बाल्कनी.....!
सध्याच्या स्थानबद्धतेच्या काळात वेळ घालविण्याइतके
कठीण काम कोणतेच नसेल.
घरातील अनेक पुस्तके वाचून झाली, काही पुस्तके
तर दोनदा वाचली. नव्याने अर्थ समजला, वाचन हे
वेळ घालविण्याचे उत्तम साधन असले तरी सतत काही वाचता येत नाही.बरं
टीव्ही तरी किती बघायचा?
आणि का बघायचा? हं, डिस्कवरीवरील बेअर ग्रीलचे अफाट प्रवास किंवा जोशबरोबर
केलेली जुन्या गोष्टींचा शोध घेण्यासाठीची धडपड तसेच प्राचीन वस्तू विकत घेणे/विकणे
यावरील मालिका, हे असे काही कार्यक्रम मनोरंजन आणि खरंच प्रबोधनही करतात. हे कार्यक्रम
मला आवडतात; त्यात काही वेळ जातो पण असं असलं तरी मोकळा वेळ भरपूर असतोच. आता या
वेळेचं काय करायचं याचा माझा मलाच लागलेला शोध म्हणजे माझ्या घरातील बाल्कनी! इतके
दिवस बाल्कनी म्हणजे सहज काही वेळ उभे राहाण्याची जागा, क्वचित खुर्ची टाकून वाचत
बसण्याची जागा इतपत तिचे स्थान! पण या सध्याच्या काळात बाल्कनी हे माझे आवडते
ठिकाण झाले आहे.
बाल्कनी अर्थातच सर्वांसारखी लोखंडी जाळी लावून बंद केलेली आहेच.
त्यात काही फुलझाडे आणि तुळस वगैरे लावली असून वीस फुटांवर नव्याने झालेली इमारत
उभी आहे. या आमच्या दोन इमारतीच्या मध्ये कुंपण भिंत आहे आणि आमच्या इमारतीच्या
आवारात असलेली दोन मोठी झाडे, एक उंबराचे आणि दुसरे जांभळाचे, यांचा प्रचंड
विस्तार दोन्ही इमारतींना लगटून झाला आहे. काही फांद्या तर लोखंडी जाळ्यांच्या
इतक्या जवळ आहेत की हात लांब करून सहज पाने तोडता येतील!
माझ्या बाल्कनीत बसून या झाडांचे आणि झाडांवरील पक्षी पाहाणे हा माझा
अलीकडील जडलेला छंद, मला किती आनंद देतो हे सांगण्यासाठी हा लेखनप्रपंच!
माझ्या एक लक्षात आले की या झाडांवर अनेक पक्षी येतात, कावळे,
चिमण्या (या आता संख्येने कमी झाल्यात)या पक्ष्यांबरोबरच साळुंक्या, कबुतरे असे
नेहेमीचे दिसणारे पक्षी दिवसभर वास्तव्य करून असतात. आणखी निरीक्षणास आलेली गोष्ट
म्हणजे आपली खारुताई! दोन खारुताई आहेत. झुबकेदार शेपटीचा गोंडा, घोंगडीच्या
रंगाच्या पाठीवर रामाच्या बोटांच्या तीन पांढऱ्या रेषा आणि सतत तुरुतुरु धावपळ,
बरं, या दोघीही एकमेकीच्या पाठोपाठ! गंमत म्हणजे सकाळ झाली की या समोरच्या
फांद्यांवर हजर! दोघींपैकी कोणीही आधी आलं तर दुसरीकरता आपल्या ठरावीक आवाजात आवाज
काढणे सुरु... दुसरी खार येईपर्यंत पहिलीचा
आवाज सुरु असतो. तोही अगदी मोठ्याने, प्रत्येक आवाजाबरोबर तिची शेपटी खालीवर होत
असते. हे मात्र माझं खास निरीक्षण! प्रत्येक पक्षी आपल्या तोंडातून आवाज काढताना
आपली शेपटी वर उचलतो. मग तो कावळा असो किंवा साळुंकी.
या खारी फांद्यांच्या मुळाशी किंवा जर दोन फांद्या निराळ्या दिशेने
जात असतील तर त्यांच्या सांध्यापाशी आपली चोची रुतवून त्यातला गर खायचा प्रयत्न
करतात. कितीतरी वेळ चोची त्यात खुपसून त्या काय करतात कोणास ठाऊक? मध्येच त्या
चोची बाहेर काढून पुन्हा त्यांची धावपळ सुरु होते. दिवसभर त्यांचा हाच खेळ असतो. मध्येच
एखादी खारुताई आपल्या मागच्या दोन पायावर उभी राहून पुढच्या दोन हातांनी(!) आपले
पोट खाजवत बसते, त्यावेळचे तिचे दिसणे खूपच विलोभनीय असते.
साळुंक्या जिथे बसतील तिथून त्यांचा प्रचंड कलकलाट चालू असतो. आपल्या
तीव्र आवाजात त्या इतक्या कचकचाट करीत असतात की ‘साळकायामाळकाया’ भांडत आहेत असेच
वाटते. त्यांची ही भांडाभांडी जागेच्या मालकीवरून सुरु असते असे म्हणतात.
