पुस्तकप्रेमी समूहाचे अखंड पुस्तक परिचय अभियान
आठवडा :२८५ दिनांक :20
नोव्हेंबर २०२५
पुस्तक क्रमांक : १९९२
पुस्तकाचे नाव : ‘असत्यमेव जयते –भारताच्या
इतिहासातील दिशाभूल’
लेखक: अभिजीत जोग
प्रकाशक : भीष्म प्रकाशन / पुणे
दुसरी आवृत्ती : २६ जानेवारी २०२२
पृष्ठे:४६४ मूल्य : रु. ५९९/=
परिचयकर्ता : सुरेश देशपांडे
अभिजीत जोग यांच्या ‘ असत्यमेव जयते’ या
पुस्तकाचा परिचय करून देणे म्हणजे शिवधनुष्य उचलण्यासारखे आहे. अत्यंत
परिश्रमपूर्वक लिहिलेले हे पुस्तक मुळातूनच वाचण्यासारखे आहे.
या पुस्तकाचा उद्देशच मुळी आतापर्यंत भारताचा जो
इतिहास लिहिला गेला तो कसा जाणीवपूर्वक दिशाभूल करणारा आहे हे सांगताना मूळ इतिहास
काय आहे आणि तो आतापर्यंत कसा लपवण्यात
आला हे सांगण्याचा आहे. ‘असतो
मा सद्गमय’ या उक्तीप्रमाणे ‘असत्यापासून
आपण सत्याकडे जाऊ या असे लेखक म्हणतात .
पहिल्या प्रकरणात, आर्य भारताबाहेरून रशियाच्या कॉकेशस
प्रांतातून आले, असा एक सिद्धांत जो मांडला
जातो त्याचा परामर्श घेतला आहे. त्याचे कारण मोठे मनोरंजक आहे. ‘ व्हाईट
मॅनस् बर्डन’ या संकल्पनेवर आधारित जगातील सर्व रानटी आणि असंस्कृत लोकांना
शिकविण्याची जबाबदरी गोऱ्या लोकांवरच आहे आणि म्हणून गोरी साम्राज्यवादी राष्ट्रे इतरांवर
राज्य करतात ती त्यांना सुधारण्यासाठीच असा गोऱ्यालोकांचा समज होता ! आणि हे लोक जेव्हा भारतात आले तेव्हा त्यांना
भारतीय भाषा, इतिहास, संस्कृती, ज्ञान, विद्यान आणि संस्कृत भाषेचे युरोपियन
भाषेशी असलेले कमालीचे साधर्म्य पाहून हे साम्य वरवरचे नसून भाषाशास्त्रानुसार
मूलभूत स्वरूपाचे आहे हे त्यांच्या लक्षात आले.
ज्यांचा जन्म गुलाम म्हणून झाला आहे त्यांची भाषा
विजेत्या युरोपियन लोकांच्या भाषेशी जवळीक सांगणारी आहे हे या युरोपियन लोकांना
धक्कादायक वाटले. ईस्ट इंडिया कंपनीलादेखील प्राचीन भारतीय संस्कृतीचे ज्ञान, विज्ञान,
तत्त्वज्ञान, कला. साहित्य याच्या आश्चर्यकारक प्रगतीचे दर्शन झाले.
मग इंग्रजांच्या पुढे प्रश्न निर्माण झाला की ज्यांच्यावर आम्ही राज्य करणार ते आमच्यापेक्षा
श्रेष्ठ आहेत हे मान्य कसे करायचे? शिवाय
युरोपियन भाषेशी साधर्म्य दर्शविणारी उच्च दर्जाची भाषा यांची कशी काय असू शकते?
यावर त्यांनी अतिशय सोपा तोडगा काढला तो
म्हणजे पश्चिमेकडून आर्य आले आणि त्यांनी इथल्या कृष्णवर्णीय लोकांना पराभूत केले
तसेच वेदांची आणि वैदिक धर्माची स्थापनाही केली!
