Saturday, June 13, 2026

 

पुस्तकप्रेमी समूहाचे अखंड पुस्तक परिचय अभियान

आठवडा २८५ - दिनांक २३ .११.२०२५

पुस्तक क्रमांक -१९९५

पुस्तकाचे नाव – भारतीय गणितींची चरित्रे अर्थात

                           भारतीय गणिताचा जगात गौरव

लेखक – श्याम मराठे

प्रकाशक – साहित्य प्रसार केंद्र , नागपूर

द्वितीय आवृत्ती – १० मे १९८९

परिचयकर्ता -  सुरेश देशपांडे

आज ज्या पुस्तकाचा मी परिचय करून देणार आहे ते एक प्रचंड  पुस्तक आहे आणि त्या पुस्तकाचा परिचय करून देण्याचा  प्रयत्न करतोय  कारण या पुस्तकासंबंधी किती लिहू आणि काय लिहू हा प्रश्न आहे.  १० मे १९८९ या दिवशी हे पुस्तक प्रसिद्ध झाले आणि मी ते २५ सप्टेंबर १९८९ या दिवशी खरेदी केले.  (गणित हा विषय माझ्या आवडीचा म्हणून!)

नावाप्रमाणेच या पुस्तकात भारतीय गणितींची चरित्रे आहेत परंतु मुख्य म्हणजे गणिताविषयी किंवा गणित म्हणजे काय अशी सुरुवात करून लेखक श्याम मराठे गणिताविषयी एवढी मूलभूत माहिती देतात की आपण किती मोजणार याचे गणितच करायचे विसरून जातो !

अनुक्रमणिकेतील काही विषय बघा. १) माणूस जेव्हा ‘मोजू’ लागला २) संख्येची जाण- गणित इतिहास! ३) हातापायांची बोटे ४) प्राचीन भारतीय गणितींचे लेखन साहित्य ५) अंक -सुंदरीची विविध रूपे  ६) ‘एकूण किती? ७) अंक लेखनकलेचे वेदकालीन ज्ञान ८) वेदकालीन संख्याज्ञान ९) भारतीय दशमान पद्धती १०) भारताला गणितात ‘शून्य मिळाले! ११) भारत आणि गणित प्रतीके १२) पायथागोरस थेरम, छे! हे तर शुल्बसूत्र १३) ‘२ या संख्येचे  वर्गमूळ काढणे इत्यादी इत्यादी ... असे एकूण ३३ लेख आहेत . २७० पृष्ठांचे हे पुस्तक मी आता तिसरयादा वाचले तरीही सर्व  समजले आहे असे नाही हे एक आणि जेवढे समजते आहे ते लक्षात आणून वाचण्यासही जवळपास २० दिवस लागले ! 

 गणित‘गम्य’ व्हायचे असेल तर प्रथम ते रम्य व्हायला हवे ! गणित हे तर्कशास्त्राच्या सामर्थ्यावर उभे राहिले आहे.  श्रवण, दृष्टी, गंध, स्पर्श, आणि चव अशी पाचही इंद्रिये जेव्हा थिटी पडतात तेव्हा न कळलेल्या गोष्टींविषयी अनुमान करणे , निष्कर्ष काढणे असे ज्ञान, तर्कशक्ती माणसाला मिळवून देते.. उदाहरण म्हणजे चंद्रावर जाण्यासाठी किती वेळ लागेल हे जाणण्यासाठी प्रत्यक्ष प्रवास करावा लागत नाही तर ते गणिताने समजू शकते म्हणजेच तर्काने कळू शकते!  गणिताच्या जागतिक इतिहासात भारतीय गणितींनी अजरामर कार्य करून ठेवलेले आहे. गणित हे असे एक ज्ञानक्षेत्र आहे की ज्यात भारताला एक खास अधिकार प्राप्त झाला आहे.

संख्यांची जाण अन् संख्याचिन्हे या दोन गोष्टी पूर्णपणे वेगळ्या आहेत.  आकडे म्हणजे संख्यांना ठरवून दिलेली चिन्हे. आणि हे आकडे देश कालपरत्वे वेगळे असतात. आकडे म्हणजे संख्या नव्हे ! आता ८ म्हणजे आठ या संख्येला दिलेले एक दृश्य रूप आहे पण प्रत्यक्षात आठ ही केवळ एक कल्पनाच आहे कारण संख्या ही डोळ्यांना दिसत नाही.  ती एक जाणीव आहे

विचारप्रवर्तक माहिती देत हे पुस्तक पुढे जाते -  भारतात करंगळीच्या बाजूचे बोट पूर्वी हिशेबासाठी धरत नसत. ( अनामिका) त्त्रिमान, चतुर्मान पद्धत प्रचारात होती. पंजाची पाचही बोटे धरून पंचमान पद्धतही अस्तित्वात होती. पुढे षष्ठमन पद्धती त्याही पुढे दहाही बोटे धरून दशमान पद्धती क्रमप्राप्त होती. पण अंकगणना इथे थांबली नाही तर प्रत्येक बोटाला तीन पेरे, अंगठ्याला दोन पेरे  असे भरपूर उपभाग लक्षात आल्यावर द्वादशमान पद्धत आली आणि माणूस द्वादश म्हणजेच बाराच्या प्रेमात पडला .... बारा राशी, बारा महिने, बारा ज्योतिर्लिंगे, घड्याळाचे बारा आकडे, बारा बलुतेदार इत्यादी! परंतु त्यानंतर हे लक्षात आले की दशमान पद्धती ही अधिक सोयीची असल्याने गणना दशमानावर स्थिरावली ! मग पुढे हाताच्या बोटावर माणूस ९९,९९९ पर्यंतच्या संख्येचे हिशेब करायला लागला ! ( त्याची अनेक उदाहरणे या पुस्तकात आहेत. १४७ * ९ असे गुणाकार बोटांवर करता येतात! ( हे वाचून बोटे तोंडात { स्वत:च्याच } जातील!)  

