एक हिरवीगार आठवण
…!
मे महिन्याचे अखेरचे दिवस सुरू
झाले की मन नकळत पावसाची वाट
पाहायला लागतं. ग्रीष्मातील असह्य उकाड्याने कासावीस झालेल्या मनाला ,
शरीराला ओढ लागते आकाशातून
बरसणाऱ्या सजल धारांची.!
अमक्या ठिकाणापर्यंत मान्सून आलाय,
येत्या तीन चार दिवसात पाऊस कोसळणार,
यंदा १०५% पाऊस पडेल असल्या मनाला
आशा लावणाऱ्या हवामान खात्याच्या दाव्यांवर विश्वास बसतच नसतो, खात्री असते 'तो' येणार याची ! जिवलग सखा आहे तो, आणि तो नुसताच येणार नाही तर त्याच्या मैतराला, वाऱ्यालाही घेऊन सुसाट येणार !
मनाला दिलासा देणारा ,गात्रांना सुखावणारा ,नवनिर्मितीस उधाण आणणारा
सुखद पावसाळा..!
पावसाळा हा प्रत्येकाचा आवडता ऋतू. प्रत्येक शहरातला ,प्रत्येक गावातला ,
एवढेच कशाला प्रत्येकाच्या मनातला
पाऊसदेखील वेगळाच असतो ! आणि
पावसाचा आनंद लुटण्याची ,विशेषत: पहिल्या पावसाचा आनंद घेण्याची
प्रत्येकाची तऱ्हा देखील वेगळीच
असते.
आभाळ भरून यावे ,दिशा अंधारून याव्यात ,वारा सुसाटत असावा ,गारवा मनाला ,
देहाला सुखवित असावा ,वातावरण धुंद व्हावे ,मनात एक अनामिक हुरहुर दाटून
यावी आणि धुवांधार पावसाला सुरुवात
व्हावी , अशा भन्नाट वातावरणात मोकळ्या
माळरानावर कोसळणाऱ्या पावसात
नखशिखांत भिजत फिरण्याची धुंदी काही औरच..!
किंवा,
किंवा अशाच वेळी आपण हायवेवरून
मोटारीतून जात असावं ,समोर वळणावळणाचा
ओलाकंच काळाभोर रस्ता ,वायपर कितीही वेगात फिरले तरी समोरच्या काचेवरून
न थांबणाऱ्या पाऊसधारा मोती होऊन
ओघळत असाव्या , अचानक एका वळणावर
डेरेदार वृक्षाखाली चहाची टपरी
दिसावी - गाडी सर्रर्रदिशी वळवून झाडाखाली उभी
करून बाहेर यावं , चहाच्या टपरीवरील गरमगरम कांदाभजीबरोबर काचेच्या ग्लासमधून वाफाळणारा चहा
फुर्रर्र करत पिण्याचा पावसाळी आनंदही काही औरच ..!
किंवा,
आपण अगदी वरच्या मजल्यावरील
प्रशस्त बाल्कनीत बसलेलं असावं , अंगावर
शिरशिरी आणणारे जलतुषार हलकेच येत
असावेत ,हातात उत्तम पुस्तक आणि
टेपवर घायाळ करणाऱ्या स्वरातील गझल
मनाच्या कोपऱ्यात एखादी सलणारी आठवण ! ही एक पावसाळी मजाच..!
अशीच एक मनातील हिरवीगार आठवण ….
त्या दिवशी कामानिमित्ताने मुंबईला
आलो होतो. जुलै महिन्याची सुरुवात होती.
मुंबई विद्यापीठातील माझी कामे
उरकली त्यावेळेस दुपारचा एक वाजून गेला
होता. मला रेडिओ स्टेशनवर जायचं होतं . बाहेर भुरूभुरू पाऊस पडत होता.
विद्यापीठ आणि रेडिओ स्टेशन अंतर
काही फार दूरचे नव्हते. विचार केला
टॅक्सी करण्यापेक्षा मस्तपैकी रमतगमत जाऊ ;मुंबईचा पाऊस एन्जॉय करू असं मनाशी म्हणत पायीच जायचं ठरवलं .
मुबई विद्यापीठाच्या मागचा
हायकोर्टकडील रस्ता क्रॉस केला की सुरेख असं ओव्हल
मैदान लागतं .ओव्हल मैदानातून पुढे गेलं की महर्षी कर्वे रस्ता नि तिथून पाच
मिनिटावर रेडिओ स्टेशन .