आर्य भारतात येण्यापूर्वी (इ. स्. पूर्व १५०० काळात )
हा काळही चुकीचा आहे कारण ऋग्वेद आणि अन्य वैदिक ग्रंथ त्याआधीच निर्माण झाले आहेत
हे अनेकांनी सिद्ध केले आहे. श्री जोग यांनी भारतीय संस्कृतीतील सरस्वती नदीचा
उल्लेख, भारतीय खंडातील लोकांच्या डी एन ए चे पुरावे, भारतात सापडणारे उंदीर, तसेच
हत्ती, गाय, म्हैस, गवा, मोर, चितळ या प्राण्यांचे उल्लेख, अनेक ठिकाणी केलेले
उत्खनन .. असे अनेक पुरावे देऊन आर्य हे भरताबाहेरून आलेले नाहीत हे सज्जड
पुराव्यानिशी सिद्ध करून दाखवलेले आहे. असे असूनसुद्धा आमच्या येथील मेकॉलेपुत्र आणि डावे इतिहासकार खोटा इतिहास वर्षोनुवर्षे शिकवितच
आहेत.
२
आपण दुसऱ्या सत्याकडे वळू या.. .. भारतीय इतिहास हा पराभूतांचा इतिहास आहे
असेच आपणाला आजवर शिकविण्यात आले. परंतु जोग यांनी भारतावरील पहिले आक्रमण हे इ.
स.पू ८१० मध्ये झाले ( असेरियन राणी सेमिरमिस हिचे) अर्थात सिंधु नदीच्या किनाऱ्यावरील राजा सत्यव्रत याने
तिचा दारुण पराभव केला. दुसरा उल्लेख येतो तो ग्रेट अलेक्झांडर याचा.. वास्तविक तो
भारताच्या वायव्य सीमेवर येऊन थडकला परंतु तेथे असलेल्या पोरस राजाशी झालेल्या
युद्धात नक्की कोणाचा पराभव किंवा विजय
झाला याचा उल्लेख इतिहासात नाही यावर अनेक मतमतांतरे आहेत परंतु या युद्धानंतर अलेक्झांडर
परत गेला मग तो विजय कसा ? अलेक्झांडरच्या मृत्यूनंतर भारतात राहिलेला ग्रीक
राजदूत मेगॅस्थेनीस याने ‘ इंडिका’ नावाचा ग्रंथ लिहिला आहे त्यातही त्याने पोरसचा
पराभव झाला असा उल्लेख केलेला नाही. त्यानंतरचा काळ येतो इस्लामिक आक्रमणाचा. एकेश्वरवादी
धर्म हे आपलाच धर्म खरा असून इतरधर्मीय हे
काफर आहेत असे समजतात तशी त्यांना शिकवण आहे, इ.स.. ५७० मध्ये जन्म झालेल्या कुरेश जमातीतील
महंमद पैगंबर यांनी इ. स. ६०० मध्ये इस्लाम धर्माची स्थापना केली आणि संपूर्ण
अरबस्तानात त्यांचा प्रसार झपाट्याने झाला. इ. स. ६३२ मध्ये महमद पैगंबर यांचा
मृत्यू झाल्यानंतर अबू बक्र हा खलिफा झाला आणि धर्मवेडाने झपाटलेल्या अरबांनी मग
आपल्या मार्गात जो कोणी आणि कितीही येतील त्यांना
कापून काढत आपला धर्म प्रसार जारी ठेवला.
स्पेन ते पूर्वेकडे सिंधपर्यंतचा भूप्रदेश वेगाने
जिंकून घेतला. आठच वर्षात संपूर्ण सिरिया इस्लामिक देश बनला. ग्रीक भाषा असलेला
आणि हजार वर्षांहून अधिक काळ रोमन सामाज्य अवघ्या आठ वर्षात समाप्त झाले !