प्राचीन भारतीय गणितींचे लेखन साहित्य म्हणजे ताडपत्र, भूर्जपत्र, पाटी-गणित, फलकवांङमय, कौशेयपट, चर्मपट     ताम्रपट, शिलालेख इत्यादी. वृक्षाच्या सालीस तेल लावून, घोटून, हव्या त्या आकाराची पाने कापून घेता येतात. पानाच्या लांबी रुंदी इतक्या आकराच्या लाकडी फळ्या पानांच्या खालीवर ठेवून मग एका बाजूस सलग भोके पडून त्यातून दोरा ओवून म्हणजेच सूत्राने पोथी बांधणी होई.  हे अविनाशी साहित्य जर प्राचीन भारतीय गणितींनी उपयोगात आणले नसते तर आपण फार मोठ्या सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि वैचारिक वांङमयास मुकलो असतो.

दशमान पद्धतीत पुढे  संख्या लेखनात शब्दांक हा  प्रयोग करण्यात आला. शब्दांकाच्याबाबतीतला इतिहास आणि माहिती खूप आहे ती सर्व इथे देणे शक्य नाही. परंतु ही पद्धत भारतभर वापरली जात होती. इ.स. ९४५ मधील एका दानपत्रात शब्दांकाचा वापर केला गेला आहे.

ऋग्वेदात १००० अष्टकर्णी गाई दान दिल्याचा उल्लेख आहे म्हणजे वेदकाळात संख्या ज्ञान होते हे सिद्ध होते. आणि अंकलेखनाची पद्धतही होती. गुणय (गुणाकार) विभज् ( भागाकार) परिणाह (परिघ) विष्कम्भ (व्यास) असे अनेक शब्द अनेक वेळा आहेत. दशमान पद्धतीचा वापर वेदांत अनेक ठिकाणी आहे. युज. वाज.संहितेमधून पुढीलप्रमाणे संख्या मिळतात. एक दश, शत, ..........अयुत (१०,०००) नियुत, प्रयुत, अर्बुद, न्युर्बुद, समुद्र, मध्य अंत, परार्ध (आजच्या भाषेत एक लाख कोटी!) दशमान पद्धतीचे श्रेय भारताचे आहे असे जगातील अनेक गणितींनी मोकळ्या मानाने मान्य केले आहे.

शून्याचा शोध लागल्यामुळे गणिताला पूर्णत्व आले आणि संख्यांना त्या त्या ठिकाणच्या किमतीही लागू शकल्या आणि सगळेच सोपे झाले. भारताबाहेर शून्याला अशी नावे होती. शून्य = निर्वात जागा, शून्य= सायफोस, शून्य =झेफिरो, शून्य= झिफ्रा (याचेच पुढे झिरो झाले) हिंदू वांङमयात जसा गणिताचा उल्लेख आहे तसेच अनेक उल्लेख जैन आणि बौद्ध वांङमयातही आहेत.  थोडे पुढे जाऊ, याच वेदकालीन गणितात यज्ञाच्या मांडणीचे शास्त्र दिले असून यज्ञ कोणी कसा करावा याविषयी माहिती आहे,

भारतीय गणिताविषयी सिरीया, अरब ( सेबेरस ६६२, इब्न वहशिया ८५५,ज्याहीज ८६९, अल मसौडी ९४३ असे अनेक  )

युरोपीय उल्लेख -आसोडोरस, रब्बी बेन एजरा, ल्योनार्डो, अलेक्झांदर डे विला दाई, माग्सिसुस ) असे उल्लेख आहेत.

भारतीय गणिताला जगात हिंदसा गणित म्हणून ओळखले जात होते आणि ते प्रथम अरबस्थानात तिथून स्पेन इटली आणि मग युरोपात पसरले. हे गणित तिथे जाईपर्यंत त्या लोकांना गणित माहीत नव्हते असे नाही तर अनेक त्रुटी होत्या. विशेषत: ‘वजा’  करणे या क्रियेसाठी चिन्ह नव्हते. त्यासाठी ते क्वचित टिंब वापरात असत किंवा अंकाच्या डोक्यावर आडवी रेघ मारली जात असे.

शुल्ब याचा अर्थ दोरी असा होतो आणि यज्ञवेदी होमकुंड यांचे आकार निश्चित करणारे नियम म्हणजे सूत्र म्हणून शुल्बसूत्र ! आजमितीला फार थोडी शुल्बसूत्रे उपलब्ध आहेत. कात्यायन, बौधायन, आपस्तंभ, सत्यासंध , मानव, मैत्रायणीय, वरः, वाधुल अशी काही मोजकीच शुल्बसूत्रे उपलब्ध आहेत बाकीची नष्ट झाली.

आयताच्या कर्णाचा वर्ग = त्याच्या दोन संलग्न बाजूंच्या वर्गाची बेरीज हा पायथागोरसचा सिद्धांत असे म्हटले जात असले तरी त्याचा काल इ.स. पूर्व ५६८ ते ५०० असा होता तर शुल्बसूत्रांचा काळ इ.स. पूर्व ३००० वर्षांचा आहे आणि ते शुल्बसूत्र असे आहे- “दीर्घस्याक्ष्णया रज्जु: पार्श्वमानी तिर्यङमानी च यत्पृथग्भूते कुरूत स्तदुभयं  करोति”  हे  सूत्र भारतातून पर्शियात आणि तिथून ते त्याच्यापर्यंत पोहोचले असावे असा समज आहे.

दोन या संख्यचे वर्गमूळ काढण्याचेही प्रयत्न वेदकाळात झाले होते.त्याचे सविस्तर सोदाहरण विवेचन दिले आहे.

सर्वच शुल्बसूत्रांनी असा एक प्रयत्न केला की वर्तुळाच्या क्षेत्रफळाइतका चौरस किंवा चौरसाच्या क्षेत्रफळाइतके वर्तुळ कसे काढायचे? यासाठी क्षेत्रफळ, व्यास आणि परीघ तसेच    √२ ( २ चे वर्गमूळ) याची माहिती आवश्यक आहे. या कूट प्रश्नाचेही साधार स्पष्टीकरण पुस्तकात गणितींची माहिती देताना दिली आहे.

