडा वेगळ्या प्रकारचा पण अशाच साच्यात मोडणारा.
२००६ साली सोलापूरला भरलेल्या साहित्य संमेलनासाठी मी गेलो होतो. सोलापूरला 
गेलो की अजंठा लॉजमध्ये माझा मुक्काम असायचा. पण या वेळेस गेलो तर मला खोली मिळाली नाही. खोली नाही म्हटल्यावर मी नाराज झालो होतो, माझा चेहरा पाहून मालक म्हणाले की,
‘तुम्ही नेहेमीच इथे येता तर तुमची व्यवस्था करतो.स्वतंत्र खोली नाही पण सामाईक खोली चालेल का? दोनच कॉटस् आहेत त्या खोलीत आणि आधीच एक प्रवासी तिथे आहेत, बघा चालत असेल तर’
फक्त रात्रीचाच आणि सकाळच्या आन्हिकाचाच तर प्रश्न होता. ‘चालेल’ मी म्हटले आणि  
खोलीत गेलो. सकाळी उठलो तर ते सहप्रवासी खोलीत नव्हते. खोलीत मी एकटाच होतो.
त्या दिवशी शनिवार होता आणि दर शनिवारी मारुतीरायांचे दर्शन घ्यायचे हा माझा परिपाठ. आता सोलापूरला मारुतीरायांचे मंदिर कुठे शोधायचे, बघू लॉजच्या माणसाला विचारू असं मनाशी म्हणत मी माझे आवरण्याच्या मार्गाला लागलो. 
एवढ्यात खोलीतील सहप्रवासी आंघोळ वगैरे उरकून आले, माझ्याकडे बघून सौम्यसे  
हसले. त्यांनी टेबलाखालची त्यांची बॅग काढली, टेबलावर ठेवली. बॅगेचे झाकण उघडून 
सरळ उभे केले, मग आतून मारुतीरायांचा मोठा फोटो बाहेर काढला. झाकणाला टेकवून  उभा केला आणि त्यांनी हनुमान चालीसा म्हणायला सुरुवात केली. मला मनोमन आश्चर्य वाटले की मी मनात मारुतीरायांचे मंदिर कुठे आहे असा विचार करतो आहे तर प्रत्यक्ष मारुतीरायांनीच मला इथे दर्शन दिले! त्या सहप्रवाशाचे स्तोत्र पठण होईस्तोवर मी बसून राहिलो.मग माझ्याकडे वळून ते मला प्रसाद द्यायला लागले तर मी त्यांना म्हणालो, मी पण आवरून घेतो मग प्रसाद घेईन आणि मी येईपर्यंत मारुतीरायांना इथेच राहू दे! 
माझे आवरून झाल्यावर मी दर्शन घेऊन प्रसाद घेतला.त्यावेळेस ते गृहस्थ मला म्हणाले की  
माझ्याजवळ हनुमान चालीसाची एक प्रत मी नेहेमी ठेवतो ती तुम्हाला देतो. त्यांनी त्यांच्या 
बॅगेत खूप शोधलं पण प्रत काही सापडली नाही. खूपच नाराज झाले ते. मी म्हटलं, एवढे नाराज होऊ नका, मी घेतो ना बाहेरच्या दुकानातून किंवा संमेलनाच्या ठिकाणी ग्रंथ प्रदर्शनातून. स्वत:शी त्यांनी कशीबशी समजूत घातली पण मला म्हणाले ‘पुढच्या वेळेस 
भेटलात की नक्की मी तुम्हाला हनुमान चालीसा देईन.’
त्यानंतर ते गृहस्थ त्यांच्या वाटेने गेले मी माझ्या वाटेने. पुढील वर्षी तुळजापूरला जाण्यासाठी म्हणून मी आणि माझी पत्नी सोलापूरला शुक्रवारी रात्री आलो आणि नेहेमीप्रमाणे आम्ही अजंठा लॉजमध्येच उतरलो. यावेळेस आम्हाला तळमजल्यावर स्वतंत्र खोली मिळाली. 
सकाळी आवरून खोलीबाहेर आलो आणि लक्षात आले, अरे! आज शनिवार,आणि मला मागच्या वर्षी इथेच भेटलेल्या त्या गृहस्थांची आठवण झाली. मी माझ्या पत्नीला मागच्या वर्षीचे सर्व बोलणे सांगत असतानाच अचानक तेच गृहस्थ जिना उतरून येताना मला दिसले  मला पाहताच ते इतक्या वेगाने खाली आले की मला भीती वाटली की ते पडतील की काय?
मला पाहून त्यांना झालेला आनंद हा त्यांच्या बोलण्यातून, वागण्यातून जाणवत होता,  माझ्याजवळ आल्यावर माझे हात घट्ट पकडून ते म्हणाले, ‘अहो, मला पहाटेपासून तुमची आठवण येत होती, सारखं मनात येत होतं की आज तुमची भेट होणार म्हणून आणि तुम्ही भेटलात, इथेच थांबा तुमच्यासाठी मी हनुमान चालीसाची नवी प्रत घेऊन ठेवलीय ती घेऊन येतो’ असं म्हणत ते गृहस्थ धावत पुन्हा वर गेले आणि प्रत घेऊन आले.     
मला हनुमान चालीसाची प्रत देताना त्यांचे डोळे भरून आले होते, मारुतीरायांनी हे सर्व घडवून आणले असा त्यांचा विश्वास होता.
मला वाटतं अशा सश्रद्ध समजाने माणसांना जगण्याचे बळ मिळत असावे, आजच्या व्यामिश्र, अनिश्चित जगात जीवनाचे ताणेबाणे सैल करण्याचे, जगण्याचे भान आणि कदाचित जगण्याला अर्थ देण्याचे, मानसिक समाधान देण्याचे सामर्थ्य असलेल्या या समजांना अंधश्रद्धा तरी कसे म्हणायचे?      
कोणी याला योगायोग म्हणतील,कोणी टेलीपथी म्हणतील पण साक्षात्काराच्या पातळीवर आलेला हा अनुभव मला समृद्ध करून गेला हे निश्चित!