त्यानंतर इराक, इजिप्त,इराण, उत्तर आफ्रिका, मध्य आशिया, पोर्तुगाल अशा रीतीने ६३२
ते ७५० या सवाशे वर्षांच्या काळात अफगाणिस्तानपर्यन्तचा विशाल भूभाग अरबांच्या पर्यायाने इस्लामच्या ताब्यात आला. अलेक्झांडरनेदेखील
प्रचंड भूभाग जिंकलयानंतर जिंकलेल्या
प्रदेशात आपला धर्म किंवा संस्कृती लादली नाही पण इस्लामच्या मोहीमा या निव्वळ
धर्मप्रसारासाठीच होत्या त्यामुळे जिंकलेल्या सर्व प्रदेशाचे त्यांनी इस्लामीकरण
केले.या पार्श्वभूमीवर भारतात गुप्त साम्राज्याचा अस्त झाल्यानंतर हर्षवर्धन याचा ४०/४२ वर्षांचा
कालखंड वगळता मोठे साम्राज्य नव्हते. आणि हिंदूंचा धर्मयुद्धावर विश्वास होता.
इस्लामची नजर आता भारतीय प्रदेशावर होती. इ. स.६३६ मध्ये ठाणे येथे, नंतर बरखास
(भरूच) येथे हल्ला झाला पण दोन्ही ठिकाणी त्यांचा पराभव झाला. सिंधवरील पहिले आक्रमण देबल (कराची) येथे मुधीरा याने हल्ला केला पण
त्यात तो ठार झाला. चौथा खलिफा याने आक्रमण केले पण त्याचा प्रमुख हॅरिस अल अब्दी
मारला गेला. त्यानंतर खलिफा मुआविया याने सिंधवर सहा वेळा आक्रमणे केली पण प्रत्येक वेळेस त्याचा पराभव
झाला. सातत्याने होणाऱ्या पराभवाचा परिणाम म्हणून महंमद बिन कासिम संतापून देबलवर
चालून आला, फंदफितुरी करून त्याने विजय मिळवला आणि मग पुढे तीन दिवस लुटालूट आणि कत्तली केल्या. स्त्रियांना जनानखान्यात पाठविण्यात
आले .. अशा रीतीने इस्लामी आक्रमणाचे धर्मवेड, क्रौर्य अत्याचार आणि लुटालूट याची
पहिली ओळख देबल येथे झाली. आलोरच्या किल्यावरच्या राजा दहिर याने कडवा प्रतिकार
केला पण दुर्दैवाने त्याचा पराभव झाला. पुढे बिन कासिमने मुलतान आणि सिंध येथे
कब्जा केला. हे सर्व करण्यासाठी अरबांना ७९ वर्षे वाट पहावी लागली. ‘चचनामा’ या ग्रंथात
सिंधच्या लुटीचा आणि अत्याचाराचा संपूर्ण इतिहास आहे; नंतरही अरबांचे हल्ले झाले पण हिंदू सैन्याने एकत्र येऊन अरबांचा पराभव
केला यामध्ये नागभट्ट तसेच बाप्पा रावळ (रावळपिंडी शहर वसवणारा) यांनी अरबांना धूळ
चारली. काश्मीरचा सम्राट ललितादित्य मुक्तपीड याने (७२४ -७६०) अरबांचे मनसुबे
उधळून लावले. पंजाबला इस्लामच्या आक्रमणापासून वाचवले. सम्राट ललितादित्य
याच्याकडून मार खालेल्या इस्लामी आक्रमकांनी पुढे चारशे वर्षे भारताकडे डोळे वर
करून पाहिले नाही. आपल्या इतिहासात मात्र
बाप्पा रावळ आणि ललितादित्य यांचे नावही नाही ..!
अरबांना दोनशे वर्ष झगडूनही काबूल
झाबूल या लहान हिंदू राज्यांना जिंकता आले नाही.