प्राचीन भारतीय ज्योतिर्गणित आणि पंचांग गणित याविषयीही सविस्तर माहिती देण्यात आली आहे. गणिताच्या इतिहासात ज्योतिर्गणित गणितापासून वेगळे करता येणारच नाही अशा प्रकारे या दोन्ही शस्त्रांचा एकत्र प्रवास झालेला आहे. वैदिक काळात चांद्रवर्ष आणि सौरवर्ष यातील भेद लक्षात घेऊन ‘अधिक मास धरण्याची व्यवस्था होती. वैदिक काल इ.स.पूर्व ५००० वर्षे इतका जुना मानला जातो. इ.स.पूर्व ३००० या काळातील ऐतरीय ब्राह्मण ग्रंथात वर्षाचे सहा ऋतू, महिन्याचे शुक्ल आणि कृष्ण पक्ष तसेच सूर्य चंद्र बृहस्पती शुक्र आणि २७ नक्षत्रे यांचा उल्लेख आहे. हा फक्त ढोबळ उल्लेख आहे , त्यात अजून खोल जाता येईल इतके ज्ञान आहे.

गणिताचा जन्म या भूमीत झाला हे सिद्ध करण्याची गरज का पडावी ? याचे कारण मध्यंतरीच्या काळात आपले वैदिक ज्ञान लुप्त झाल्याने आणि युरोपात १६ ते १९ व्या शतकात गणित शास्त्रात बरीच प्रगती झाल्याने युरोपियांनी एक खोटाच गणेतिहास जगापुढे मांडला. त्यांच्या मते ग्रीकांच्या आधी अंकगणित नव्हते, डायफांटसच्या आधी बीजगणित नव्हते आणि पायथागोरसच्या आधी भूमिती नव्हती! पण हे त्यांचे सर्व दावे बखशाली हस्तलिखित  मिळाल्यामुळे  फोल ठरले आहेत.

बखशाली हस्तलिखित  इ.स. तिसऱ्या शतकातील असून भारताच्या उत्तर पश्चिम सीमेवरील बखशाली (पेशावरजवळील मार्दन जिल्ह्यात) खेड्यात एका शेतकऱ्याला पाण्यासाठी जमीन खोदताना सापडले. भूर्ज पत्रावर लिहिलेला हा ग्रंथ होता. एका जाडजूड दगडाच्या त्रिकोणी आकाराच्या भिंती, खालीवर शिळा ठेवून बंदिस्त केलेले असे पेटाऱ्यासारखे त्या शेतकऱ्याला सापडले. आत एक पोकळी होती आणि ७० भूर्जपत्रे होती. या ग्रंथात गणिताविषयी प्रचंड माहिती आहे आणि हे जेव्हा उघड झाले तेव्हा गणित विश्वात खळबळ माजली कारण तोपर्यंतचे गणित ज्ञान हे इसवीसनानंतरचे होते आणि या हस्तलिखिताने ते ज्ञान त्याही आधीपासूनचे आहे हे सांगितले! 

पुढील प्रकरणात भारतात आर्यभट प्रथम याच्याविषयी विस्तृत माहिती आली आहे.

सूर्य स्थिर असून पृथ्वी त्याच्या भोवती फिरते असे सांगणारा आर्यभट पहिला !एका वर्षात ३६५.२५८ दिवस असतात हे त्याने सांगितले. सूर्य पृथ्वी आणि चंद्र यांच्यातील अंतर त्याने सांगितले. विश्वासंबंधी माहिती देणारा आर्यभट याने स्वत:बद्दल एका अक्षरही लिहून ठेवले नाही. डॉ. भाऊ दाजी लाड यांनी जंग जंग पछाडून ‘आर्यभटीय’ या ग्रंथाचा शोध लावला आणि डॉ.केर्न यांनी १८७५ मध्ये हॉलंडमध्ये प्रकाशित केला. मात्र आर्यभट याचा दुसरा ग्रंथ ‘ तंत्र हा मात्र मिळाला नाही हे दुर्दैव! मानवीय ज्ञानाच्या क्रांतीतील दोन महत्त्वाचे शोध म्हणजे

१)पृथ्वी स्वत:च्या अक्षाभोवती फिरत असते आणि २) पृथ्वी आणि इतर ग्रह हे सूर्याभोवती फिरतात. या दोन महत्त्वाच्या मुद्यावरून ज्ञानाने प्रगती केली! आर्यभट हा पहिला आचार्य ज्याने आपल्या ‘ज्योतिषसिद्धांत या ग्रंथात अंकगणित, बीजगणित आणि रेखागणिताचे प्रश्न दिले. वर्ग, वर्गक्षेत्र, घन, घनफळ, घनमूळ, वर्गमूळ, त्रिकोण, वृत्तचित्ती

वर्तुळ अशी अनेक सूत्रे आणि नियम त्याने दिले आहेत. त्याने ० अंशापासून ९० अंशापर्यंतचे भूज-ज्या ( SINE TABLE) दिले आहे!   

त्यानंतर येतो वराहमिहिर! त्याच्या आसपास प्रद्युम्न हाही गणिती होता. त्याशिवाय लाटदेव,  नि:शंक, विजयनंदिन, सिंह, पांडुरंग हेही महत्त्वाचे गणिती होऊन गेले.  वराहमिहीर याचे ‘पंचसिद्धांतिका’ ‘सिद्धांतपंचक’ असे ग्रंथ प्रसिद्ध आहेत.   फलज्योतिष छंद सोडून त्याने जर पदार्थाच्या गुणधर्माचाच अभ्यास केला असता तर वराहमिहीर हा जगातील पहिला पदार्थ वैज्ञानिक ठरला असता.  भारताने विज्ञानात युरोपला मागे टाकले असते.  गुरुत्वाकर्षणाच्या अस्तित्वाची जाणीव त्यानेच प्रथम करून दिली! असे त्याच्याबद्दल खूप सांगता येईल.

