पुस्तकप्रेमी समूहाचे ‘अखंड पुस्तक परिचय अभियान’
आठवड क्रमांक- २८५ दिनांक – १९ नोव्हेंबर २०२५
पुस्तक क्रमांक : १९९१
पुस्तकाचे नाव : “मरणात खरोखर जग जगते”
लेखक :
बाळ सामंत
किमत :
रु.३००/ आवृत्ती : २७ मे १९९४.
प्रकाशक : परचुरे प्रकाशन मंदिर, मुंबई
परिचयकर्ता : सुरेश देशपांडे
मृत्यू हा विषय साहित्याचा, लिहिण्याचा होऊ शकतो का? का
होऊ नये? आयुष्यात निश्चित अशी घडणारी मृत्यू ही एकमेव घटना आहे ( फक्त केव्हा
येईल हे अनाकलनीय आहे) जन्म आपल्या हातात नाही. महत्त्वाचे म्हणजे साहित्यातून
मानवी जीवनाचे प्रतिबिंब पडावे हे अपेक्षित आहे तर मानवी जीवनाचे अविभाज्य अंग
असलेल्या मृत्यूचा विचार का नसावा.?
मृत्यूला आपण अभद्र समजतो पण खरे तर मृत्यू हा एक सोहळाच आहे! संतांनी तर त्याला ‘अनुपम
सोहोळा’ म्हटले आहे. अशा या मृत्यूवर
सुप्रसिद्ध लेखक बाळ सामंत यांनी अतिशय सुंदर असा ग्रंथ लिहिला आहे.
पुस्तकाच्या सुरुवातीसच मृत्यू म्हणजे काय आणि
मृत्यूच्या व्याख्या यासंबंधी लिहिताना ते म्हणतात भारतीय भाषेत मृत्यू या विषयावर
फार साहित्य नाही पण इंग्रजीत मात्र विपुल
साहित्य आहे. मृत्यू या विषयाचे नेमके स्वरूप अनेक शरीर शास्त्रज्ञ किंवा
तत्त्वचिंतक, आणि वैद्यकीय क्षेत्रातील धुरीणांना समजलेले नाही. एवढेच नव्हे तर
मृत्यूची नेमकी व्याख्याही करता आलेली नाही.
मानवी शरीरातील कोट्यवधी पेशी प्रत्यही मरत असतात आणि तेवढ्याच पेशी निर्माणही होत असतात. कालांतराने
नवीन पेशी निर्माण होणे बंद होते. पेशींची नवनिर्मिती थांबते. शरीरातील ही
महत्त्वाची निर्मिती बंद होते म्हणजे
नेमके काय होते? युनोच्या व्हायटल स्टॅटिस्टिक्स डिपार्टमेंटने मृत्यूची एक
सर्वसाधारण व्याख्या अशी केली आहे “ The permanent cessation of all vital functions” परंतु
या व्याखेने मृत्यूचे स्वरूप स्पष्ट होत नाही. मृत्यूची प्रमुख लक्षणे : बुद्धीचा
अभाव,(अर्थात हे मत निर्णायक नाही), संज्ञाहीन अवस्था, बेशुद्धी (श्वास थांबणे,
जाणीव नसणे, ज्ञानेंद्रिये कार्यरत नसणे,डोळे निस्तेज ) तरीही व्यक्ती मृत्यू
पावली असे म्हणता येत नाही. मेंदू मृत
झालेल्या व्यक्तीच्या इतर अवयवांचे कार्य सुरू असते , आणि मेंदू मृत व्यक्तीला मृत्यूच्या व्याख्येत समाविष्ट केले असले तरी
तरी याला सर्वत्र कायदेशीर मान्यता मिळालेली नाही.
बाळ सामंत यांनी या विषयावर बऱ्याच काळ चिंतन
केल्यावर ह ग्रंथ साकारला. आपल्या अभ्यासासाठी त्यांनी ज्या ग्रंथांचे संदर्भ घेतले त्याची विस्तृत यादी
ग्रंथाच्या अखेरीस असून ४३५ पृष्ठांच्या या ग्रंथात एकूण २४ प्रकरणे आहेत. त्या
प्रकरणांची नावे वाचूनच वाचकांना
ग्रंथातील मजकुराचा अंदाज येऊ शकेल.