महंमद घोरी, गझनी, बाबर या क्रूर तुर्की लोकांचे
पूर्वज बौद्ध होते . सातव्या आठव्या शतकात मुस्लिम आक्रमणामुळे हे मुस्लिम झाले. महमद
गजनीने इ. स. 1001 ते 1027 या काळात एकूण 17 वेळा हल्ले केले. डावे इतिहासकार महमुदचा उद्देश लुटीचा होता असे लिहितात. परंतु त्याने
हजारो मंदिरांचा विध्वंस केला, अत्याचार केले, स्त्री पुरुषांना गुलाम म्हणून
विकले. हजारो किलो सोने, हिरे माणके,नगरकोटचे मंदिर, मथुरेचे मंदिर, सोमनाथचे
मंदिर सर्वत्र त्याने लुटालूट करून राखरांगोळी केली. मुलतान आणि पंजाबमधील काही
भाग सोडता अनेक हिंदू राजांनी त्याला येथे स्थिरावू दिले नाही. गझनी काय किंवा
घोरी काय यांना केवळ नशिबाने साथ दिली. पृथ्वीराज चौहान यांचा घोरीशी अनेक वेळ
संघर्ष झाला पण युद्धे मात्र दोन किंवा तीनच झाली. घोरी पळून गेला होता पण पराजिताला मारायचे नाही या सद्गुण विकृतीमुळे पृथ्वीराज
यांनी त्याला सोडून दिले आणि त्याने विश्वासघात करून पृथ्वीराज चौहान यांचा वध
केला. पृथ्वीराज चौहान हे अखेरचे हिंदू
सम्राट होते. महमद घोरी यांचा सूडदेखील काही हिंदूंनी तो तंबूत झोपला असचा वध करून
घेतला. त्याच्यानंतर त्याचा गुलाम कुतुबुद्दिन एबक याने सजमेर आणि गुजराथवर कब्जा करून दिललीवर वर्चस्व प्रस्थापित केले तरी
हिंदूंचा संघर्ष संपला नव्हता.. राजपूतरागिणी कूर्मादेवी, कामरूपचा राजा पृथू याने,
नालंदाचा विध्वंस करणाऱ्या बख्तियार
खिलजीशी निकराचा संघर्ष केला आणि पळणाऱ्या खिलजीच्या सैन्याचा पाठलाग करून त्यांची
कत्तल केली. तसेच ओरिसचा राजा नारसिंहदेव, वरंगळचा नायक कपाय,राणा हमिरसिंग
सिसोदिया, रंपयरी गुर्जर, महाराणा कुंभ,राणी कर्णवती, लचीत बोरफुकन, सुहेलदेव
इत्यादी वीरांनी इस्लामी राज्याला सशस्त्र
विरोध केला.
मात्र डाव्या इतिहासकारांना हे मान्य करायला अवघड
जाते म्हणून त्यांनी खोटा इतिहास लिहिला आणि आपल्या शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट
केला.
३
नकारविकृती.! काही विद्वान मंडळी, इतिहासातील
झालेल्या अत्यंत वाईट गोष्टी, झालेला नरसंहार, विध्वंस केली गेलेली मंदिरे,
भस्मसात करण्यात आलेले नालंदा विद्यापीठ, आणि अगदी अलीकडील काश्मीरमधून विस्थापित्त करण्यात आलेले पंडित
या सर्व गोष्टी झाल्याच नाहीत असे ठामपणे ठोकून सांगतात. यालाच अभिजीत जोग नकार
विकृती म्हणतात.
स्वातंत्र्यानंतरची भारतातील शासनव्यवस्था,
देशाच्या विचारधारा आणि शैक्षणिक, इतिहास धोरणावर नियंत्रण ठेवणारी इकोसिस्टिम आणि
लॉबी यांनी असे काही घडलेच नाही शिवाय पूर्वीचे भारतीय हिंदू हे मागासलेले आणि
असहिष्णू ठरवून सतत हिंदूंना अपमानित करण्याचे धोरण ठेवले जे आजही सुरूच आहे .. भारत हा एक अतिशय प्रगत अशी संस्कृती होता असे काही
मुस्लिम इतिहासकारांनी नोंदवून ठेवले आहे. विज्ञान, तत्त्वज्ञान, कला आणि साहित्य
यातील प्रगतीबरोबरच सहिष्णुता आणि नैतिकता ही फार उच्च दर्जाची होती आणि त्याचा
प्रभाव त्या इतिहासकारांवरदेखील पडला होता. हीच गोष्ट चीनी प्रवाशांनीदेखील
नोंदवून ठेवली आहे. मुस्लिम इतिहासकारांनी असे लिहिले आहे की हिंदू राजवटीत मुस्लिमांना अतिशय अतिशय आदराने
वागणूक दिली जायची
आक्रमकांचा
उद्देश लुटीचा होता, मंदिरे उद्ध्वस्त करण्याचा नव्हता असे नेहरू म्हणतात अशा सर्व प्रकारच्या नकारविकृतीवर इतिहासातील दाखले
देऊन जोग यांनी आपले म्हणणे सिद्ध केले आहे.