‘आर्यभट याच्या सर्व सिद्धांताचे खंडन करणारा बंडखोर गणिती’ अशी प्रसिद्धी मिळविण्याचा ध्यास घेणारा ब्रह्मगुप्त हा आर्यभटचा टीकाकार. त्याने तीन ग्रंथ लिहिले १) ब्रह्मस्फुट सिद्धांत २) खंड- खाद्यक ३) उत्तर खंड-खाद्यक . या ग्रंथात आधीचा काही ग्रंथांवर टीका आहे अंकगणित, बीजगणित यावरही टीका आहे. अकराव्या अध्यायात त्याने इतकी दूषणे दिली आहेत की त्याला ‘दूषणाध्याय ‘ असेच म्हणावे लागेल.

भास्कर (प्रथम), लल्ल, पद्मनाथ, श्रीधर, माधव, मुंजल आणि शतानंद असे आणखीन काही गणिती होऊन गेले. त्यांचे नाव आपण जरी ऐकले नसतील तरी प्रत्येकाने आपापल्या परीने गणितात मोलाची भर घातली आहे.

द्वितीय आर्यभट याचे ‘कटपयादि’ सूत्र प्रसिद्ध आहे. त्याने एकच ग्रंथ लिहिला. या ग्रंथात पाटी – गणित किंवा अंकगणित आहे. त्यासाठी त्याने दशमान पद्धती आणि ० ते ९ आणि १० असे अंक वापरले आहेत.

‘लीलावती हा ग्रंथ लिहिणारे गणिती भास्कर द्वितीय किंवा भास्कराचार्य म्हणून प्रसिद्ध आहेत. वरील सर्व उल्लेखित ग्रंथाचा एक विशेष असा सांगता येईल की या ग्रंथांत गणित आणि काव्य हे हातात हात घालूनच आले आहेत. संख्या संकेत हा भास्कराचार्य यांचा विशेष होता.’ सिद्धांत शिरोमणी  हा त्यांचा पहिला ग्रंथ. या ग्रंथावर अनेक टीका उपलब्ध आहेत. ‘करणकुतूहल’ हा त्यांचा दुसरा ग्रंथ. आणि जगप्रसिद्ध असलेला ‘लीलावती’ हा त्यांचा तिसरा ग्रंथ! ‘लीलावती’

या ग्रंथात अंकगणित, क्षेत्रमापन, घनमापनश्रेढी, अंकपाश, पाक्षिक आणि सर्वांशिक विपर्यय हे विषय आहेत.  लीलावती ही त्यांची लाडकी कन्या. यासंबंधी कथा अशी की, भास्कराचार्य हे गणिती होते तसेच ते ज्योतिषीही होते आणि आपली कन्या विवाहानंतर विधवा होणार हे त्यांना कळले होते म्हणून त्यांनी असा मुहूर्त काढला की ज्यावर विवाह झाला असता तिला सौभाग्य लाभेल पण नियती अशी की तिच्या मस्तकावर पडलेल्या अक्षता ओघळून घटिकापात्रात पडल्या आणि ते घटिकापात्र दोन पळेआधीच बुडाले आणि नेमका तो क्षण तिचा वैधव्याचा मुहूर्त होता आणि खरोखरीच लीलावती वर्षभरात विधवा झाली! या लाडक्या आणि दुर्दैवी कन्येसाठी त्यांनी ग्रंथाला ‘लीलावती’ हे नाव दिले. गणिताच्या इतिहासात आपल्याबरोबर तिलाही त्यांनी स्थान दिले. ‘लीलावती’तील सर्व विषयांचा उल्लेख करणे शक्य नाही पण अनेक विषय त्यात आहेत. त्याच्यावर अनेक टीकाही उपलब्ध आहेत. भास्कराचार्य उत्तम कवीही होते. पावसाळ्यात राजहंस मानससरोवराकडे जातात ह्यावरून त्यांनी काव्यात एक गणित रचले, ‘सुवर्ण गणित’ यात त्यांनी सुवर्ण धातूबद्दल किती किती लिहिले आहे, शुद्धतेपासून किमतीपर्यंत! हिंदू धर्माच्या साऱ्या श्रद्धा आणि कल्पना भास्कराचार्यांच्या गणितातून डोकावतात. ते दोन अर्थी काव्याची रचना करतात. ‘लीलावती हा गणिती ग्रंथ असला तरी ते एक श्रेष्ठ काव्यही आहे!

बाराव्या शतकातच भारतातील गणिताला ओहोटी लागली. नवीन गणित काही लिहिले गेले नाही. जे कोणी गणिती या काळात होते त्यांनी नवीन काही न शोधता जुन्या ग्रंथांवर टीकाच लिहिली.यातील काही नावे अशी – महादेव पहिला, महेंद्रसुरी, दामोदर, गणेश दैवज्ञ, नृसिंह धुंडिराज, कृपाराम, रंगनाथ, दिनकर, ज्ञानराज, सूर्य, अनंत प्रथम, महादेव दुसरा, लक्ष्मीदास, कृष्ण दैवज्ञ, मुनीश्वर रंगनाथ, दिवाकर नृसिंह, कमलाकर, असे आणखीन काही!

असे असले तरी पुढच्या काळात काही जणांनी गणिताचा झेंडा फडकवत ठेवला आहे. ते म्हणजे जयसिंह, चिंतामणी दीक्षित (१७३६) नारायणदादा भातगावकर(१७३८) , विनायक उर्फ केरो नाना छत्रे (१८२४) रघुनाथाचार्य चिंतामणी (१८२८) बापुदेव शास्त्री ( १८२९) कृष्णशास्त्री गोडबोले( १८३१) मल्हार नारायणशास्त्री थत्ते ( १८४०) व्यंकटेश बापूजी केतकर (१८५३) शंकर बाळकृष्ण दीक्षित(१८५३) विनायक पांडुरंग खानापूरकर ( १८५८) सुधाकर कृपाल द्विवेदी (१८६०) शिवकर बापूजी तळपदे ( १८६४)

त्यानंतर THE GREAT श्रीनिवास रामानुजन (१८८७)! त्यांची स्मरणशक्ती, बालपणापासून अभ्यासाचा ध्यास गणिताचा नाद यातून त्यांनी पृथ्वीची लांबी रुंदी मोजली, परिघ मोजला! रामानुजन यांनी काय शोधले यासाठी हा ग्रंथ मुळात वाचायला हवा ..