‘मृत्यूचे भय, मृत्यू कसा यावा, अतींद्रिय अनुभव
(पूर्वजन्म आणि तत्सम अनुभव) मृत्यूच्या दारातून परत आलेल्या व्यक्तींना मृत्यू कसा वाटला त्याचे भयकारी आणि रोमांचक अनुभव, मृत्यूचा
साक्षात्कार, निसर्ग आणि मृत्यू, नरबळी, खून, आत्महत्या, संत आणि विचारवंतांचे
मृत्यू, समाधी, साहित्यातील मृत्यू दर्शन, धर्म आणि मृत्यू, प्रेम आणि मृत्यू,
स्वेच्छामरण, नचिकेत आणि यमाचा संवाद, अंत्यसंस्कार आणि त्याच्या पद्धती, मी आणि
मृत्यू, अशा अनेक प्रकरणातून सामंत यांनी मृत्यू या विषयाचे विविधांगी दर्शन
घडविले आहे. अतींद्रिय अनुभव या प्रकरणात मृत्यूच्या जवळ गेलेल्या व्यक्तींच्या
शरीरातून सूक्ष्म देह बाहेर पडून आपल्या स्थूल देहाकडे कसं पाहतो याचे प्रत्यक्ष
वर्णन आहे. वेदांतात मृत्यूसमबंधी सखोल विवेचन आहे तेही वाचण्यासारखे आहे.
हे पुस्तक वाचून आपली मृत्यूविषयीची भीती नक्कीच लोप पावेल. मृत्युकडे पाहण्याचा दृष्टिकोणही बदलले. मला वाटते वेदनारहित,
सुखाने येणारा, शांत झोपेत असताना येणारा मृत्यू सर्वांनाच आवडेल.
हे पुस्तक वाचताना मला आश्चर्य एकच वाटले की
सामंतांनी ,धर्म आणि मृत्यू, किंवा ‘अंत्यसंस्कार, या प्रकरणात मृत्यूचा धार्मिक, पारमार्थिक अंगाने विचार केला
असूनसुद्धा ‘गरुड पुराणाचा, न केलेला उल्लेख! वास्तविक ,गरुड पुराण’ हे एखाद्या
घरात मृत्यू झाल्यानंतरच वाचले जाते, अन्यथा वाचत नाहीत. त्यात मृत्यूनंतर
आत्म्याचा प्रवास, दहा दिवस सूतक का पाळावे , दहा दिवस दिवा का ठेवावा,मासिक आणि वर्षश्राद्ध का करावे असे
अनेक तपशील असून दर्भ आणि दूर्वा (दर्भ आणि दूर्वा शिळे होत नाहीत, पुन्हा वापरता
येतात) का वापरतात असे अनेक उल्लेख आहेत; या गरूड पुरणाचा संदर्भ द्यायला हवा होता
असे मला वाचक म्हणून वाटले.
या पुस्तकाच्या वाचनाच्या निमित्ताने मला लहानपणी
मृत्यूविषयक वाचलेली एक कविता आठवली
“पोर खाटेवारी मृत्यूच्याच दारा , कुणा गरिबाचा तळमळे बिचारा }} त्यानंतर लक्षात
राहिलेली सुरेश भट यांची “ मरणाने सुटका
केली, जगण्याने छळले होते.. . मानवी जीवनाला मृत्यूमुळे अर्थ प्राप्त होतो, एक
ग्रीक लेखकाने म्हटल्याप्रमाणे मृत्यू हा मिठासारखा आहे त्यामुळे जगण्याला चव
येते!
आपल्याकडील पौराणिक साहित्यात सत्यवान सावित्रीची
कथा आहे. त्यात सावित्री आपल्या चतुर संभाषणाने यमाला निरुत्तर करते आणि त्याच्याकडून तीन वर मागून
आपल्या नवऱ्याचे प्राण वाचवते, आणि अंध सासऱ्यांना राज्य मिळवून देते.
या ग्रंथातील सर्वात मनोरम प्रकरण आहे ते ‘ यम
आणि नचिकेत यांचा संवाद!’ सर्व काही लिहीत नाही; फक्त महत्त्वाचे _ “हृदयात एकूण
१०१ नाड्या आहेत, त्यातील एक नाडी मूर्धाकडे गेली आहे (कपाळाकडे)हिला सुषुम्ना
म्हणतात.. तिच्याद्वारे वरच्या लोकी जाऊन मानव अमरत्व प्राप्त करू शकतो.”
योगशास्त्रातील नाड्या शरीरशास्त्रात नाहीत .. योग सूक्ष्म शरीराबद्दल बोलतो.
पाश्चात्य संशोधकांनी त्याचा शोध घेण्याचा अविरत प्रयत्न केला त्याला ते energy
body असे म्हणतात तर रशियन शास्त्रज्ञ bioelecricity
असे म्हणतात.
हा अल्प परिचय आहे .. मुळातून हे पुस्तक वाचावे
..!
No comments:
Post a Comment