Wednesday, April 8, 2020

महाभारत
-----------
महाभारत हा ग्रंथ म्हणजे एक अथांग नि अफाट असा महासागर आहे.आपल्या कल्पनेची दृष्टी पोचेल त्याहीपलीकडे त्याचा विस्तार असून त्याच्या तळापर्यंत पोचणे मानवी बुद्धीला अशक्य आहे.
महाभारतकर्ते महर्षी व्यास यांना आपण गुरू मानतो. इतस्तत: विखुरलेले वेदवाङ्मय त्यांनी एकत्र केले आणि विश्वाला एका महान,
अद्भुत , अद्वितीय अशा तत्त्वज्ञानाची ओळख करून देण्याचे कार्य त्यांनी केले. त्यानंतर महाभारत म्हणजेच 'कुरुकुलाचा' इतिहास 'जसे घडले तसे' त्यांनी लिहिला. हा इतिहास लिहिताना व्यासांनी आपल्या अलौकिक प्रतिभेचे डोळे दिपवून टाकणारे विलक्षण असे दर्शन घडवले.
महाभारत या महासागरातून आजवर अनेकांनी ज्ञानजल उपसून काढले आहे परंतु ते संपण्याचे अगर कमी होण्याचे नाव नाही.
अनेक प्रतिभावंतांना मोह पडणाऱ्या या महाभारतावर, महाभारतातल्या अनेक व्यक्तींवर, कला आणि साहित्यक्षेत्राच्या सर्वच प्रकारातून म्हणजे काव्य, कादंबरी, कथा, चरित्र या माध्यमातून शोध घेण्याचा प्रयत्न केला.
अगदी संत, पंत, तंत (मोरोपंत, वामन पंडित इ.) कवींपासून ते अलीकडील इरावती कर्वे, दुर्गाबाई, वि.स.खांडेकर, दाजी पणशीकर आणि अनेक साहित्यकारांनी वेगवेगळ्या दृष्टिकोनातून महाभारतावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. त्याद्वारे मानवी जीवनाच्या प्रेरणांचा, मानवी जीवनाच्या उद्दिष्टांचा, निर्मितीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, अनेक प्रकारे दोहन केले पण प्रत्येकवेळी वेगवेगळे नवनीत हाताशी आले; आणि इतके संशोधन, लेखन होऊनही महाभारत दशांगुळे वर उरलेच आहे!
मानवी जीवनातील भावभावनांचेअपेक्षांचे,त्यागाचे पावलोपावली दर्शन घडविणाऱ्या महाभारताकर व्यासांच्या लेखणीचे कौतुक करण्याइतपत माझा अधिकार नाही याची मला पूर्ण जाणीव आहे. पण आश्चर्य व्यक्त करताना मला असे जाणवते की महाभारतातील अनेक कथा, उपकथा यांची सुरुवात आणि शेवट ते घडवतातच! कोणताही धागा सुटत नाही, मग भीष्मांच्या प्रतिज्ञेचे कारण असो की शिखंडीचा जन्म असो ! आणि मुख्य म्हणजे असंख्य कथा उपकथांच्या माध्यमातून महाभारत पुढे नेताना व्यासांनी इतके विषय हाताळले आहेत की त्यांनी अत्यंत अभिमानाने असे म्हटले आहे की "व्यासोच्छिश्टम् जगत् सर्वम्'
"मी हे सर्व जग उष्टे करून सोडले आहे!!"
महाभारतात अनेक चमत्कार आहेत. विशेषत: महाभारतातील अनेकांचे जन्म हे अयोनिज आहेत;आणि व्यास या जन्मामागचे रहस्य उलगडून दाखवितात. तरीही अनेक अनेक रहस्ये तशीच राहिली आहेत ; न जाणो पुढील काळात महाभारतातील या न सुटलेल्या रहस्यांचादेखील उलगडा होऊ शकेल.
हे सर्व लिहिण्याचे कारण म्हणजे नुकताच मी डॉ. शांता गोखले यांचा
'यक्षप्रश्न' हा ग्रंथ वाचला. महाभारतातील स्त्रियांवरील, द्रौपदी, कुंती, सत्यवती, अंबा, अंबालिका,अंबिका, शकुंतला, रेणुका इत्यादी स्त्रियांवरील स्त्रीवादाच्या दृष्टिकोनातून लिहिलेला हा ग्रंथ अवश्य वाचावा. हा ग्रंथ वाचल्यावर आपल्या मनातही अनेक प्रश्न उभे राहतात.
त्या प्रश्नाच्या विचारातूनच वरील विचार सुचले.
सुरेश देशपांडे

No comments:

Post a Comment