लोकमान्य टिळक हेही गणितीच होते! ‘ वेदिक क्रोनोलोजी अॅंड वेदांग ज्योतिष हा त्यांचा ग्रंथ त्यांच्या  मृत्युनंतर प्रसिद्ध झाला. ‘ओरायन’ हा त्यांचा ग्रंथ, ओरायन हे तारकापुंजाचे नाव आणि मृगशीर्ष पुंजाच्या  अग्रायण या नावावरून ओरायन आले आहे. अखेरीस डॉ. जयंत नारळीकर यांच्या विश्व उत्पत्तीच्या संशोधनाची  माहिती आणि नारळीकरांचे गणितातील योगदान याचा आहे!

हुश्श .. हा अत्यंत त्रोटक परिचय आहे ... कदाचित वाचूनही दमला असाल .. पण हे वाचून वाचकांत उत्सुकता निर्माण झाली तर मला आनंद वाटेल!             

शेवटचे एक भरतवाक्य.. पृथ्वीवरील एकूण वाळूच्या सर्व कणांची मोजदाद करता येईल, असे लेखक म्हणतात!!! ८४ चा २८ घात म्हणजे १६४ अंकी संख्या तिचा शीर्षप्रहेलिका असा उल्लेख आहे !

 

Sunday, January 11, 2026


पुस्तक परिचय (१) 

आकारावरून  आणि प्रकाशनाच्या नावावरून हे पुस्तक लहान मुलांसाठी आहे, असे वाटेल; पण प्रत्यक्षात हे पुस्तक सर्वांनी वाचावे असेच आहे.
दुसऱ्या महायुद्धाशी संबंधित असंख्य पुस्तके अनेक भाषांत आहेत, हेही पुस्तक त्याच संबंधात असून देखील अत्यंत वेगळे आहे.
ज्यू लोकांवरील अनन्वित अत्याचार हे दुसऱ्या महायुद्धाचे व्यवच्छेदक लक्षण ! ज्यू लोकांचे जे हत्याकांड झाले त्याला हॉलोकॉस्ट असे म्हणतात. अनेक छळ छावण्या, गॅस चेम्बर्समधून जवळपास ६० लक्ष लोकांना ठार करण्यात आले. महायुद्ध संपल्यावर या हत्याकांडातून वाचलेल्या लोकांनी आपल्या  कहाण्या जगासमोर मांडल्या, या हत्याकांडात १५लक्ष लहान मुले बळी गेली..
युद्धानंतर अनेक देशांत या हॉलोकॉस्टसंबंधी अनेक संग्रहालये उभारण्यात आली. जपानमध्ये एका सहृदयी गृहस्थाने ' टॉकीयो  हॉलोकॉस्ट एज्यूकेशन रिसॉर्स सेंटर' उभे केले जेणेकरून लोकांना खरी माहिती मिळावी. येथे एक संग्रहालयदेखील होते आणि या संग्रहालयाची देखरेख करणारी फ्यूमिको इशिओका ही अतिशय धडपडी मुलगी होती. आपल्या संग्रहालयात हॉलोकॉस्टसंदर्भात काही वस्तू हव्यात  यासाठी तिने जगभरच्या संग्रहालयात, ‘ काही वस्तू पाठवा ’ अशी विनंती करणारी पत्रे ईमेल पाठविले. आणि एके दिवशी छळ छावणी म्हणून कुप्रसिद्ध असलेल्या ओउसश्विट्स या शहरातील संग्रहालयाकडून एक पार्सल आले ज्यात होता एक पायमोजा, बूट,, लहान स्वेटर आणि विषारी वायूचा रिकामा डबा! आणि एक सूटकेस! त्या सूटकेसवर नाव होते हॅना ब्रॅडी 1१६ मे १९३१ .खाली जर्मन भाषेत उल्लेख होता ' अनाथ '! ( WaisnKInd)
ही सूटकेस जेव्हा जपानच्या संग्रहालयात आली तेव्हा फ्यूमिकोसह सर्वच जणांना ' ही हॅना कोण?' असा प्रश्न पडला आणि हिचे काय झाले असेल असेही वाटले. फ्यूमिकोने  हॅनाचा शोध घेण्याचे ठरवले.
हॅना ( वय ९)आणि तिचा भाऊ जॉर्ज (वय ११) हे आईवडिलांसह चेकोस्लाव्हाकियातील एका लहान गावात राहत होते. युद्ध सुरु झाल्यावर काही दिवसांनी जर्मन सैनिकांनी या मुलांच्या आईवडिलांना पकडून नेले. या लहान मुलांना कळलेच नाही की त्यांना कुठे नेले. गावातील एक सहृदयी लुडवीक दाम्पत्याने या दोन लहान मुलांचा सांभाळ केला  पण काही दिवसांनी या दोन्ही मुलांनाही पकडण्यात येते आणि लहान मुलांसाठी असलेल्या छावण्यात ठेवण्यात नेले. तिथे या दोघांची ताटातूट झाली आणि ही लहानगी हॅना आपला भाऊ कुठे गेला म्हणून शोध घेत छावणीत हिंडत असे.. काही दिवसांनी या छावणीतील सर्वांना दुसऱ्या छावणीत नेण्यात आले  तेव्हा रेल्वे स्टेशनवर हॅनाला तिचा भाऊ क्षणभर दिसला  पण भेट झाली नाही. पुढे त्या दुसऱ्या छावणीत हॅनाचा दुर्दैवी अंत झालाअशी ही सर्व हृदय पिळवटून टाकणारी कथा ! पण ही कथा इथेच संपत नाही.....