अलीकडेच एक छोटा पण अतिशय स्मार्ट पक्षी यायला लागलाय. तळहाताएवढा
असलेला हा पक्षी आपल्या खणखणीत आवाजात बोलतो. ओरडताना त्याचीही शेपटी उभी राहते,
पक्षीतज्ज्ञ असलेल्या माझ्या मित्राला, प्रल्हादला विचारले तर तो म्हणाला हा पक्षी
म्हणजे शिंपी पक्षी. खूप धीट असला तरी खूप चंचल आहे, क्षणक्षणाला तो आपली जागा
बदलतो, पानांआड दडून बसतो आणि सतत आपल्या तीक्ष्ण आवाजात बोलत असतो. या पक्षाच्या
आवाजाला नेमके काय नाव द्यावे कळत नाही. आणखीन दोन प्रकारचे पक्षी दिसतात पण
त्यांची नावे माहीत नाहीत, दोन्ही पक्षी खूपच चपळ आणि चंचल आहेत.
कावळ्यांकडे बघताना एक लक्षात आले की या कावळ्यांचा आकार मोठा आहे!
पुन्हा माझ्या मित्राला विचारले तर तो म्हणाला, एरवी शहरापासून दूर रेतीबंदरच्या
आसपास राहणारे डोमकावळे आता शहरी वस्तीत खाण्यासाठी यायला लागले आहेत. यातला एक
कावळा आपल्या धारदार चोचीने दोन
फांद्यांच्या मधल्या गोल भागाला सपाट करण्याच्या प्रयत्न करत होता. त्या जागेवर
येताना लहान लहान काड्या, सुतळ, प्लास्टिकचे तुकडे आणून पावसाळ्यापूर्वी तो घरटे
करण्याच्या प्रयत्नात आहे. मध्येच तो चारही दिशेला मान वळवून कावकाव करत इतर कावळ्यांना
मदतीला या असे बोलावतो,पण कोणीही येत नाही!
मित्र म्हणाला जर घरटे झाडाच्या शेंड्यापासून खूप खाली असेल तर पाऊस
भरपूर येणार आणि जर शेंड्याजवळ असेल तर पाऊस कमी पडणार, पक्ष्यांना हे बरोबर कळते!
कबुतर हा मात्र मला अतिशय निर्बुद्ध पक्षी वाटतो. झाडांवरून लोखंडी
जाळीवर आणि पुन्हा फांदी अशाच दिवसभर त्यांच्या फेऱ्या सुरु असतात. बसतील तिथे घाण
करतात आणि घशातून घूत्कार काढत घुमत असतात. आपले गोल आणि रंगीत डोळे फिरवीत नि मान
हलवत ही कबुतरे कुठे आणि काय बघत असतात कोण जाणे!
मध्यंतरी वादळ झाले, उंबर आणि जांभूळ दोन्ही झाडे खूपच जोराने हलत
होती, काही वेळा तर असे वाटले आता कोणत्याही क्षणी ती पडतील पण अजून टिकून आहेत!
या झाडांच्या फांद्या जेंव्हा वरखाली होत असत तेंव्हा काही धीटुकले पक्षी त्या
फांद्यांवरून वरखाली, मजेत झुलत होते. या सर्व पक्ष्यांच्या जोडीने मधूनच लोखंडी जाळीतून
आतबाहेर करणारी संख्येने फार नाही पण दोन तीन फुलपाखरेदेखील माझ्या आनंदात भर
घालतात.
पक्षी निरीक्षणाचा हा छंद मला दिवसभर व्यस्त
ठेवतो. तासनतास बघत बसलो तरी कंटाळा येत नाही, माझ्याच घरातील एका सुंदर जागेचा
शोध जसा लागला तसेच सलीम अली किंवा आपले मारोतराव चितमपल्ली आपले आयुष्य या पक्ष्यांच्या
सान्निध्यात कसे काय काढू शकले याचे आता आश्चर्य वाटेनासे झाले आहे; त्यातला अनोखा आनंद आता मलादेखील
समजू, कळू आणि मिळू लागला आहे! निसर्गात किती प्रकारचे वैविध्य आहे, सर्वच पक्षी
कसे खेळीमेळीने एकमेकाच्या सहवासात रमले आहेत, आणि झाडं! तीही सजीवच असतात ना!
आपल्या अंगाखांद्यावर या सर्व पक्ष्यांना वावरू देतात, त्यांना अन्न देतात नि
निवाराही! अशा प्रकारचे सहजीवन पुस्तकात वाचून माहीत होते पण आता प्रत्यक्ष
पाहतांना,माझे जीवनदेखील समृद्ध होत जाते हा शोध ही या काळाची मला मिळालेली देणगी
आहे. संकटातही संधी शोधता येते, हाही एक शोधच!
सुरेश
देशपांडे, बी १२, आसावरी सोसायटी, गुप्ते रस्ता, डोंबिवली (प) ४२१२०२
E
mail:scd2000@gmail.com / Mobile 8356031710
No comments:
Post a Comment