बऱ्याच
दिवसांपासून, मुतालिक दाम्पत्याला भेटायला जायचे असे ठरविले होते. खरे तर मागच्या
फेब्रुवारीतच जायचं होतं; पण ......या ‘पण’ने अनेकांची गणिते चुकविली. कोरोनाने
सगळ्यांनाच स्थानबद्ध केले. आता वातावरण बऱ्यापैकी मोकळे झाल्यामुळे घराबाहेर पडता
येऊ लागले, थोड्या फार प्रमाणात एकमेकाच्या घरी जाता येऊ लागल्यावर, संक्रांतीच्या
दिवशी म्हणजेच १४ जानेवारीला मुतालीकांना फोन करून त्यांच्या घरी भेटायला गेलो.
कधीकधी
एखादा दिवस अचानकपणे काहीतरी छान असे देऊन जातो; तसंच झालं.
अलकाताई
मुतालिक भागवतावर अतिशय सुंदर भाष्य करतात, प्रवचने, सप्ताह करतात हे माहीत होते.
त्यांची भाषणे ऐकण्याचाही योग आला होता. कोरोनाच्याच काळात, मंथन व्यासपीठावर ‘राधा’
या विषयावर त्यांनी केलेले भाषण अजूनही लक्षात आहे. ‘राधा’ या शब्दाला किती अर्थ
आहेत, कृष्णाच्या राधेचे वेगळेपण काय आणि रासक्रीडेतील राधा कशी निराळी होती असे
अतिशय सुंदर, ऐकत राहावे असं निरुपण त्यांनी केले होते. अलकाताईंचा आध्यात्मिक क्षेत्रातील
अभ्यासही खूप आहे, हेही माहीत होतं.
दत्तात्रय
मुतालिक हे अजूनही रोज चरख्यावर सूत काततात हेही ऐकले होते आणि मला त्याचेच जास्त कुतूहल
होते. त्याविषयी जाणून घ्यायचे होते. पण त्यांच्याकडे गेल्यावर मला बरेच काही
ऐकायला आणि पाहायला मिळाले.
“वर्ध्याला
माझी आणि ठाकूरदास बंग (डॉ. अभय बंग यांचे वडील) यांची भेट झाली आणि मी जरी
आधीपासून गांधींना मानणारा असलो तरी सूतकताईची प्रेरणा मात्र त्यांच्याकडून घेतली”
दत्तात्रय तथा बाबा मुतालिक सांगत होते. मग मुंबईला आल्यावर चरखा कुठे मिळतो अशी चौकशी
करून त्यांनी खादी ग्रामोद्योग भांडारच्या माध्यमातून यांत्रिक चरखा मिळविला. आता
त्याला लागणारा पेळूचा कापूस किंवा ज्याला स्पिंडल म्हणतात ते कापूस गुंडाळलेली
फिरकी म्हणू या कुठे मिळतो, तो चरखा कसा वापरायचा, तयार झालेल्या धाग्याचे काय
करायचे ही सगळी माहिती बाबा एखाद्या लहान मुलाच्या उत्साहाने सांगत होते. त्यांनी
तयार सुताच्या लड्याही दाखविल्या आणि अनिरुद्ध बापूंच्या माध्यमातून त्या लड्या
कशा गोळा केल्या जातात याचे बारीकसारीक तपशीलासह वर्णन केले. हे सर्व ऐकून मी खरे
तर केवळ आश्चर्यचकितच नव्हे तर भारावून गेलो होतो. बाबा मुतालिक एवढेच करीत नाहीत
तर त्यांनी आतल्या त्यांच्या पुस्तकांच्या मांडणीतून त्यांनी मोठ्या आकाराच्या
बऱ्याच वह्या आणल्या. सुंदर हस्ताक्षरात, एकटाकी लिहिलेल्या वह्या मी उघडून
बघितल्या.
१०५००
पेक्षा जास्त ॠचा असलेल्या ‘ॠग्वेद’ या, वेदमूर्ती डॉ.भीमराव कुलकर्णी यांनी (सार्थ)
लिहिलेल्या, छापलेल्या प्रचंड ग्रंथातील सर्व मजकूर, बाबांनी हाताने लिहिला होता.