सुरेश देशपांडे / ८३५६०३१७१० / E Mail: scd2000@gmail.com   
                  
              
             
                           

Monday, June 22, 2020

कवी कुलगुरू कालिदासाचे कवित्व:

आषाढ महिना सुरु होण्याआधीच कवी कालिदासाची आठवण यायला लागते. उद्या आषाढ महिन्याचा पहिला दिवस म्हणजे

‘आषाढस्य प्रथम दिवसे मेघमाश्लीष्टसानु

वप्रक्रीडापरिणतगजप्रेक्षणीयं ददर्श ...  

या श्लोकाची आठवण येते.

कालिदासाच्या संदर्भात अनेक आख्यायिका आहेत. त्या सर्वांचे सार एकच की एक राजकन्येच्या नशिबी एक मतिमंद मुलगा नवरा म्हणून येतो आणि ती त्याचा धिक्कार करून हाकलून देते. पुढे हाच तरुण देवीची आराधना करून सरस्वतीला प्रसन्न करून घेतो आणि पुढे फार मोठा कवी म्हणून प्रसिद्ध होतो.

त्या आख्यायिका सांगण्यापेक्षा प्रतिभा, श्रुत आणि अभियोग या गुणांनी अलंकृत झालेले त्याचे कवित्व, सहज आणि उत्पाद्य प्रतिभेचा कुशल आविष्कार,आणि शीघ्रकवित्व याचे एक उदाहरण पाहण्यासारखे आहे.

भोजराजा आणि कालिदास यांच्यात  मैत्रीचे नाते होते. एकदा भोजराजाने कालिदासाला म्हटले की,

‘तुम्ही नेहेमी माझ्या स्तुतीपर काव्य करता तर एखादवेळेस माझ्या मृत्यूवर काही काव्य लिहा.’

राजाच्या सूचेनेचे कालिदासाला अत्यंत वाईट वाटले आणि तो धारा नगरी सोडून वेश पालटून  अन्यत्र राह्यला गेला.

बरेच दिवस कालिदास दरबारात न आल्य्मुळे अस्वस्थ झालेला भोजराजा कालिदासाला शोधत  वेश पालटून फिरत फिरत नेमका कालिदासाच्या निवासस्थानी आला. दोघांनीही एकमेकांना ओळखले नाही. कालिदासाने त्याला विचारले’आपण कुठून आलात?’

‘मी धारा नगरीतून आलो आहे’ असे राजाने उत्तर दिल्यावर कालिदासाने लगेच विचारले

‘धारा नगरी कशी आहे ?’

‘धारा नगरीत भोजराजा मृत्यू पावला आहे’ असे भोजराजाने सांगितल्यावर अत्यंत दु:खी झालेल्या

कालिदासाच्या मुखातून काव्यपंक्ती बाहेर पडल्या

“अद्य धारा निरा धारा निरालम्बा सरस्वती

पंडिता: खंडिता:  सर्वे भोजराजा दिवंगते” म्हणजे भोजराजाचा मृत्यू झाल्यामुळे धारा नगरी पोरकी झाली असून सरस्वती (कला काव्य)अनाथ झाली आहे;

त्या उत्स्फूर्त ओळी ऐकून भोजराजाची खात्री पटली की हाच कालिदास! त्याला मिठी मारून भोजराजा म्हणाला “मित्रा, मी भोजराजा!” ते त्याचे शब्द ऐकून दु:ख विसरून आनंदित झालेल्या

कालिदासाच्या तोंडून पुन्हा उत्स्फूर्त उद्गार बाहेर पडले

“अद्य  धारा सदा धारा सदालम्बा सरस्वती

पंडिता: मंडिता: सर्वे भोजराजा भुवंगते” म्हणजे भोजराजा पृथ्वीवर राज्य करीत असल्यामुळे

धारा नगरी आणि पंडित, सरस्वती आधारयुक्त सुशोभित झाले आहेत.

आधीच्याच ओळीतील शब्दात किंचित बदल करून कालिदासाने शीघ्र काव्य रचले.

अशा या व्युत्पन्न कालिदासाने ‘ऋतुसंहार’(लघुकाव्य), ‘कुमारसंभव, रघुवंश’ ही महाकाव्ये,

‘मेघदूत’ हे खंडकाव्य तसेच ‘मालविकाग्निमित्रम्’ ‘विक्रमोर्वशीयम्’ आणि सर्वात प्रख्यात असे

‘अभिज्ञानशाकुंतलम्’ अशी तीन नाटके इतके साहित्य निर्माण करून रसिकांना न संपणारा आनंद दिला आहे.

आपल्या सर्वच साहित्यातून नवरसांचे परिपोषण करणाऱ्या कालिदासाने आपल्या साहित्यातून  शुद्ध, सात्विक प्रेमाचे, अशरीरी प्रेमाचे महत्त्व अधोरेखित केले आहे.

कालिदासाची अखेर मात्र अतिशय दुर्दैवी पद्धतीने झाली. श्रीलंकेत एका नर्तिकेने त्याचे हत्या केली आणि त्याच्या साहित्यावर प्रेम करणाऱ्या कुमारदास याने आत्यंतिक दु:खाने कालिदासाच्या चितेवर उडी मारून आपलेही जीवन संपविले.        

कालिदासाला आणि त्याच्या साहित्याला वंदन...!

सुरेश देशपांडे -८३५६०३१७१० / E mail-scd2000@gmail.com                               

  

 


Tuesday, June 9, 2020

एका कवीची भेट...!

१९७२/७३ ची गोष्ट असेल. त्यावेळेस डोंबिवली किती लहान होती! आधुनिक जीवनपद्धतीचा स्पर्श अजून व्हायचा होता. साधी माणसे, साधी राहणी, आर्थिक मान तसे बेताचेच पण गाव मनाने श्रीमंत! कोणाच्याही घरी जर एखादा चांगला कार्यक्रम, म्हणजेशास्त्रीय संगीताची मैफल म्हणा किंवा काव्यवाचनाचा तर आपण ओळखदेख नसताना देखील जाऊ शकत होतो, त्यात ना जाणाऱ्याला कमीपणा वाटत असे ना यजमानाला ओझे वाटत असे.

अशाच एका संध्याकाळी मला कळले की सरखोतांच्या घरी साक्षात बाकीबाब बोरकर, पुरुषोत्तम पाटील आणि वा.रा.सोनार येणार आहेत आणि रात्री त्यांचे काव्यवाचन होणार आहे. अशी संधी नेहेमी येत नाही हो, मोठ्या उत्साहाने मी त्या कार्यक्रमाला गेलो आणि आयुष्यभर लक्षात राहील असा तो कार्यक्रम अनुभवला!  

