Thursday, December 21, 2023



लेखनाचे सर्वच प्रकार मला आवडतात, म्हणून माझ्याकडून कादंबरी आणि कथालेखन आणि ललित लेखन झाले.

२०१९ मध्ये मेहता पब्लिशिंग हाऊस यांनी इंग्रजी कादंबऱ्यांचे अनुवाद करण्याची संधी दिली आणि

रॉबर्ट क्रेस यांच्या चार कादंबऱ्या मी अनुवादित केल्या. त्यानंतर मेहता पब्लिशिंग हाऊस यांनी पुनः एकदा एक मोठी संधी दिली; ती म्हणजे माध्यमतज्ज्ञ नलिन मेहता यांनी लिहिलेल्या

MODI – AND THE MAKING OF WORLD’S LARGEST POLITICAL PARTY  

THE NEW B J P ; या ८५० पृष्ठांच्या बृहत ग्रंथातील ६०० पृष्ठांचे अनुवाद करण्याची जबाबदारी सोपवली. आधी मी एवढे मोठे काम स्वीकारण्यास काहीसा अनुत्सुक होतो; परंतु माझी पत्नी अनघा हिने मला प्रोत्साहन दिले आणि, एक आव्हान’ म्हणून मी हे काम स्वीकारावे असे सांगितले. तिच्या आग्रहाखातर आणि प्रोत्साहनाने मी हे काम स्वीकारले.

रोज सकाळी ५.३०, ५.४० च्या दरम्यान माझे काम सुरू व्हायचे आणि दिवसभरात ते सुरूच राहायचे; मला लागणाऱ्या सर्व गोष्टी ती टेबलवर आणून द्यायची. ‘किती काम झाले’ याची रोजच चौकशी करायची एवढेच नव्हे तर मला कंटाळा येऊ नये म्हणून माझ्यासमोर बसून तीही ‘गजानन विजय’ गुरुचरित्र’ आणि ;श्रीपाद श्रीवल्लभ’ या मोठ्या पोथ्या स्व हस्ताक्षरात लिहीत बसायची. रात्री अकरापर्यंत हे काम चालायचे. साधारण चार महिने झाले आणि माझे अनुवादाचे  काम संपत आले होते आणि तिच्या पोथ्याही लिहून झाल्या असताना अचानक ती २ जुलैला आजारी  पडली आणि ६ जुलैच्या पहाटे तिचे दू:खद निधन झाले. माझ्यावर हा असह्य असा आघात होता पण त्यातून सावरून केवळ तीची इच्छा म्हणून मी अनुवादाचे काम पूर्ण केले आणि मेहता पब्लिशिंग हाऊस त्यांच्याकडे पाठवून दिले. आणि आज २० डिसेंबर २०२३ रोजी सुंदर रीतीने छापलेल्या या अनुवादाच्या  प्रती माझ्या हातात पडल्या.

जिच्या प्रोत्साहनाने हे काम स्वीकारले, जिने मला साथ दिली ती मात्र पूर्ण झालेले काम पाहायला आज नाही, ही खंत आणि सल माझ्या मनात कायमची राहील. अनुवंडकाचे मनोगत म्हणून ही साहित्यकृती

तिलाच अर्पण करण्याची माझी विनंती मान्य केली गेली आणि तशी अर्पण पत्रिका पुस्तकात आहे.    

सुरुवात करणारा शेवटपर्यंत नसावा, जीवनात अपूर्णता राहावी, हीच तर नियती !         

Tuesday, December 12, 2023

 




मध्यंतरी एक विडिओ बराच व्हायरल झाला  होता. मुंबईहून द्रुतगती मार्गाने पुण्याला जाताना खालापूर टोल नाक्यानंतर लागणाऱ्या मॉलमधील पुस्तकाच्या दालनाचा तो व्हिडिओ होता.

त्या व्हीडिओमध्ये मराठी  मालिकेतील एक अभिनेते श्री मिलिंद गवळी या मॉलमधील पुस्तकाच्या दालनासंबंधीची माहिती सांगून, असे आवाहन करीत होते की पुण्याला जाणाऱ्या लोकांनी आवर्जून या पुस्तक दालनाला  भेट द्यावी. असे सांगताना ते त्यांच्या हातातील चार पुस्तके दाखवत होते आणि त्यात मी अनुवादित केलेले “आर्ट ऑफ वोर “ हे   पुस्तक होते. तो व्हिडिओ माझ्याही पाहण्यात आला होता.

आता परवा ९ डिसेंबरला  मी माझ्या मुळीसह पुण्याला जाताना त्या मॉलमध्ये गेलो आणि मी लगेच व्हीडिओमध्ये दाखविण्यात आलेल्या पुस्तक दालनात गेलो. पूर्वी मी फक्त जिन्याच्या बाजूला असलेली पुस्तके चाळत असे पण या वेळेस वरच्या मजल्यावर गेलो. तिथे असंख्य पुस्तके होती ती. सर्व पुस्तके बघून झाल्यावर खाली आलो आणि तिथे पुस्तके विक्री करत असलेल्या  गृहस्थांची +वीरेन्द्र गुप्ता यांची ओळख करून घेतली. गुप्ताजी  केवळ पुस्तक विक्रेते नाहीत तर ते पुस्तकप्रेमीही आहेत आणि अनेक पुस्तकांची माहिती  त्यांना आहे. मी  व्हीडिओमाधील पुस्तकाचा अनुवादक  आहे असे कळल्यावर त्यांनी अत्यंत आदराने मला बसावयास सांगितले. माझ्या अन्य पुस्तकांची चौकशी केली . निघताना मी गुप्ताजींबरोबर फोटो  घ्यावा अशी विनंती केली तर त्यांनी मला श्रीमंद भागवद्गीतेची प्रत   भेट देताना फोटो काढावा असे सुचवले आणि तो फोटो घेतला गेला.

मित्रांनो, आपण अनेकदा जेव्हा कधी पुण्यास जाल तेव्हा  आवर्जून या मॉलमधील पुस्तक दालणाला भेआवर्जून  आणि पुस्तकपरेमी असलेल्या श्री वीरेन्द्र गुप्ता यांनाही भेटा.