जपानच्या संग्रहालयात जेव्हा हॅनाची सूटकेस आल्यावर तिथली चुणचुणीत फ्युमिको, हॅनाचा शोध घेण्यासाठी जिवाचे रान केले.  अनेक प्रयत्नानंतर ती एका अशा एका  ठिकाणी येऊन पोहोचते जिथे
0000 ज्यू कैद्यांची माहिती असते. त्यात तिला हॅना ब्रॅडी आणि तिचा भाऊ जॉर्ज ब्रॅडी या दोघांची नावे दिसली आणि हॅनाच्या तसेच आणखीन कित्येक नावापुढे बरोबर अशी खूण केलेलीही दिसली. अधिक चौकशीअंती तिला कळले की ज्यांच्या नावापुढे टिक मार्क आहे त्या सर्वांना मारण्यात आले आहे! तिला खूप वाईट वाटते की हॅनाला मारण्यात आले पण जॉर्जच्या नावापुढे मात्र तशी खूण नव्हती! म्हणजे हॅनाचा भाऊ जिवंत आहे!
आता शोध सुरू होततो जॉर्जला शोधण्याचा, आणि तिला जॉर्ज सापडतो कॅनडामध्ये! हर प्रयत्नाने ती जॉर्जशी संपर्क साधते आणि त्याला टोकियोला आणते. तो आता 72 वर्षांचा असतो! तो येतो, जपानमधल्या मुलांशी बोलतो आणि जेव्हा सूटकेस पाहतो तेव्हा तो म्हणतो की हे सूटकेस हॅनाची नाही! झाले होते असे की हॅनाला मारण्यापूर्वी तिच्या सामानाचे फोटो काढलेले असतात आणि संग्रहालय बनवताना त्या फोटोवरून ती सूटकेस बनवलेली असते.

अशी ही हृदय पिळवटून टाकणारी कथा, मला हे एवढे लिहितानाही अश्रू आवरत नव्हते. म्हणून त्यातील काही प्रसंग लिहिण्याचे टाळले.

 हॅनाला जेव्हा लहान मुलांच्या छळ छावणीत होती तिथे या लहान मुलांकडून काही कामे करून घेतली जात. खायला एखादा पाव किंवा पचपचीत सूप दिले जाई.  हॅनाची भूक भागात नसे तेव्हा तिथलाच एक दयाळू माळी तिला एखादा टॉमॅटो किंवा असेच काहीतरी खायला देई. तिथे हॅना जमेल तेव्हा चित्रे काढायची. ती चित्रेही या टोकियोच्या संग्रहालयात आहेत.मी हे सर्व अत्यंत त्रोटक लिहिले आहे कारण त्यातले प्रसंग लिहिले तर वाचकांच्या डोळ्यातही अश्रू येतील. पुस्तकात फोटो आहेत तेही पाहून मन गलबलून जाते. पुस्तक प्रेमींनी हे पुस्तक आवर्जून वाचावे.  

वाचकांपैकी कोणी जर टोकियोला गेलात तर आवर्जून या संग्रहालयाला भेट द्या. मानवतेच्या इतिहासातील एक अत्यंत काळाकुट्ट अध्याय म्हणजे दुसरे महायुद्ध होय!

 

 

 


Wednesday, January 3, 2024




 चलो जम्मू .. !।

डोंबिवलीतील ‘हम ट्रस्ट’ कडून जम्मू आणि आसपासच्या राजौरी, पुंछ येथील  ‘विद्या भारती’ आणि ‘भारतीय शिक्षा समिती’ या संस्थांच्या मार्फत जे समजोपयोगी प्रकल्प चालविले जातात त्या प्रकल्पांना भेट देण्यासाठी ७ ऑक्टोबर २०२३ ते १४ ऑक्टोबर २०२३ असा दौरा आयोजित केला होता.. पावगीसाहेबांच्या सूचनेवरून मी या दौऱ्यात  सहभागी झालो आणि एक अतिशय छान अनुभव माझ्या पोतडीत जमा झाला, त्याचेच हे वर्णन ! आम्ही  १६ जण  होतो’

 सकाळी १०.१५ च्या विमानाने दुपारी १ च्या सुमारास जम्मूला पोहोचलो..तिथे कार्यरत असलेले संगीता आणि मनोज नशिराबादकर यांची भेट झाली आणि त्यांनी आम्हाला .’भारतीय शिक्षा समितीशी संलग्न असलेल्या ‘सेवा भारती’च्या कार्याची माहिती दिली.

वाघा बॉर्डर बहुतेक सर्वांना माहीत आहे पण सुचेतगड सीमा फारशी माहीत नाही. सुचेतगड येथे भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये केवळ तारेचे कुंपण आहे अर्थात सीमा सुरक्षा चोकी आहेच आणि वाघा सीमेवर ज्याप्रमाणे आपल्या जवानांचे  संचालन होते त्याचप्रमाणे येथेही अतिशय सुंदर संचालन होते, जवानांनी कमालीच्या कौशल्याने विविध प्रकार दाखवले एवढेच नव्हे तर लष्करातील  श्वान पथकही तिथे होते आणि दोन श्वानांनी सुंदर कसरती केल्या. हे सगळे पाहणे हा अवर्णनीय  आनंद होता. जम्मूतील सुप्रसिद्ध रघुनाथ मंदिर हे १८७३ मधील असून अतिशय देखणे आणि प्रचंड मोठे आहे. मंदिराच्या भिंतीवर काश्मीरच्या इतिहासासंबंधी सखोल माहिती असलेले फलक आहेत.

