Monday, June 14, 2021

 

मोर आणि रावा .....!

आजच्या अत्यंत नीरस आणि रुक्ष बनलेल्या आपल्या आयुष्यात अवचितपणे एखाद्या दिवसाचे

दिवसाचे असे अनोखे दान पदरात पडते की केवळ आपणच नव्हे तर आपल्या आजूबाजूचा परिसर

आनंद आणि उत्साहाने भरून जावा! अचानक नजरेला पडणारे सुरेख दृश्य, काळजाला भिडणारे सुरेल

स्वरातील गाणं, मनात रेंगाळणारी कविता किंवा लक्षात राहील असा सुंदर लेख असं काही पाहिलं,

ऐकलं वाचलं की वाटतं जीवन काही अगदीच रुक्ष नाही!

बऱ्याच वर्षांपूर्वी ‘मोर यावा रे’ हा ललित लेख वाचला होता नि तो लेख, त्या लेखातील,पिसारा फुलवून थुईथुई नाचणारा मोर अजूनही मनात ताजा आहे. बाल्कनीएवढं आकाश लाभलेल्या आमच्या घरातून सूर्य,चंद्र नि तारे यांचेही दर्शन घडू शकत नाही! अशा वेळेस मनात रेंगाळणारा मोर मनाला भुरळ घालतो, चित्त पालवतो पण समजा असं मोहक निसर्ग लेणं जर खरोखरीच दारी अवतरलं तर.....?

परवाचा दिवस अगदीच वेगळा होता! तिसऱ्या मजल्यावरच्या आमच्या बाल्कनीपर्यंत झाडे वाढली आहेत. गुलमोहोरही त्यात आहे. मध्यंतरी अगदीच पर्णहीन झालेल्या त्याच्या फांद्या म्हणजे दरिद्री नारायणाच्या देहाच्या बरगड्याच! पण कालांतराने त्याला पालवी फुटू लागली नि आता त्यांच्या टोकाटोकाला फुटणारी इवलीइवली हिरवी पानं नवजात अर्भकाच्या टाळूवरील लवेसारखी मऊशार

दिसतात. हे गुलमोहोराचं झाड जसा माझ्या दृष्टीचा विसावा तसच पक्ष्यांच्या बागडण्याचा निवारा! रोज साधारणपणे पहाटे पाच साडेपाचनंतर सुमारास चिवचिव कानावर पडायला लागते नि मनात ते तो नाद घुमत असताना हळूहळू चिवचिवाट वाढत जातो.

सहा साडेसहाच्या सुमारास बाल्कनीच्या कठड्यावर कोपरे टेकवून नि हाताच्या ओंजळीत हनुवटी टेकवून झाडांच्या हिरव्या पानात चिवचिवत बसलेल्या चिमण्यांकडे पाहत मी उभा असतो. मंदगारशा हवेत नि उजळत जाणाऱ्या दिशांत लक्षात येतं की या चिमण्यांमध्ये प्रचंड ऊर्जा आहे, प्रचंड जीवनोत्साह त्यांच्यात भरला आहे. मधूनमधून फांदीवर चोची घासून धार काढीत, मध्येच चोच आपल्या छातीशी आतल्या बाजूस वळवून तर कधी डावी उजवीकडच्या पंखात खुपसून त्यांचं अंग स्वच्छ करणं चालू असतं. जोडीला अखंड चिवचिव चालूच असते. मध्येच एखाद चिमणा लाडात येऊन प्रणयाराधन करायला बघतो तर लटक्या रागाने चिमणी दूर जाते. मग चिमणा एखादं फूट अलीकडे पलीकडे सरकतो, खालच्या किंवा वरच्या फांदीवर जातो नि काही क्षणातच चिमणी त्याच्या मागोमाग जाते.

प्रणयाचा असा अनुराग, अनुनय, चिवचिवणं म्हणजे जणू काही प्रत:कालीन उषासूक्तच! हा सकाळचा पंधरावीस मिनिटांचा डोळ्यांचा नि कानांचा आनंदोत्सवच!

आणि दोन दिवसांपूर्वी अचानक एक हिरवं गाणं अवतरलं! बाल्कनीच्या बाहेर स्टँडमघ्ये काही कुंड्या ठेवल्या आहेत. गुलाब, मोगरा अशी काही फुलझाडे आहेत. चिमण्यांकडे ओठंगून पाहत असताना कुठून तरी एक हिरवा रावा अचानक आला नि लोखंडी स्टँडवर अलगद् बसला. काहीतरी आल्याचं जाणवलं म्हणून मान वळवून बघितलं तर चक्क एक पोपट तिथे येऊन बसला होता नि ऐटीत मान इकडेतिकडे करीत गोलगोल डोळ्यांनी पाहत होता. क्षणभर माझ्याच नजरेवर माझा विश्वास बसेना. एक निसर्गलेणं माझ्या बाल्कनीत अनाहूतपणे आलं होतं आणि मला काय करावं ते समजेना. मी एकटक नजरेने पाहत होतो. त्याची बाकदार चोच, गोल फिरणारे डोळे, मानेवर लालसर रंगाचा पट्टा नि अंगभर पसरलेलं हिरवेपण! त्याने जागच्याजागी एकदोनदा पाय उचलले, ठेवले, घशातून अनोळखी स्वर काढले. हा नयनोत्सव पाहण्यासाठी मी माझ्या पत्नीला खुणावतोय तोच क्षणात ते चैतन्य उडून गेले! पत्नी येऊन उभी राहिली नि मी तिला, अगदी इथे, आता काही क्षणांपूर्वी पोपट येऊन बसला होता असं अप्रूपतेने सांगितलं. पण तिचा विश्वास बसेना. काही वर्षांपूर्वी माळशेज घाटातल्या पक्ष्यांच्या आत्मघातानं व्याकूळ झालेलं मला तिने पाहिलं होतं. त्यामुळे नादिष्ट्पणाने मला भास झाला असावा असं तिला वाटलं. मारुती चितमपल्ली, लालू दुर्वे यांची पुस्तके वाचतो म्हणूनही असले भास होत असावेत असंही तिला वाटलं. पण माझ्यापुरतं हे सत्य होतं नि राहणार आहे. मनात अनेक महिने रेंगाळणारा लेखातील मोर नि आजचा रावा यांनी माझं स्मृतीभांडार समृद्ध केलंय एवढं मात्र नक्की!

सुरेश देशपांडे/डोंबिवली(प)/ मोबाईल-८३५६०३१७१०/E Mail:scd2000@gmail.com                                               

  

          

No comments:

Post a Comment