१००० पेक्षा, मोठ्या आकारातील जास्त पृष्ठे हाताने लिहिणे यासाठी खूपच मोठा निग्रह
लागतो. बरे लिहिताना कमालीचा व्यवस्थितपणा, प्रारंभ तारीख, स्कंद, मंडल
ॠचा
संख्या, एकूण एक तपशील सुवाच्य अक्षरात, सुरुवातीच्या
पानात नोंदलेला!आणि केवळ नुसताच ॠग्वेद नव्हे तर अन्य अनेक ग्रंथ त्यांनी हाताने
नकलून काढले आहेत. बाबांचे पुस्तकाचे कपाट त्या हस्तलिखितांनी भरून गेले आहे.
(माझे दुसरे एक स्नेही श्री प्रफुल्लचंद्र पाटील हेही अशाच प्रकारे,तुकारामांची
गाथा, ज्ञानेश्वरी आपल्या अप्रतिम अक्षरात अंकित करीत असतात)
वाचता
येणारे ग्रंथ हाताने लिहिताना निराळाच अर्थ प्रतीत होतो असे प्रफुल्लचंद्र पाटील म्हणतात
तेच बाबांनी सांगितले. या प्रचंड वेळकाढू कामासाठी सातत्य आणि मनोनिग्रह लागतो.
सूतकताई आणि लिहिणे यातून तो मला जाणवला होताच. वास्तविक बाबा मुतालिक व्यवसायाने
अभियंता, अभियांत्रिकी क्षेत्र हे त्यांचे कार्यक्षेत्र पण तरीही बाबा या विषयातदेखील
रममाण होतात.
अलकाताईंकडे
तर कितीतरी सांगण्यासारखे होते आणि आहे. वयाच्या १६ व्या वर्षी विवाह झाल्यावर
त्यांनी विवाहानंतर बाबांच्या प्रोत्साहनामुळे आपले शिक्षण पूर्ण केले.
विजापूरजवळील निंबाळ येथे गुरूदेव रानडे यांचा मठ आहे. त्यानेहेमीच तेथे जातात. डॉ.श्रीकृष्ण
देशमुख हे त्यांचे अध्यात्मातील गुरू. त्यांच्या मार्गदर्शनाने त्यांनी वाटचाल
केली आहेत. भारतातील अनेक ठिकाणी तसेच परदेशातही त्यांनी भागवतावर प्रवचने केली
आहेत. माहितीचा आणि ज्ञानाचा खजिनाच त्यांनी बोलताबोलता माझ्यापुढे उलगडला. महर्षी
वेदव्यासांनी
पैल(ॠग्वेद),सुमन्तु(अथर्ववेद),वैशंपायन(यजुर्वेद),जैमिनी(सामवेद)
(यजुर्वेदाचे दोन भाग) असे आपल्या शिष्यांना चारही वेद कसे वाटून दिले, एवढेच
नव्हे वेदग्रंथातील कांड, मंडल, मंत्रांची संख्या, दहा उपनिषदे तर तैतरीय उपनिषदात भाषा, लिपी यासंबंधी
‘शिक्षावल्ली’ हा भाग आहे, शंकराचार्यांनी चारही मठांची कशी स्थापना केली हे सर्व अलकाताईंनी अतिशय रसाळ शब्दात वर्णन
केले. ओघवती भाषा, विषय सोपा करण्याची हातोटी, श्रोत्यांशी सहज संवाद साधण्याची
कला, फाफटपसारा नाही, पोकळ शब्दांचा फुलोरा नाही, काही अवैज्ञानिक किंवा बुवाबाजी,
थोतांड काहीही नाही, शुद्ध आध्यात्मिक आणि सात्विक प्रवचन! त्यांच्याकडील वेद,महाभारत,भागवत
आदी ग्रंथवैभव पाहून माझे मन निवले......!
अलकाताई
आणि बाबा मुतालिक यांच्याशी गप्पा मारताना दोन तास कसे पसार झाले हे कळलेच नाही,,त्यांनी
दिलेल्या फराळाचा आस्वाद घेऊन मी तिथून निघालो.
निघताना
माझ्या मनात त्यांचे एक वाक्य घोळत होते. मुतालिक दाम्पत्य त्याच दिवशी संध्याकाळी,
वेदमूर्ती डॉ. भीमराव कुलकर्णी यांना भेटायला जाणार होते. “तुम्हीही या” असं त्यांनो
सहज म्हणून मला सांगितले होते.