जम्मू येथे सर्वात महत्त्वाची भेट म्हणजे पंकजादीदी यांची. पकंजादीदी मूळच्या दक्षिण भारतातील पण फारच लहान वयात त्या नागपूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सहभागी झाल्या आणि समाजसेवेचे कंकण हाती बांधून संघाच्या आदेशावरून  जम्मूत काम करण्यासाठी आल्या आणि अनेक मुलांच्या त्या आई झाल्या. दहशतवाद्यांच्या गोळीबारात ज्यांचे पालक मारले गेले अशा अनेक मुलामुलींचे पालकत्व पंकजादीदी यांनी स्वीकारले आहे. “ अदिती सेवा प्रतिष्ठान” ही त्यांची संस्था असून त्यामार्फत त्या हे उदात्त कार्य करीत आहेत. त्या मुलांची केवळ राहण्याची व्यवस्था त्या करीत नाहीत तर त्यांच्या शिक्षणाची व्यवस्थादेखील त्या बघतात. आम्ही गेलो तेव्हा तिथे बारा तेरा जण होते आणि त्यात एम.ए. करणारी  एक मुलगी होती जिला लहानपणीच गोळी लागली होती. पायाभूत कार्य करणाऱ्या पंकजादीदी या एकट्याच नाहीत तर आणखीनही बरेच जण आहेत.

जम्मूपासून १९ किलोमीटर दूर भारत पाकिस्तान सीमेच्या आत पाच सात  किलोमीटर अंतरावर मुलींसाठी “दृष्टी” नावाचे  वसतिगृह होते, ७ ते १७ वयोगटातील जवळपास १९ मुली होत्या. या सर्व मुली जम्मूच्या आसपास राहणाऱ्याच पण आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील होत्या. या वसतिगृहात त्या मुलींची शिक्षणासह  व्यवस्था केली जाते. इथे कॉम्प्युटर रूम होती, मुलींना खेळण्यासाठी आत आणि बाहेर साधने होती, झोपण्यासाठी बंक बेड होते, मुख्य म्हणजे मोठ्या मुली लहान मुलींची काळजी घेतात. राजौरी येथेही अशा प्रकारचे मुलांचे वसतिगृह होते . एका अतिशय चुणचुणीत मुलीने आम्हाला या वासतिगृहाची सर्व माहिती सांगितली. एवढेच नव्हे तर प्रार्थनेची वेळ झाली तसे तिने अत्यंत नम्रपणे आपण आधी प्रार्थना करू असे सांगितले आणि क्षणात सर्व मुली प्रार्थनेला जमल्या.

अतिरेक्यांची जास्त भीती आणि दहशत असलेला भाग म्हणजे राजौरी आणि  पूंछ, तिथल्या डंगरी  या गावातील एका  शाळेला आम्ही भेट दिली. भारतीय शिक्षा समितीमार्फत चालविली जाणारी  ही  शाळा सर्व साधनांनी युक्त आहे,  प्रयोगशाळा, ग्रंथालय वगैरे सोयी आहेत; दहशत आहेच, पण तरीदेखील शाळा निर्धाराने सुरू आहे. कौशल्य विकास शिकवले जाते..  इथल्या शिक्षकांना अत्यंत कमी पगार आहे त्यामुळे शिक्षक मिळणे, दुर्गम प्रदेश या अडचणीतून निष्ठावान कार्यकर्ते शाळा नेटाने चालवीत आहेत.

या शाळेनंतर दोन कुटुंबांना आम्ही भेटलो. काही महिन्यांपूर्वी या दोन कुटुंबतील तीन तरुण मुलांना अतिरेक्यांनी समोरून गोळ्या घालून मारले होते. हे ऐकताना डोळ्यात पाणी  दाटले होते तर मनात संताप .. त्या कहाण्या ऐकताना अंगावर काटा येत होता..

राजोरी येथे नतमस्तक व्हावे असे एक ठिकाण म्हणजे बलिदान भवन!  १९४७ सलो फाळणी झाल्यावर या गावावर गुंडांनी हल्ला केला तेव्हा प्रतिकारात पुरुष मारले गेले आणि त्यांच्या स्त्रियांनी गुंडांच्या हाती लागू नये म्हणून विहिरीत जीव दिला , त्याची आठवण म्हणून इथे बलिदान स्तंभ उभारला  आहे, त्यावेळच्या दंगलीतील वाचलेली त्यावेळची एक मुलगी आता जवळपास ८५ वर्षांची आम्हाला  भेटली. तिला अजूनही सर्व आठवते.       

पूंछ येथील भारत पाकिस्तानी सीमारेषेवर पोहोचलो. दोन किलोमीटर दूर थांबलो होतो. या सीमारेषेवरून दोन्ही देशात स्थानिक मालाचा थोडाफार व्यापार चालतो. येणाऱ्या जाणाऱ्यांची  तपासणी येथे झाल्यावर त्यांना प्रवेश दिला  जातो.  ( LOC TRADE CENTER) सीमारेषेपासून थोड्या अंतरावर आजोटे युद्ध स्मृतिस्थळ आहे. अतिशय सुंदर बांधलेलें हे स्थळ  स्फूर्तिदायक आहे. आपली छाती अभिमानाने भरून येते.  तिथल्या मेघडंबरीत बसून आम्ही सावरकरांचे “जयोस्तुते “ हे मातृभूमीच्या  स्तवनाचे उच्च रवात  गायन केले. त्या स्थळावर उभारलेला भारतीय तिरंगा पाकिस्तानातूनही दिसतो!

इथल्या “रिवर व्यू” या हॉटेलमध्ये आम्ही उतरलो होतो त्याचे संबंधित रवी शर्मा हे इथले कार्यकर्ते आहेत. ते आमच्याबरोबर होते. त्यांचे बंधु सुधीर शर्मा यांनी आम्हाला “रोहित शर्मा मेमोरियल ट्रस्ट” येथे नेले. ज्यांच्या नावाने हा ट्रस्ट स्थापन केला आहे ते रोहित शर्मा हे अतिरेक्यांना कंठस्नान घालून हुतात्मा झाले होते. या ट्रस्टची स्थापना श्री अली आणि त्यांची पत्नी शाहिस्ता तबस्सुम यांनी केली असून इथे पंतप्रधान कौशल्य विकास योजना,   शिलाई शिक्षण दिले जाते. श्री अली यांना या कार्यासाठी अनेक वेळा धमक्या आल्या आहेत. तिथेच पुलित्स नदीच्या काठावर असलेल्या एक सेंटरवर काही मुली शिलाई काम शिकत होत्या. ती शिलाई मशीन्स हम ट्रस्टनेच दिलेली होती.