बोरकर नेहेमीच्याच उत्साहाने, आपल्या अनुनासिक स्वरात कविता म्हणत होते, अगदी

“माझ्या गोव्याच्या भूमीत...” पासून ते “सरीवर सारी आल्या गं, गोपी सचैल न्हाल्या गं” इथपर्यंत! हे लिहिताना आजदेखील माझ्या अंगावर काटा येतो! त्यांचा आवाज कानात घुमायला लागतो!

बोरकरांनंतर अमळनेरच्या वा. रा. सोनार यांनी कविता म्हटल्या, त्याही कविता छानच होत्या; त्यातील (बहुधा) ‘खिडकी नावाची कविता मला आठवतेय.

पण मला सांगायची आठवण आहे ती पुरुषोत्तम पाटील यांची.

त्यांनीही त्यांच्या काही रचना सादर केल्या, त्यातील एक कविता, आता त्या कवितेचे शब्द माझ्या लक्षात नाहीत पण आशय मात्र लक्षात आहे, त्या कवितेत पुरुषोत्तम पाटील

असं म्हणतात: कोकणातल्या एका सुंदरशा खेडेगावातील एक तरुणी जिने नुकतेच तारुण्यात

पदार्पण केले आहे अशी, पहाटेच्या वेळी आपल्या चंद्रमौळी घरामागील न्हाणीघरात आंघोळ करतेय. आता ते न्हाणीघर म्हणजे केळीचे खांब लावून आडोसा उभा केलेला! अशा त्या न्हाणीघरात आंघोळीला गेलेल्या त्या तरुणीला स्पर्श करण्यासाठी सूर्याच्या किरणांची लगबग सुरु असते आणि या इथे पुरुषोत्तम पाटील यांच्यातील कवी असं म्हणतो

“त्या दिवसापासून सूर्यकिरणांच्या रंगात भांडणे सुरु झाली म्हणतात!” या शेवटच्या ओळीने कविता एकदम उंचीवर पोचली! आणि त्या ओळीचा अर्थ लक्षात यायला काही क्षण लागले आणि मग टाळ्यांच्या कडकडाटाचा  उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला!

ही कविता, हा आशय माझ्या अजूनही लक्षात आहे, आणि या कवितेमुळे पुरुषोत्तम पाटील हे नावही लक्षात राहिले.

पुढे जवळपास २५/२६ वर्षांनी पुरुषोत्तम पाटील पुण्याला एक पुस्तकांच्या दुकानात भेटले.

अर्थात  मी त्यांना ओळखले नाही पण दुकानाच्या मालकांनी त्यांची ओळख करून दिली.

पुरुषोत्तम पाटील म्हटल्यावर मी चटकन उभा राहिलो, त्यांना नमस्कार केला आणि त्यांनाच वरील कविता अनेक वर्षांपूर्वी ऐकल्याचे सांगितले आणि ती कविता अजूनही लक्षात आहे असं सांगितल्यावर त्यांना खूप आनंद झाला. एका रसिकाने आपल्या साहित्याची आठवण अनेक वर्षे आपल्या मनाशी जपून ठेवावी यातच त्या साहित्यकृतीचे यश तर आहेच पण ती साहित्यकृती निर्माण करणाऱ्याचेही यश आहे!

अशा रसिकांच्यासाठीच तर साहित्यकृती निर्माण होत असतात!

सुरेश देशपांडे   

     

     

 

 

 

 

                  

 