डॉ.भीमराव
कुलकर्णी यांचे नाव मी ऐकून होतो. चारही वेदांचे अनुवाद त्यांनी अत्यंत सोप्या आणि
सामान्य माणसालादेखील समजेल अशा भाषेत लिहिलेले मला ठाऊक होते.त्यातील ॠग्वेद आणि
यजुर्वेद प्रकाशित झाले आहेत. सामवेद आणि
यजुर्वेद प्रकाशित होत आहेत,त्यांचे वय ९८ आहे याची मला कल्पना होती आणि त्याही वयात ते सामवेदावर काम करीत
आहेत, तोही ग्रंथ १००० पृष्ठांवर जाणार आहे. वेदांवर विपुल साहित्य निर्माण करणारे
डॉ. भीमराव कुलकर्णी, जी.एस.मेडिकल कॉलेजमध्ये अध्यापन करीत होते, ते इलेक्ट्रोनिक
इंजिनिअर झाले, अनेक विषयात त्यांना गती आहे, स्वत:चा मोबाईल आणि टीव्ही ते स्वत: दुरुस्त
करतात, याही वयात ते केवळ माहिती मिळविण्यासाठी बाईकवरून किंवा चारचाकीतून दोन दोन
हजार मैलाचा प्रवास करतात, हे सर्व ऐकून त्यांना भेटण्याविषयी मी खूपच उत्सुक होतो.
आणि मुतालिकांनी ‘तुम्हीही या’ असं म्हटल्यावर मी न जाणे शक्यच नव्हते.
संध्याकाळी
डॉ.भीमराव यांच्या घरी पोहोचलो तर सौ. व श्री मुतालिक आलेच होते. डॉ. भीमराव यांचे
ॠषीतुल्य
दर्शन
होताच मी त्यांना वाकून नमस्कार केला आणि अगदी सहज त्यांच्याशी संवाद साधत गेलो.
आधी मनात त्यांच्या मोठेपणाविषयीची
आदरयुक्त भीती होती, ती त्यांच्या दर्शनाने नाहीशी झाली. बोलण्याच्या ओघात
डॉ.भीमराव
कुलकर्णी यांनी किती विषय हाताळावेत?
गायत्री
मंत्राचा अर्थ समजावून सांगताना, गायत्री मंत्रात सूर्यकिरणातील अवरक्त(इन्फ्रारेड),
क्ष-किरण, अल्ट्रा व्हायोलेट किरण यासंबंधीचा उल्लेख कसा आहे येथपासून ते सूर्यावर
दर अकरा वर्षांनी पडणाऱ्या काळ्या डागांची नावे ॠग्वेदात आहेत हे सांगताना त्यांनी
आपल्या हस्ताक्षरात लिहिलेल्या मंत्राच्या जोड्या दाखविल्या.(रुद्राचा संबंध), ॠग्वेदाचा
काळ हा इसवीसनापूर्वी ३७००० वर्षे इतका आहे अशी शासकीय नोंद आहे, तसेच वेदांना
अपौरुषेय का म्हणतात हेही त्यांनी विस्ताराने सांगितले. ॠषींना अवकाशातून आलेल्या
ध्वनींतून वेदांचे ज्ञान झाले आणि नंतर ३३० ॠषींनी त्या ॠग्वेदाला अक्षरांकित केले,
यात काही स्त्री वेदज्ञांचा सहभाग असून,२४९ ॠषी हे आजच्या ‘ब्राह्मण’ या व्याख्येत
न बसणारे होते ही माहिती सांगितली. ॠग्वेदातील यांत्रिक माहितीचाही त्यांनी उल्लेख
केला.
तासभर
चाललेल्या या भेटीत डॉ.भीमराव उर्फ नाना इतकं काही बोलत होते की किती लक्षात ठेवू
आणि किती नाही हे कळत नव्हते. अखंड वाहणाऱ्या प्रवाहात मी न्हात होतो आणि ऐकताना
देहावर काटा येत होता!
९८ वर्षाचे
ॠषीतुल्य डॉ.भीमराव एकटेच राहतात.ज्ञानलालसेने अविरत अभ्यास, संशोधन करणारे डॉ
भीमराव यांना आपल्या विश्वात रममाण झाले आहेत. मला वाटते आज त्यांच्या इतक्या
तोडीचे ज्ञानमहर्षी भारतात फारच थोडे असावेत. भारत सरकारने याची नोंद घेऊन संस्कृत
दिनी या ज्ञानवंतांचा सन्मान व्हावा
सुरुवातीस म्हटल्याप्रमाणे एखादा दिवस असे काही अनोखे दान देऊन जातो
की त्याचे विस्मरण होणे शक्य नाही!
सुरेश देशपांडे/आसावरी,गुप्ते रस्ता,डोंबिवली(प)४२१२०२