साक्षात्कार...!
खरंतर मी लिहित असलेल्या अनुभवाला साक्षात्कार म्हणावे की आणखी काही म्हणावे हे कळत नाही पण अनुभव मात्र विलक्षण होता; कदाचित अनेकजणांना अशा प्रकारचा अनुभव आला असण्याची शक्यता आहे; कदाचित थोडा वेगळ्या प्रकारचा पण अशाच साच्यात मोडणारा.
२००६ साली सोलापूरला भरलेल्या साहित्य संमेलनासाठी मी गेलो होतो. सोलापूरला
गेलो की अजंठा लॉजमध्ये माझा मुक्काम असायचा. पण या वेळेस गेलो तर मला खोली मिळाली नाही. खोली नाही म्हटल्यावर मी नाराज झालो होतो, माझा चेहरा पाहून मालक म्हणाले की,
‘तुम्ही नेहेमीच इथे येता तर तुमची व्यवस्था करतो.स्वतंत्र खोली नाही पण सामाईक खोली चालेल का? दोनच कॉटस् आहेत त्या खोलीत आणि आधीच एक प्रवासी तिथे आहेत, बघा चालत असेल तर’
फक्त रात्रीचाच आणि सकाळच्या आन्हिकाचाच तर प्रश्न होता. ‘चालेल’ मी म्हटले आणि
खोलीत गेलो. सकाळी उठलो तर ते सहप्रवासी खोलीत नव्हते. खोलीत मी एकटाच होतो.
त्या दिवशी शनिवार होता आणि दर शनिवारी मारुतीरायांचे दर्शन घ्यायचे हा माझा परिपाठ. आता सोलापूरला मारुतीरायांचे मंदिर कुठे शोधायचे, बघू लॉजच्या माणसाला विचारू असं मनाशी म्हणत मी माझे आवरण्याच्या मार्गाला लागलो.
एवढ्यात खोलीतील सहप्रवासी आंघोळ वगैरे उरकून आले, माझ्याकडे बघून सौम्यसे
हसले. त्यांनी टेबलाखालची त्यांची बॅग काढली, टेबलावर ठेवली. बॅगेचे झाकण उघडून
सरळ उभे केले, मग आतून मारुतीरायांचा मोठा फोटो बाहेर काढला. झाकणाला टेकवून उभा केला आणि त्यांनी हनुमान चालीसा म्हणायला सुरुवात केली. मला मनोमन आश्चर्य वाटले की मी मनात मारुतीरायांचे मंदिर कुठे आहे असा विचार करतो आहे तर प्रत्यक्ष मारुतीरायांनीच मला इथे दर्शन दिले! त्या सहप्रवाशाचे स्तोत्र पठण होईस्तोवर मी बसून राहिलो.मग माझ्याकडे वळून ते मला प्रसाद द्यायला लागले तर मी त्यांना म्हणालो, मी पण आवरून घेतो मग प्रसाद घेईन आणि मी येईपर्यंत मारुतीरायांना इथेच राहू दे!
माझे आवरून झाल्यावर मी दर्शन घेऊन प्रसाद घेतला.त्यावेळेस ते गृहस्थ मला म्हणाले की
माझ्याजवळ हनुमान चालीसाची एक प्रत मी नेहेमी ठेवतो ती तुम्हाला देतो. त्यांनी त्यांच्या
बॅगेत खूप शोधलं पण प्रत काही सापडली नाही. खूपच नाराज झाले ते. मी म्हटलं, एवढे नाराज होऊ नका, मी घेतो ना बाहेरच्या दुकानातून किंवा संमेलनाच्या ठिकाणी ग्रंथ प्रदर्शनातून. स्वत:शी त्यांनी कशीबशी समजूत घातली पण मला म्हणाले ‘पुढच्या वेळेस
भेटलात की नक्की मी तुम्हाला हनुमान चालीसा देईन.’
त्यानंतर ते गृहस्थ त्यांच्या वाटेने गेले मी माझ्या वाटेने. पुढील वर्षी तुळजापूरला जाण्यासाठी म्हणून मी आणि माझी पत्नी सोलापूरला शुक्रवारी रात्री आलो आणि नेहेमीप्रमाणे आम्ही अजंठा लॉजमध्येच उतरलो. यावेळेस आम्हाला तळमजल्यावर स्वतंत्र खोली मिळाली.
सकाळी आवरून खोलीबाहेर आलो आणि लक्षात आले, अरे! आज शनिवार,आणि मला मागच्या वर्षी इथेच भेटलेल्या त्या गृहस्थांची आठवण झाली. मी माझ्या पत्नीला मागच्या वर्षीचे सर्व बोलणे सांगत असतानाच अचानक तेच गृहस्थ जिना उतरून येताना मला दिसले मला पाहताच ते इतक्या वेगाने खाली आले की मला भीती वाटली की ते पडतील की काय?
मला पाहून त्यांना झालेला आनंद हा त्यांच्या बोलण्यातून, वागण्यातून जाणवत होता, माझ्याजवळ आल्यावर माझे हात घट्ट पकडून ते म्हणाले, ‘अहो, मला पहाटेपासून तुमची आठवण येत होती, सारखं मनात येत होतं की आज तुमची भेट होणार म्हणून आणि तुम्ही भेटलात, इथेच थांबा तुमच्यासाठी मी हनुमान चालीसाची नवी प्रत घेऊन ठेवलीय ती घेऊन येतो’ असं म्हणत ते गृहस्थ धावत पुन्हा वर गेले आणि प्रत घेऊन आले.
मला हनुमान चालीसाची प्रत देताना त्यांचे डोळे भरून आले होते, मारुतीरायांनी हे सर्व घडवून आणले असा त्यांचा विश्वास होता.
मला वाटतं अशा सश्रद्ध समजाने माणसांना जगण्याचे बळ मिळत असावे, आजच्या व्यामिश्र, अनिश्चित जगात जीवनाचे ताणेबाणे सैल करण्याचे, जगण्याचे भान आणि कदाचित जगण्याला अर्थ देण्याचे, मानसिक समाधान देण्याचे सामर्थ्य असलेल्या या समजांना अंधश्रद्धा तरी कसे म्हणायचे?
कोणी याला योगायोग म्हणतील,कोणी टेलीपथी म्हणतील पण साक्षात्काराच्या पातळीवर आलेला हा अनुभव मला समृद्ध करून गेला हे निश्चित!
सुरेश देशपांडे / ८३५६०३१७१० / E Mail: scd2000@gmail.com
No comments:
Post a Comment