Saturday, April 25, 2020

जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने ...
१९८७ ते १९९९ असे सातत्याने तेरा वर्षे आम्ही आमच्या आरती प्रकाशनाच्या माध्यमातून
डोंबिवलीतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहात ग्रंथ प्रदर्शने भरवित असू. त्यावेळच्या दोन आठवणी पुस्तक दिनाच्या निमित्ताने लिहित आहेत.
रोज सकाळी ८.३० वाजता एक स्वच्छता कर्मचारी महिला सभागृह स्वच्छ करण्यास येत असे. एके दिव्षु तिच्याबरोबर तिची सात आठ वर्षांची मुलगीही आली होती, आणि ती मुलगी आईच्या पाठोपाठ हिंडत होती.
स्वच्छता करणाऱ्या महिलेला एका टेबलाखाली दोन तीन पुस्तके पडलेली आढळली. त्या स्त्रीने ती पुस्तके थोडावेळ धरण्यासाठी म्हणून आपल्या मुलीकडे दिली. ती लहान मुलगी
हातातील नवीन कोरी पुस्तके पाहून आनंदित झाली. आईला ती म्हणाली ही पुस्तके मी नेऊ का वाचायला? त्या कर्मचारी स्त्रीने पटकन मुलीच्या हातातील पुस्तके टेबलावर ठेवली आणि थोड्याशा रागाने म्हणाली “ ही पुस्तके काय आपली आहेत का आणि परवडणार आहे का आपल्याला? मी हे सर्व ऐकत होतो.
सर्व सभागृह स्वच्छ करून झाल्यावर त्या दोघी जात असताना मी त्या लहान मुलीला थांबवले आणि तिच्या वयाला शोभतील, तिला समजतील अशी चार पाच पुस्तके तिच्या हातात ठेवली. मी पुस्तके दिलेली पाहून ती स्त्री घाईघाईने म्हणाली “नको नको , अहो हिला
हट्ट करायची सवयच आहे आणि माझ्याकडे पैसेही नाहीत” तिच्या बोलण्यात आपल्या मुलीने फार काही अपराध केलाय असा भाव होता.
मी त्या स्त्रीला शांत करत म्हटलं “ ताई, तुम्ही काळजी करू नका, आणि मला ह्या पुस्तकाचे पैसेही नकोत, मी तिला ही पुस्तके भेट म्हणून देतोय, तिला वाचायची आवड आहे ना, घेऊन जा ती पुस्तके आणि वाचून झाल्यावर जर आणखीन काही पुस्तके हवी असतील तर तिला पाठवा” ती लहान मुलगी हत्तातील नवी कोरी पुस्तके पाहून हरखून गेली होती, यापूर्वी कदाचित तिने शालेय पुस्तकांव्यतिरिक्त पुस्तके बघितलीही नसतील. पुस्तकांवरून टाळत फिरवत, डोळे मोठे करून अपूर्व अशा आनंदात ती मुलगी हरवून गेली होती, हा सामौर्ण खजिना आपला आहे यावर तिचा विश्वास बसत नसावा.
तिचा आनंद पाहून आणि एक वाचक घडविण्यात माझा थोडासा हातभार लागल्याचे अमूल्य असे समाधान मला लाभले, नाही तरी प्रकाशक पुस्तके प्रकाशित करतो ती वाचकांनी वाचावी म्हणूनच ना! वाचनाचे एक रोपटे मी रुजवले याचे खूप समाधान आहे!
२) असेच एकदा पुस्तक प्रदर्शनात एक कॉलेज युवक पुस्तके पाहात हिंडत होता. आमच्या ग्रंथ प्रदर्शनात आम्ही पुस्तके विषयवार लावत असू. म्हणजे ऐतिहासिक, धार्मिक अशा प्रकारे
तर तो युवक फिरून फिरून पुन्हा पुन्हा ऐतिहासिक पुस्तकाच्या विभागात येऊन मराठी रियासतचे चारही खंड चालत होता. बराच वेळ तो तिथे रेंगाळलेला पाहून मी त्याला विचारले “हे खंड तुम्हाला हवे आहेत का?”
“घ्यायचे तर आहेत, पण माझ्याकडे पैसे नाहीत” (त्या खंडांची किमत रुन२०००/ होती)
मी त्या युवकाची ओळखदेख नसतानादेखील म्हटलं, “तुम्ही घेऊन जा हे खंड, पैसे जमतील तसे द्या”
त्याचा आधी माझ्या बोलण्यावर विश्वासच बसेना!
“पैसे न देता हे खंड तुम्ही मला देताय? आणि मी पैसे बुडवले तर?” त्याने आश्चर्यचकित होत मला विचारले
“हे बघा, तुम्ही जी पुस्तके निवडता आहात त्यावरून तुम्ही चांगले वाचका आहात हे लक्षात येतंय त्यामुळे तुम्ही पैसे बुडविणार नाहीत पण समजा बुडवलेत तर एका चांगल्या वाचकाकडे पुस्तके गेल्याचे समाधान मला मिळेल, त्या समाधानापुढे पैसे महत्त्वाचे नाही वाटत मला” असं मी त्याला उत्तर दिले.
त्या युवकाला खूप आनंद झाला. त्याने खिशात दोन चारशे रुपये जे काही होते ते मला दिले आणि मराठी रियासतचे चारही खंड त्याने नेले. पुढे त्याने पैसे आणून वगैरे दिले.
ही गोष्ट साधारण २५/२५ वर्षांपूर्वीची. मी विसरूनही गेलो होतो.
पण पाच सहा महिन्यांपूर्वी “अॅडॉल्फ हिटलर: दुसरे महायुद्ध, सत्य आणि विपर्यास” या (पृष्ठ संख्या ७५०, त्यातील संदर्भ ग्रंथांची पृष्ठे १२८, कॉंटिनेंटल प्रकाशन,पुणे) पुस्तकाचे लेखक,
श्री पराग वैद्य भेटले. आणि त्यांनी मला ही आठवण सांगून ते म्हणाले “२५/२६ वर्षांपूर्वी माझी ओळख नसतानाससुद्धा मला २००० ची पुस्तके तुम्ही मला दिलीत, त्यावेळचा कॉलेज युवक म्हणजे मीच! इतिहासावर मी आणखीन तीन पुस्तके लिहितोय, तुम्ही मला प्रोत्साहित केलेत.”
माझ्या एका लहानशा कृतीतून पुस्तक निर्मितीला मदत होतेय , पुस्तकदिन याचसाठी तर
साजरा करायचा!
सुरेश देशपांडे