मी ओव्हल मैदानात शिरलो .मैदान क्रॉस करण्यासाठी तिथे आता छान अशा
चौकोनी फरशा बसविलेली पाऊलवाट आहे. त्या पाऊलवाटेवरून चारसहा पावले
पुढे गेलो नि आजूबाजूस नजर टाकताच
हरखून गेलो. वाटेच्या दुतर्फा मऊसूत
अशी कोवळी हिरवळ तरारून आलेली. त्या हिरवळीने डोळे सुखावले. गारवा मनास
जाणवला. ( हिरवेपण : दृश्यभान ; गार : मनातील जाणीव = हिरवेगार ) वाऱ्याच्या
मंद लहरीवर वाहणाऱ्या
तृणांकुरांच्या लाटा पाहून मन आनंदलं..! त्या लुसलुशीत
गवताला स्पर्श करावासा वाटला. मग मी पायातील बूट काढले नि त्या हिरवळीवरून
अनवाणी चालू लागलो .हिरवळीचा मऊसूत ओला स्पर्श पायाच्या तळव्यातून सर्व
अंगभर पसरला, रोमारोमात भिनला, शरीरावर रोमांच उभे राहिले.
मनात विचार आला ,किती बरे वर्षे झाली असतील मातीचा स्पर्श सोडून ?निदान
पस्तीस तरी नक्कीच. शाळा संपल्यावर मातीशी संपर्कच उरला नाही .कारण
कॉलेजमध्ये गेल्यावर पायात बूट आले
ते कायमचेच . राहण्याच्या ठिकाणीही सर्वत्र
फरशी आणि कोबा. आज या ओल्या मातीचा स्पर्श अनुभवताना वाटलं मागील अनेक वर्षे मी या अनमोल
आनंदाला मुकलो. अनिमिष नेत्रांनी त्या हिरवळीकडे पाहात असतानाच कसं
कुणास ठाऊक माझं बालपण मनात तरंगत वर आलं. पावसाळ्यातल्या अनेक ओल्या आठवणी मनात पिंगा घालायला लागल्या, अंगणातल्या ओहोळातून
सोडलेल्या कागदाच्या होड्या , वाढलेल्या गवतावर उडणारे जाळीदार पंखांचे चतुर
,पायऱ्यांवर दिसणारे हळूहळू चालणारी गांडुळे ,शाळा बुडवून, तुडुंब भरलेल्या
विहिरीत मारलेल्या उड्या, कौलावरून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाच्या हाताएव्ह्ड्या
जाडीच्या पागोळ्या, मधेच निघणारे दिवड
,नानेटी सारखे पाणसर्प . एक ना अनेक आठवणी ! खरंच या पावसाने ,त्याच्या सुगंधाने
वेड लागल्यासारखे झालं. सगळी कामं सोडून गेटवेवर जाऊन समुद्राच्या उसळणाऱ्या लाटा
पाहात बसावं असं मनात यायला लागलं.
मग हिरवळीवरून चालताचालता,
आजूबाजूला कोण आहे नाही असा विचार न करता कोणी मला हसेल असाही विचार न करता बूट, मोजे काढले,अनवाणीच त्या हिरवळीवरून चाललो ,तळपाय छानपैकी ओले झाले,थंडावा
शरीरभर पसरला, मी खाली बसलो . ओल्या गवतावरून अलगद हात फिरविले .
दोन्ही तळवे गच्च ओले करून घेतले .नवजात अर्भकाच्या टाळूवरील मुलायम
जावळाचा सुखद ,आनंददायक स्पर्शासारखा तो स्पर्श मला वाटला..! त्या हिरवळीचा
तो ओलावा ,तो गंध ,तो रंग, निसर्ग किती मुक्तपणे आपलं वैभव उधळत असतो ,
ते पाहायला आपल्याकडे एक संवेदनशील
मनही असायला हवं ना...!
आमच्या शाळेचा रस्ता शेताच्या
बांधावरून जात असे .पावसाळ्यात त्या बांधावरून
जाताना नांगरलेल्या शेतातील
काळ्याभोर मातीची मोठीमोठी ढेकळं विखुरलेली दिसत असत . उकरलेल्या मातीतून मस्त गंध येत असे.(पु. भा.भावे यांनी या मृद्गंधाला
'ला फांझ ' असा फ्रेंच शब्द योजिला होता, कदाचित समानार्थी असावा ) त्या वेळेस
त्या मातीची चवही चाखून बघितली
होती. ती आठवण या क्षणी माझ्या मनात
ताजी झाली . आतादेखील पायाच्या अंगठ्याने मी माती उकरली ,हातात घेतली
नि दीर्घ श्वास घेऊन तो मृद्गंध मी
छातीत भरून घेतला .
काही वेळाने मला भान आले,
वास्तवाची जाणीव झाली, जड मनाने मी पुन्हा
माझ्या कामाकडे वळलो निघताना मन म्हणत होतं की कधीकधी एखादा दिवस असा उजाडतो की
सकाळपासून कसं छानछान .ताजंतवानं वाटतं ,प्रसन्न वाटतं नि त्यातून असं अचानक हिरवेगार सौंदर्य अनुभवायला मिळाले तर ? खरंच ‘पाऊस म्हणजे आकाश गाणे ,सृष्टीचे ते हिरवे लेणे !!’
तुम्हीही पाहा ना
असा आनंद घेऊन …!
No comments:
Post a Comment