४ .
चंद्रगुप्त मौर्य याने आर्य चाणक्याच्या
मार्गदर्शनाखाली भारताचे एक साम्राज्य ( हिमालय ते संपूर्ण दक्षिण भारत आणि आसाम
ते अफगाणिस्तान, बलुचिस्तानपर्यन्त) उभे केले. होते. त्याच्या मृत्युनंतर त्याचा
मुलगा सुशील हा राजा होणार होता पण अशोकाने त्याचा खून करून राज्य बळकावले.. आपल्या
राज्यातील जैन, आजीवक यांचा त्याने संहार केला अशी नोंद ‘अशोकवदन’ या ग्रंथात आहे.
कलिंगच्या युद्धातील नरसंहारानंतर अशोकला पश्चाताप होऊन त्याने बौद्ध धर्म
स्वीकारला असे आपण वाचतो पण त्या युद्धापूर्वी दोन वर्षे आधीच अशोकाने बौद्ध धर्म
स्वीकारला होता. इतिहासात आपली प्रतिमा क्रूरकर्मा होऊ नये यासाठी अशोकानेच
सर्वत्र आपल्या नावाचे शिलालेख उभे केले. स्वत:विषयी इतके शिलालेख लिहिणारा सम्राट
अशोक हा पहिलाच राजा!
अकबराने राजपूत घराण्यांशी सोयरीक केली आणि
हिंदुबद्दल सहिष्णूतेचे धोरण स्वीकारले आणि सर्वधर्मसमभाव पाळला असा एक समज दृढ
आहे. त्याला टाचणी लावताना जोग लिहितात हुमायूनच्या मृत्यूनंतर दिल्लीचे राज्य
हेमचंद्र विक्रमादित्य याच्याकडे होते पण नशिबाची साथ मिळाली आणि अकबर हेमचंद्राचा
पराभव करून गादीवर आला. अकबराला इराणी आणि तुराणी या लोकांचा भरवसा वाटत नव्हता.
त्यांना शह देण्यासाठी कोणीतरी तुल्यबळ असायला हवे म्हणून त्याने रजपुतांची निवड केली. त्यांच्याशी सोयरीक जुळवली आणि
त्यांच्या स्वभावानुसार रजपूत स्वामीनिष्ट
आणि विश्वासू राहिले,
आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीला अकबर हिंदू तर
सोडाच पण मुस्लिमांमधील सुन्नी वगळता इतर पंथांच्या बाबतीत अतिशय असहिष्णू होता. तो स्वत:ला गाझी
म्हणजे धर्मयोद्धा समजत असे. जबलपूरजवळील गडकटांग येथे १५६० च्या मोहिमेत त्याने
४०००० मजुरांची हत्या केली. १५८० मध्ये पोर्तुगीज पाद्री मोन्सेरात, अक्काव्हीय आणि एनरीक यांनी
अकबराच्या राज्यातून प्रवास करताना लिहिले आहे की धर्मांध मुसलमानांनी हिंदूंची मंदिरे
उद्ध्वस्त करून त्या जागी कबरी आणि दर्गे उभे केले आहेत. यावरूनही अकबराचा ग्रेटनेस पोकळ
होता हे जाणवते.