Saturday, April 11, 2020

गंगा
----
दूरदर्शनवर गंगा नदीविषयीचा माहितीपट नुकताच बघितला. काही दिवसांपूर्वी डिस्कव्हरी वाहिनीवरदेखील अतिशय सुरेख असा माहितीपट पाह्यला होता.
त्या माहितीपटात काही परदेशी पर्यटक/अभ्यासक काशीहून प्रयागराजपर्यंत (अ्लाहाबाद) गंगा नदीतून प्रवास करत आले होते. त्यापूर्वी गंगा नदी, जी हिमालयातून प्रवाहित होत येते, प्रचंड खडक, मोठमोठे शिलाप्रस्तर यातून प्रवास करणारी गंगा प्रचंड वेगाने वाहत येते. बाजूला घनगर्द जंगल, उंच वृक्षांची दाटी आणि त्यात मध्येच एका निर्जन ठिकाणी एका साधूची मठी. या साधूने मागील अनेक वर्षात, वेगवेगळ्या वेळी काढलेले गंगा नदीचे फोटो आणि त्याचे संग्रह त्याच्या मठीत हरीने लावून ठेवले होते.
हे सर्व सांगण्याचा उद्देश असा की मला फार पूर्वीपासून गंगा नदीविषयी एक अनामिक कुतूहल वाटत आले आहे. एक प्रकारची ओढच म्हणा ना!
महाभारतातील कुरुवंशीय राजा भगीरथ याने अथक प्रयत्न करून या जीवनदायिनीला हिमालयातून जमिनीवर आणले. या नदीच्या सहाय्याने अनेक संस्कृती इथे बहरल्या, अनेक पिढयांचे जीवन फुलले, आपल्या देशाला सुजलाम सुफलाम केले, त्यामुळे आपल्या हिंदू आणि भारतीय संस्कृतीत गंगा नदीला असलेले अनन्यसाधारण महत्त्व!
मोक्षदायिनी गंगा, तापहरिणी गंगा, पापक्षालिनी गंगा शीतल जलवाहिनी गंगा, कुठे तिचे तिचे अतिशय सुंदर, रम्य शामल रूप तर कुठे तिचे रौद्र दर्शन! हरिद्वारला भेटणारी गंगा इतक्या वेगात वाहते की मोठमोठे दगडदेखील सहज वाहून जातात, प्रयागराजला यमुनेला गळामिठी घालणारी
गंगा एखाद्या ज्येष्ठ प्रेमळ बहिणीसारखी वाटते, कोलकत्त्याला तिचे पत्र एवढे विशाल आहे की महाक्य जहाजे त्यातून सहज प्रवास करतात.
गंगेविषयीच्या अनेक आख्यायिका, दंतकथा ऐकल्यामुळे मूळच्या कुतूहलात
भरच पडत गेली, ओढ वाढत गेली, गंगेच्या दर्शनाची उत्सुकता अस्वस्थ करत होती.
तसे तर १९७८ साली ऐन थंडीच्या दिवसात हरिद्वारला जाण्याचा योग आला होता, त्रिपुरी पौर्णिमेच्या दिवशी सायंकाळी, लक्ष लक्ष दिवे गंगेच्या प्रवाहात सोडले जात असताना, त्या थंडगार जलाचा चटका बसत असताना डोळे, नाक बंद करून डुबकी मारून मोक्षप्राप्तीचे पुण्य गाठी बांधले होतेच. पण त्याला आता ४० वर्षे उलटून गेली होती!
त्यामुळे कुठे गंगा, कुठे भागीरथी, कुठे जान्हवी, मंदाकिनी, अलकनंदा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गंगेच्या दर्शनाची आस मनात दाटत होती.
अर्थात त्यालाही एक भावनिक कारण होतेच!
माझे वडील, चिंतामणबुवा शिरवळकर कीर्तनकार होते. जवळपास पन्नास वर्षे त्यांनी कीर्तने केली. आपल्या कीर्तनात ते पंडितराज जगन्नाथ यांचे आख्यान लावीत असत. सलग आठ दिवस चालणाऱ्या या प्रासादिक चरित्रात पंडित जगन्नाथ यांच्या आयुष्याचा पट उलगडून दाखविला जात असे.
आंध्र प्रदेशातील एक लहानशा खेड्यात जन्मलेले जगन्नाथ पंडित दिल्लीच्या अकबर राजाच्या दरबारात नवरत्नांपैकी एक म्हणून गौरविले जातात. तिथे
अकबर आणि जोधाबाई यांची कन्या लवंगी त्यांच्या विद्वत्तेच्या आणि काव्याच्या प्रेमात पडते. त्यांचा विवाह होतो, पण हा विवाह कोणालाच मान्य नसतो आणि मग हे दोघेही अत्यंत पश्चात्तापदग्ध अंत:करणाने काशीला
गंगेच्या काठावर दशाश्वमेध घाटावर येतात. घाटाच्या सर्वात वरच्या पायरीवर उभे राहून जगन्नाथ पंडित अत्यंत आर्त भावनेने, अंत:करणातील करूण भावाने गंगेची स्तुती करायला सुरुवात करतात.(ते स्तोत्र म्हणजे गंगालहरी) आणि प्रत्येक श्लोकाबरोबर गंगा नदीचे पाणी एकेक पायरी वर येते आणि ५१ व्या श्लोक संपतो त्यावेळेस गंगा या दिघांना आपल्या प्रवाहात सामील करून घेते! असा हा सगळा चरित्र भाग माझ्या वडिलांच्या कीर्तनात मी जेंव्हा तबल्याला साथ करत असताना अनेक वेळा ऐकला होता. नि त्यामुळेही गंगेच्या दर्शनाची आस माझ्या मनात खूप आधीपासून होती.
तो योग तीन वर्षांपूर्वी आला!उत्तर भारतात सहलीला गेलो असताना
काशीविश्वेश्वराच्या दर्शनापेक्षा दशाश्वघाटावर उभे राहून गंगेचे डोळे भरून घेतलेले दर्शन हा चिरस्मरणीय क्षण होता! अनेक वर्षे मनाच्या तळाशी जपून ठेवलेले स्वप्न साकारले होते! माझे डोळे नकळत भरून आले, अनेक क्षण मी मूकपणे बसून होतो! मनाला शांत शांत वाटले ! मग उठून गंगेच्या आरती ला भक्तीभावाने हात जोडून उभा राहिलो. पुढे प्रयागलाही हीच गंगा पुन्हा भेटली! खूप कृतार्थ वाटले.
मागच्या वर्षी असाच पुन्हा योग आला!
