कवी
कुलगुरू कालिदासाचे कवित्व:
आषाढ महिना सुरु होण्याआधीच कवी कालिदासाची
आठवण यायला लागते. उद्या आषाढ महिन्याचा पहिला दिवस म्हणजे
‘आषाढस्य प्रथम दिवसे मेघमाश्लीष्टसानु
वप्रक्रीडापरिणतगजप्रेक्षणीयं ददर्श ... ‘
या श्लोकाची आठवण येते.
कालिदासाच्या संदर्भात अनेक आख्यायिका आहेत.
त्या सर्वांचे सार एकच की एक राजकन्येच्या नशिबी एक मतिमंद मुलगा नवरा म्हणून येतो
आणि ती त्याचा धिक्कार करून हाकलून देते. पुढे हाच तरुण देवीची आराधना करून
सरस्वतीला प्रसन्न करून घेतो आणि पुढे फार मोठा कवी म्हणून प्रसिद्ध होतो.
त्या आख्यायिका सांगण्यापेक्षा प्रतिभा, श्रुत
आणि अभियोग या गुणांनी अलंकृत झालेले त्याचे कवित्व, सहज आणि उत्पाद्य प्रतिभेचा
कुशल आविष्कार,आणि शीघ्रकवित्व याचे एक उदाहरण पाहण्यासारखे आहे.
भोजराजा आणि कालिदास यांच्यात मैत्रीचे नाते होते. एकदा भोजराजाने कालिदासाला
म्हटले की,
‘तुम्ही नेहेमी माझ्या स्तुतीपर काव्य करता तर
एखादवेळेस माझ्या मृत्यूवर काही काव्य लिहा.’
राजाच्या सूचेनेचे कालिदासाला अत्यंत वाईट
वाटले आणि तो धारा नगरी सोडून वेश पालटून
अन्यत्र राह्यला गेला.
बरेच दिवस कालिदास दरबारात न आल्य्मुळे अस्वस्थ
झालेला भोजराजा कालिदासाला शोधत वेश
पालटून फिरत फिरत नेमका कालिदासाच्या निवासस्थानी आला. दोघांनीही एकमेकांना ओळखले
नाही. कालिदासाने त्याला विचारले’आपण कुठून आलात?’
‘मी धारा नगरीतून आलो आहे’ असे राजाने उत्तर
दिल्यावर कालिदासाने लगेच विचारले
‘धारा नगरी कशी आहे ?’
‘धारा नगरीत भोजराजा मृत्यू पावला आहे’ असे
भोजराजाने सांगितल्यावर अत्यंत दु:खी झालेल्या
कालिदासाच्या मुखातून काव्यपंक्ती बाहेर पडल्या
“अद्य धारा निरा धारा निरालम्बा सरस्वती
पंडिता: खंडिता: सर्वे भोजराजा दिवंगते”
म्हणजे भोजराजाचा मृत्यू झाल्यामुळे धारा नगरी पोरकी झाली असून सरस्वती (कला
काव्य)अनाथ झाली आहे;
त्या उत्स्फूर्त ओळी ऐकून भोजराजाची खात्री
पटली की हाच कालिदास! त्याला मिठी मारून भोजराजा म्हणाला “मित्रा, मी भोजराजा!” ते
त्याचे शब्द ऐकून दु:ख विसरून आनंदित झालेल्या
कालिदासाच्या तोंडून पुन्हा उत्स्फूर्त उद्गार
बाहेर पडले
“अद्य धारा सदा धारा सदालम्बा सरस्वती
पंडिता: मंडिता: सर्वे भोजराजा भुवंगते”
म्हणजे भोजराजा पृथ्वीवर राज्य करीत असल्यामुळे
धारा नगरी आणि पंडित, सरस्वती आधारयुक्त
सुशोभित झाले आहेत.
आधीच्याच ओळीतील शब्दात किंचित बदल करून
कालिदासाने शीघ्र काव्य रचले.
अशा या व्युत्पन्न कालिदासाने ‘ऋतुसंहार’(लघुकाव्य),
‘कुमारसंभव, रघुवंश’ ही महाकाव्ये,
‘मेघदूत’ हे खंडकाव्य तसेच ‘मालविकाग्निमित्रम्’
‘विक्रमोर्वशीयम्’ आणि सर्वात प्रख्यात असे
‘अभिज्ञानशाकुंतलम्’ अशी तीन नाटके इतके साहित्य
निर्माण करून रसिकांना न संपणारा आनंद दिला आहे.
आपल्या सर्वच साहित्यातून नवरसांचे परिपोषण करणाऱ्या
कालिदासाने आपल्या साहित्यातून शुद्ध,
सात्विक प्रेमाचे, अशरीरी प्रेमाचे महत्त्व अधोरेखित केले आहे.
कालिदासाची अखेर मात्र अतिशय दुर्दैवी पद्धतीने
झाली. श्रीलंकेत एका नर्तिकेने त्याचे हत्या केली आणि त्याच्या साहित्यावर प्रेम
करणाऱ्या कुमारदास याने आत्यंतिक दु:खाने कालिदासाच्या चितेवर उडी मारून आपलेही
जीवन संपविले.
कालिदासाला आणि त्याच्या साहित्याला वंदन...!
सुरेश देशपांडे -८३५६०३१७१० / E mail-scd2000@gmail.com
No comments:
Post a Comment