जोग यांनी याच पुस्तकात सूफी संतांच्या बाबतीतील सच्चाई उलगडून दाखविली आहे. प्रमुख
सूफी संतांनी हिंदू मुसलमान यांच्या संबंधाने लिहिलेली मते पहा.. निजमुद्दिन
अवलिया म्हणतात ‘नरकाची आग हेच हिंदूंचे भवितव्य’.. ख्वाजा मोईनुद्दिन चिश्ती : अजमेरला
आल्यावर त्याने शपथ घेतली होती की एक दिवस
अल्लाच्या आणि प्रेषितच्या मदतीने इथली सर्व मंदिरे पाडून टाकीन, मंदिराजवळ रोज एक
गाय कापण्याचा आदेश त्याने दिला होता. अमिर खुसरो, याचे काव्य आणि संगीत श्रेष्ठ जरी
असले तरी तो धर्मांध होता आणि त्याने मूर्तिपूजकांची कत्तल करण्याचा हकूम इस्लामने
दिला याबद्दल आभार मानले होते. अशा अनेक सूफी संतांबद्दल जोग यांनी
इतिहासातील दाखले देऊन आपले म्हणणे सिद्ध केले आहे.
५
या प्रकरणात जोग भारताचे सामाजिक, सांस्कृतिक आणि
आर्थिक मागासलेपण याची कारणे आणि हे आपल्यावर लादणे यावर विस्तृत भाष्य केले आहे.
सती, बालविधवा, बालविवाह आणि केशवपन
इत्यादी कुप्रथा आणि स्त्री आणि
शिक्षण, जातीव्यवस्था,जोहार आणि सती, गरिबी, असे अनेक विषय जोग यांनी हाताळले
आहेत. हे सर्व मुळातून वाचायला हवे.
६ पुढच्या
प्रकरणात ते गांधी आणि भारतीय स्वातंत्र्य यावर अत्यंत आक्रमकपणे लिहितात. चरखा
चालवून फार तर सूत मिळेल पण स्वातंत्र्य मिळणार नाही. जोग लिहितात, गांधींनी सुरू केलेले एकही
आंदोलन पूर्णत्वास गेले नाही. मिठाचा
सत्याग्रह तर त्यांनी अर्धवट सोडून दिला आणि फलश्रुती काय तर ब्रिटिशांनी मीठावरचा
कर वाढवला! चले जाव चळवळ अर्धवट गुंडाळण्यात आले, अहिंसेचा पुरस्कार करणारे गांधी
दक्षिण आफ्रिकेत तिथल्या गोऱ्या सरकारला मदत करत होते एवढेच नव्हे तर बोअर युद्धात
ते सक्रिय होते आणि त्याबद्दल त्यांना पुरस्कारही मिळाला होता. मुस्लिम अनुनयासाठी
तुर्कस्थान येथे केमाल पाशासाठी ‘खिलाफत चळवळीला ‘ पाठिंबा दिला. वास्तविक भारताचा आणि खलिफा
यांचा काहीच संबंध नव्हता, केरळमध्ये मोपलयांनी हिंदूंवर केलेले रक्तरंजित
अत्याचार याकडे गांधींनी डोळेझाक केली. त्याबद्दल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी
लिहिले की या रक्त गोठवणाऱ्या अत्याचाराचे वर्णन करणे अशक्य आहे. गांधी भगतसिंग
यांना वेडपट देशभक्त असे म्हणतात.
शेवटच्या प्रकरणात जोग म्हणतात की आता हे सर्व
उगाळून का काढायचे तर डॉ. आंबेडकर
यांच्याच शब्दात सांगायचे तर राष्ट्रनिर्मितीसाठी लोकांकडे भूतकाळाचे सम्यक आकलन
आणि भविष्याचा वेध असणे आवश्यक आहे..
आर्यांचा सिद्धांत असो वा अन्य कोणत्याही
गोष्टीवरून आपल्या वैभवशाली इतिहासची दिशाभूल दूर करण्यासाठीच या ग्रंथाचा उद्देश आहे,
असत्याकडून सत्याच्या मार्गाकडे जाण्याचा हा प्रयत्न आहे.
No comments:
Post a Comment