आधी कानपूरला गेलो. तिथले बिर्लांचे कृष्ण मंदिर, सुधांशू महाराजांच्या आश्रमातील रामायण महाभारतातील देखावे, नानासाहेब पेशवे, टोपे यांचे संग्रहालय, कारगिल स्मारक यानंतर तिथेही गंगा भेटलीच! मग पुन्हा काशी,
प्रयाग!
अशी ही सर्वव्यापिनी गंगा, सतत मनात वाहणारी!
कालच्या दूरदर्शनवरच्या गंगेवरच्या माहितीपटाने या सर्व आठवणी मनात जागविल्या!
नाही तरी रोज स्नान करताना आपण गंगा सरस्वती या पवित्र नद्यांचे स्मरण करतोच ना!
सुरेश देशपांडे
खरे तर हे काही पावसाचे दिवस नाहीत, पण काळ रात्री थोडासा पाऊस पडून गेला होता. नेहेमीच्या सवयीने पहाटे उठलो, खिडकी उघडली तर छान उत्साह वाढवणारा गार वा आत आला.एकदम बरे वाटले! प्रसन्न, ताजे तवाने! इतके छान वाटत होते की काही तरी शुभमय,मंगलमय असं जाणवले, चित्तवृत्ती उल्हसित झाल्या
काल संध्याकाळपासून मनावर आलेले अशुभ मळभ, दाटून आलेली निराशा आणि काहीसं भीतीदायक वातावरण या सगळ्याचा मागमूस आताच्या या सकाळी नव्हता.वाटलं अरे! काळ उगीचाच आपण घाबरलो होतो, घाबरण्यासारखं काहीच तर नव्हतं.आहे ना, हा सुंदर प्रकाश देणारा सूर्य, ही प्रसन्न आशादायक सकाळ, हा उल्हसित करणारा वारा आहे! हे सर्व माझ्यासाठी, माझ्या जगासाठी किती स्फूर्तीदायक आहे!
वाटलं, अंधारानंतर प्रकाश येतोच! सकाळ उगवतेच!
आपल्याला वाटलं प्रलयकाळ आला आहे, सगळं संपलं आहे, पण नाही सृष्टीचं कालचक्र फिरतच राहते आहे . अनादी काळापासून अनादी काळापर्यंत! असे कित्येक क्षण, कित्येक युगे पाहिली असतील या सृष्टीने, पण कालचक्र फिरतच आहे अव्याहतपणे जशा समुद्राच्या लाटा, माघारी फिरल्या तरीही पुन्हा तितक्याच उत्कटपणे फेसाळत येणाऱ्या!
एक नवी उमेद, एक नवीन आशा दाखविणारा नवा दिवस, येणारच असतो प्रत्येकाच्या आयुष्यात, निराश, हताश व्हायचं काहीच कारण नाही. ठीक आहे, संकट आहे, मोठं संकट आहे पण प्रत्येक संकटावर उपाय असतोच ना! आपणही प्रयत्न करतोय, मनापासून केलेले प्रामाणिक प्रयत्न यशस्वी होतातच असा विश्वास आहे माझा!
दुसऱ्या महायुद्धाची गोष्ट घ्या. हिटलरच्या आक्रमणाखाली एकेक देश पराजित होत होता -पोलंडसारखा लहान देश, तो तर लगेच चिरडला गेला. पण एका छोट्या गावातील काही धाडसी तरुणांनी विरोध सुरु ठेवला. खरं तर हा विरोध म्हणजे महाभयंकर वादळवाऱ्यात लहानशी फडफडणारी पणती पेटविण्याचा प्रकार होता! पण पणती झाली काय किंवा मशाल झाली काय दोन्ही तेजाचीच रूपे! तेज आपला प्रभाव दाखविणारच ना?
पोलंडमधील या लहानशा गावातील तरुणांना लपण्यासाठी आश्रय देण्यासाठी कोरी टेन बूम नावाच्या दोन बहिणी पुढे आल्या. त्यांच्या मातीच्या घराच्या भिंती खूप रुंद होत्या, त्या भिंतीत कोनाडे आणि भुयारे तयार करून
क्रांतिकारी तरुणांना लपण्यासाठी सोय केली.
सांगायचा म्य्द्द हाच की संकट लहान असो, मोठे असो हातपाय गळून बसायचं नसतं. मानवी जीवनावरचा हा लढा सुरूच ठेवायला हवा. आधी एकटा असणारयाच्या पाठोपाठ "कारवाँ बनता चला आता है" आपण एकेक करून जर हे एकवीस दिवस यशस्वी केले तर विजय आपलाच आहे!
एक मात्र नक्की झाले.
हा आपला काळ सुरु होण्यापूर्वी बघा ना आपण सर्व जण किती मुक्तपणे हिंडत होतो, बोलत होतो, समारंभ, कार्यक्रम सर्व सुरु होते, आपण गर्दीत होतो परंतु तरीही आपण एकेकटेच होतो कारण सतत आपल्या हातात मोबाईल, व्हॉटस्अॅप, किंवा यु ट्यूब किंवा फोन! आपल्याबरोबर कोणी आहे, आपण कोणाच्या घरी आहोत, अगदी सिनेमा नाटकातदेखील सारखे तेच आणि तेच.! या सर्व गर्दीत असूनही, सोशल मिडीयावर असूनही आपण एकटेच होतो.
पण आता घरी बसल्यावर लक्षात येतेय की आपण किती अनमोल क्षणांना मुकलो होतो ते? कॉलेजात जाणाऱ्या आपल्या मुलीने नवीन ड्रेस दाखविला
होता का? विचारले तर म्हणाली तुम्हाला फोटो पाठविला होता ना; मुलगा जिमला जाऊन व्यायाम करतोय, म्हणाला तुम्हाला विचारूनच तर जिम लावली होती ! बायकोपण नोकरी करणारी पण ती घरचं सर्व आवरून अगदी ओटा वगैरे पुसून मुलांचा डबा वगैरे भरून आपल्या आधीही घरातून बाहेर पडत होती. आता लक्षात येतेय की ती किती काम करायची ते! आता घरी राहण्यामुळे कितीतरी दिवसांनी आम्हीचौघे आणि आई एकत्र जेवतोय, दुपारी झोपा काढतोय, पूर्वी कधीतरी आवडीने घेतलेली पुस्तके बाहेर आली, जुन्या कॅसेटस् ऐकल्या,
म्हणजे जेंव्हा गर्दीत होतो तेंव्हा एकटे होतो आणि आता एकेकट्याने राहूनही एकत्र येऊन लढा द्यायचा आहे!

Wednesday, April 8, 2020

महाभारत
-----------
महाभारत हा ग्रंथ म्हणजे एक अथांग नि अफाट असा महासागर आहे.आपल्या कल्पनेची दृष्टी पोचेल त्याहीपलीकडे त्याचा विस्तार असून त्याच्या तळापर्यंत पोचणे मानवी बुद्धीला अशक्य आहे.
महाभारतकर्ते महर्षी व्यास यांना आपण गुरू मानतो. इतस्तत: विखुरलेले वेदवाङ्मय त्यांनी एकत्र केले आणि विश्वाला एका महान,
अद्भुत , अद्वितीय अशा तत्त्वज्ञानाची ओळख करून देण्याचे कार्य त्यांनी केले. त्यानंतर महाभारत म्हणजेच 'कुरुकुलाचा' इतिहास 'जसे घडले तसे' त्यांनी लिहिला. हा इतिहास लिहिताना व्यासांनी आपल्या अलौकिक प्रतिभेचे डोळे दिपवून टाकणारे विलक्षण असे दर्शन घडवले.
महाभारत या महासागरातून आजवर अनेकांनी ज्ञानजल उपसून काढले आहे परंतु ते संपण्याचे अगर कमी होण्याचे नाव नाही.
अनेक प्रतिभावंतांना मोह पडणाऱ्या या महाभारतावर, महाभारतातल्या अनेक व्यक्तींवर, कला आणि साहित्यक्षेत्राच्या सर्वच प्रकारातून म्हणजे काव्य, कादंबरी, कथा, चरित्र या माध्यमातून शोध घेण्याचा प्रयत्न केला.
अगदी संत, पंत, तंत (मोरोपंत, वामन पंडित इ.) कवींपासून ते अलीकडील इरावती कर्वे, दुर्गाबाई, वि.स.खांडेकर, दाजी पणशीकर आणि अनेक साहित्यकारांनी वेगवेगळ्या दृष्टिकोनातून महाभारतावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. त्याद्वारे मानवी जीवनाच्या प्रेरणांचा, मानवी जीवनाच्या उद्दिष्टांचा, निर्मितीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, अनेक प्रकारे दोहन केले पण प्रत्येकवेळी वेगवेगळे नवनीत हाताशी आले; आणि इतके संशोधन, लेखन होऊनही महाभारत दशांगुळे वर उरलेच आहे!
मानवी जीवनातील भावभावनांचेअपेक्षांचे,त्यागाचे पावलोपावली दर्शन घडविणाऱ्या महाभारताकर व्यासांच्या लेखणीचे कौतुक करण्याइतपत माझा अधिकार नाही याची मला पूर्ण जाणीव आहे. पण आश्चर्य व्यक्त करताना मला असे जाणवते की महाभारतातील अनेक कथा, उपकथा यांची सुरुवात आणि शेवट ते घडवतातच! कोणताही धागा सुटत नाही, मग भीष्मांच्या प्रतिज्ञेचे कारण असो की शिखंडीचा जन्म असो ! आणि मुख्य म्हणजे असंख्य कथा उपकथांच्या माध्यमातून महाभारत पुढे नेताना व्यासांनी इतके विषय हाताळले आहेत की त्यांनी अत्यंत अभिमानाने असे म्हटले आहे की "व्यासोच्छिश्टम् जगत् सर्वम्'
"मी हे सर्व जग उष्टे करून सोडले आहे!!"
महाभारतात अनेक चमत्कार आहेत. विशेषत: महाभारतातील अनेकांचे जन्म हे अयोनिज आहेत;आणि व्यास या जन्मामागचे रहस्य उलगडून दाखवितात. तरीही अनेक अनेक रहस्ये तशीच राहिली आहेत ; न जाणो पुढील काळात महाभारतातील या न सुटलेल्या रहस्यांचादेखील उलगडा होऊ शकेल.
हे सर्व लिहिण्याचे कारण म्हणजे नुकताच मी डॉ. शांता गोखले यांचा
'यक्षप्रश्न' हा ग्रंथ वाचला. महाभारतातील स्त्रियांवरील, द्रौपदी, कुंती, सत्यवती, अंबा, अंबालिका,अंबिका, शकुंतला, रेणुका इत्यादी स्त्रियांवरील स्त्रीवादाच्या दृष्टिकोनातून लिहिलेला हा ग्रंथ अवश्य वाचावा. हा ग्रंथ वाचल्यावर आपल्या मनातही अनेक प्रश्न उभे राहतात.
त्या प्रश्नाच्या विचारातूनच वरील विचार सुचले.
सुरेश देशपांडे

Friday, April 3, 2020


एक हिरवीगार आठवण …!

मे महिन्याचे अखेरचे दिवस सुरू झाले की मन नकळत पावसाची वाट
पाहायला लागतं. ग्रीष्मातील असह्य उकाड्याने कासावीस झालेल्या मनाला ,
शरीराला ओढ लागते आकाशातून बरसणाऱ्या सजल धारांची.!
अमक्या ठिकाणापर्यंत मान्सून आलाय, येत्या तीन चार दिवसात पाऊस कोसळणार,
यंदा १०५% पाऊस पडेल असल्या मनाला आशा लावणाऱ्या हवामान खात्याच्या दाव्यांवर विश्वास बसतच नसतो, खात्री असते 'तो' येणार याची ! जिवलग सखा आहे तो, आणि तो नुसताच येणार नाही तर त्याच्या मैतराला, वाऱ्यालाही घेऊन सुसाट येणार !
मनाला दिलासा देणारा ,गात्रांना सुखावणारा ,नवनिर्मितीस उधाण आणणारा  
सुखद पावसाळा..!
पावसाळा हा प्रत्येकाचा आवडता ऋतू. प्रत्येक शहरातला ,प्रत्येक गावातला ,
एवढेच कशाला प्रत्येकाच्या मनातला पाऊसदेखील वेगळाच असतो ! आणि
पावसाचा आनंद लुटण्याची ,विशेषत: पहिल्या पावसाचा आनंद घेण्याची
प्रत्येकाची तऱ्हा देखील वेगळीच असते.

आभाळ भरून यावे ,दिशा अंधारून याव्यात ,वारा सुसाटत असावा ,गारवा मनाला ,
देहाला सुखवित असावा ,वातावरण धुंद व्हावे ,मनात एक अनामिक हुरहुर दाटून
यावी आणि धुवांधार पावसाला सुरुवात व्हावी , अशा भन्नाट वातावरणात मोकळ्या
माळरानावर कोसळणाऱ्या पावसात नखशिखांत भिजत फिरण्याची धुंदी काही औरच..!
किंवा,
किंवा अशाच वेळी आपण हायवेवरून मोटारीतून जात असावं ,समोर वळणावळणाचा
ओलाकंच काळाभोर रस्ता ,वायपर कितीही वेगात फिरले तरी समोरच्या काचेवरून
न थांबणाऱ्या पाऊसधारा मोती होऊन ओघळत असाव्या , अचानक एका वळणावर
डेरेदार वृक्षाखाली चहाची टपरी दिसावी - गाडी सर्रर्रदिशी वळवून झाडाखाली उभी
करून बाहेर यावं , चहाच्या टपरीवरील गरमगरम कांदाभजीबरोबर काचेच्या ग्लासमधून वाफाळणारा चहा फुर्रर्र करत पिण्याचा पावसाळी आनंदही काही औरच ..!
किंवा,
आपण अगदी वरच्या मजल्यावरील प्रशस्त बाल्कनीत बसलेलं असावं , अंगावर
शिरशिरी आणणारे जलतुषार हलकेच येत असावेत ,हातात उत्तम पुस्तक आणि
टेपवर घायाळ करणाऱ्या स्वरातील गझल मनाच्या कोपऱ्यात एखादी सलणारी आठवण ! ही एक पावसाळी मजाच..!

अशीच एक मनातील हिरवीगार आठवण ….
त्या दिवशी कामानिमित्ताने मुंबईला आलो होतो. जुलै महिन्याची सुरुवात होती.
मुंबई विद्यापीठातील माझी कामे उरकली त्यावेळेस दुपारचा एक वाजून गेला
होता. मला रेडिओ स्टेशनवर जायचं होतं . बाहेर भुरूभुरू पाऊस पडत होता.
विद्यापीठ आणि रेडिओ स्टेशन अंतर काही फार दूरचे नव्हते. विचार केला
 टॅक्सी करण्यापेक्षा मस्तपैकी रमतगमत जाऊ ;मुंबईचा पाऊस एन्जॉय करू असं मनाशी म्हणत पायीच जायचं ठरवलं .
मुबई विद्यापीठाच्या मागचा हायकोर्टकडील रस्ता क्रॉस केला की सुरेख असं ओव्हल
मैदान लागतं .ओव्हल मैदानातून पुढे गेलं की महर्षी कर्वे रस्ता नि तिथून पाच
मिनिटावर रेडिओ स्टेशन .
मी ओव्हल मैदानात शिरलो .मैदान क्रॉस करण्यासाठी तिथे आता छान अशा
चौकोनी फरशा बसविलेली पाऊलवाट आहे. त्या पाऊलवाटेवरून  चारसहा पावले
पुढे गेलो नि आजूबाजूस नजर टाकताच हरखून गेलो. वाटेच्या दुतर्फा मऊसूत
अशी कोवळी हिरवळ तरारून आलेली. त्या हिरवळीने डोळे सुखावले. गारवा मनास
जाणवला. (  हिरवेपण : दृश्यभान ; गार : मनातील जाणीव = हिरवेगार ) वाऱ्याच्या
मंद लहरीवर वाहणाऱ्या तृणांकुरांच्या लाटा पाहून मन आनंदलं..! त्या लुसलुशीत
गवताला स्पर्श करावासा वाटला. मग मी पायातील बूट काढले नि त्या हिरवळीवरून
अनवाणी चालू लागलो .हिरवळीचा मऊसूत ओला स्पर्श पायाच्या तळव्यातून सर्व
अंगभर पसरला, रोमारोमात भिनला, शरीरावर रोमांच उभे राहिले.

मनात विचार आला ,किती बरे वर्षे झाली असतील मातीचा स्पर्श सोडून ?निदान
पस्तीस तरी नक्कीच. शाळा संपल्यावर मातीशी संपर्कच उरला नाही .कारण
कॉलेजमध्ये गेल्यावर पायात बूट आले ते कायमचेच . राहण्याच्या ठिकाणीही सर्वत्र
फरशी आणि कोबा. आज या ओल्या मातीचा स्पर्श अनुभवताना वाटलं मागील अनेक वर्षे मी या अनमोल आनंदाला मुकलो. अनिमिष नेत्रांनी त्या हिरवळीकडे पाहात असतानाच कसं कुणास ठाऊक माझं बालपण मनात तरंगत वर आलं. पावसाळ्यातल्या अनेक ओल्या आठवणी मनात  पिंगा घालायला लागल्या, अंगणातल्या ओहोळातून सोडलेल्या कागदाच्या होड्या , वाढलेल्या गवतावर उडणारे जाळीदार पंखांचे चतुर ,पायऱ्यांवर दिसणारे हळूहळू चालणारी गांडुळे ,शाळा बुडवून, तुडुंब भरलेल्या विहिरीत मारलेल्या उड्या, कौलावरून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाच्या हाताएव्ह्ड्या जाडीच्या पागोळ्या,  मधेच निघणारे दिवड ,नानेटी सारखे पाणसर्प . एक ना अनेक आठवणी ! खरंच या पावसाने ,त्याच्या सुगंधाने वेड लागल्यासारखे झालं. सगळी कामं सोडून गेटवेवर जाऊन समुद्राच्या उसळणाऱ्या लाटा पाहात  बसावं असं मनात यायला लागलं.
मग हिरवळीवरून चालताचालता, आजूबाजूला कोण आहे नाही असा विचार न करता कोणी मला हसेल असाही विचार न करता बूट, मोजे काढले,अनवाणीच त्या हिरवळीवरून चाललो ,तळपाय छानपैकी ओले झाले,थंडावा शरीरभर पसरला, मी खाली बसलो . ओल्या गवतावरून अलगद हात फिरविले .
दोन्ही तळवे गच्च ओले करून घेतले .नवजात अर्भकाच्या टाळूवरील मुलायम
जावळाचा सुखद ,आनंददायक स्पर्शासारखा तो स्पर्श मला वाटला..! त्या हिरवळीचा
तो ओलावा ,तो गंध ,तो रंग,  निसर्ग किती मुक्तपणे आपलं वैभव उधळत असतो ,
ते पाहायला आपल्याकडे एक संवेदनशील मनही असायला हवं ना...!
आमच्या शाळेचा रस्ता शेताच्या बांधावरून जात असे .पावसाळ्यात त्या बांधावरून
जाताना नांगरलेल्या शेतातील काळ्याभोर मातीची मोठीमोठी ढेकळं विखुरलेली दिसत असत . उकरलेल्या मातीतून मस्त गंध येत असे.(पु. भा.भावे यांनी या मृद्गंधाला
'ला फांझ ' असा फ्रेंच शब्द योजिला होता, कदाचित समानार्थी असावा ) त्या वेळेस
त्या मातीची चवही चाखून बघितली होती. ती आठवण या क्षणी माझ्या मनात
ताजी झाली . आतादेखील पायाच्या अंगठ्याने मी माती उकरली ,हातात घेतली
नि दीर्घ श्वास घेऊन तो मृद्गंध मी छातीत भरून घेतला .

काही वेळाने मला भान आले, वास्तवाची जाणीव झाली, जड मनाने  मी पुन्हा माझ्या कामाकडे वळलो निघताना मन म्हणत होतं की कधीकधी एखादा दिवस असा उजाडतो की सकाळपासून कसं छानछान .ताजंतवानं वाटतं ,प्रसन्न वाटतं नि त्यातून असं अचानक हिरवेगार सौंदर्य अनुभवायला मिळाले तर ? खरंच ‘पाऊस म्हणजे आकाश गाणे ,सृष्टीचे ते हिरवे लेणे !!’
तुम्हीही पाहा ना असा  आनंद घेऊन …!

सुरेश देशपांडे ,E mail: scd2000@gmail.com /Mo 8356031710