एक महत्त्वाचे ठिकाण म्हणजे आखरोट येथील विस्थापित  पंडितांची कॉलनी.! १९९० ला काश्मीरमधून विस्थापित झालेल्या पंडितांसाठी ही कॉलनी उभारण्यात आली होती. आम्हाला  त्या पंडितांपैकी काही जण भेटले, त्या कॉलनीच्या हॉलमध्ये एक फिल्म दाखविण्यात आली जी “काश्मीर फाइल्स “ पेक्षाही करूण  होती. ज्या पंडितांनी हे सर्व प्रत्यक्ष भोगले ती माणसे  आमच्या आसपास होती. त्यांची घरे त्यांच्या डोळ्यादेखत जाळली गेली, अत्याचार  केले गेले ; ते सर्व त्या फिल्ममध्ये होते ते पाहताना  अंगावर शहारे येतात.      

बाकी जम्मू आणि आसपासची बरीच मंदिरे रामेश्वर मंदिर, कृष्ण मंदिर, काशी विश्वेश्वर मंदिर,मार्गात लागलेली दोन सुंदर  प्राचीन शंकर मंदिरे, बुढा अमरनाथ, नवग्रह मंदिर असे सर्व [याहून तिथला सुंदर निसर्ग आणि मनाला चटका लावणारे वास्तव अनुभवले.

डोंबिवलीतील मनोज आणि संगीत नशिराबादकर दाम्पत्य मागील काही वर्षे तिथे कार्यरत आहे. जम्मू काश्मीरला भेट देणाऱ्या मंडळींनी विद्या भारती आणि भारतीय शिक्षा समिति यांनी चालविलेल्या कार्यासही आवर्जून भेट द्यावी.       

 

   .           .

 

 

 

 

 

Thursday, December 21, 2023



लेखनाचे सर्वच प्रकार मला आवडतात, म्हणून माझ्याकडून कादंबरी आणि कथालेखन आणि ललित लेखन झाले.

२०१९ मध्ये मेहता पब्लिशिंग हाऊस यांनी इंग्रजी कादंबऱ्यांचे अनुवाद करण्याची संधी दिली आणि

रॉबर्ट क्रेस यांच्या चार कादंबऱ्या मी अनुवादित केल्या. त्यानंतर मेहता पब्लिशिंग हाऊस यांनी पुनः एकदा एक मोठी संधी दिली; ती म्हणजे माध्यमतज्ज्ञ नलिन मेहता यांनी लिहिलेल्या

MODI – AND THE MAKING OF WORLD’S LARGEST POLITICAL PARTY  

THE NEW B J P ; या ८५० पृष्ठांच्या बृहत ग्रंथातील ६०० पृष्ठांचे अनुवाद करण्याची जबाबदारी सोपवली. आधी मी एवढे मोठे काम स्वीकारण्यास काहीसा अनुत्सुक होतो; परंतु माझी पत्नी अनघा हिने मला प्रोत्साहन दिले आणि, एक आव्हान’ म्हणून मी हे काम स्वीकारावे असे सांगितले. तिच्या आग्रहाखातर आणि प्रोत्साहनाने मी हे काम स्वीकारले.

रोज सकाळी ५.३०, ५.४० च्या दरम्यान माझे काम सुरू व्हायचे आणि दिवसभरात ते सुरूच राहायचे; मला लागणाऱ्या सर्व गोष्टी ती टेबलवर आणून द्यायची. ‘किती काम झाले’ याची रोजच चौकशी करायची एवढेच नव्हे तर मला कंटाळा येऊ नये म्हणून माझ्यासमोर बसून तीही ‘गजानन विजय’ गुरुचरित्र’ आणि ;श्रीपाद श्रीवल्लभ’ या मोठ्या पोथ्या स्व हस्ताक्षरात लिहीत बसायची. रात्री अकरापर्यंत हे काम चालायचे. साधारण चार महिने झाले आणि माझे अनुवादाचे  काम संपत आले होते आणि तिच्या पोथ्याही लिहून झाल्या असताना अचानक ती २ जुलैला आजारी  पडली आणि ६ जुलैच्या पहाटे तिचे दू:खद निधन झाले. माझ्यावर हा असह्य असा आघात होता पण त्यातून सावरून केवळ तीची इच्छा म्हणून मी अनुवादाचे काम पूर्ण केले आणि मेहता पब्लिशिंग हाऊस त्यांच्याकडे पाठवून दिले. आणि आज २० डिसेंबर २०२३ रोजी सुंदर रीतीने छापलेल्या या अनुवादाच्या  प्रती माझ्या हातात पडल्या.

जिच्या प्रोत्साहनाने हे काम स्वीकारले, जिने मला साथ दिली ती मात्र पूर्ण झालेले काम पाहायला आज नाही, ही खंत आणि सल माझ्या मनात कायमची राहील. अनुवंडकाचे मनोगत म्हणून ही साहित्यकृती

तिलाच अर्पण करण्याची माझी विनंती मान्य केली गेली आणि तशी अर्पण पत्रिका पुस्तकात आहे.    

सुरुवात करणारा शेवटपर्यंत नसावा, जीवनात अपूर्णता राहावी, हीच तर नियती !         

Tuesday, December 12, 2023

 




मध्यंतरी एक विडिओ बराच व्हायरल झाला  होता. मुंबईहून द्रुतगती मार्गाने पुण्याला जाताना खालापूर टोल नाक्यानंतर लागणाऱ्या मॉलमधील पुस्तकाच्या दालनाचा तो व्हिडिओ होता.

त्या व्हीडिओमध्ये मराठी  मालिकेतील एक अभिनेते श्री मिलिंद गवळी या मॉलमधील पुस्तकाच्या दालनासंबंधीची माहिती सांगून, असे आवाहन करीत होते की पुण्याला जाणाऱ्या लोकांनी आवर्जून या पुस्तक दालनाला  भेट द्यावी. असे सांगताना ते त्यांच्या हातातील चार पुस्तके दाखवत होते आणि त्यात मी अनुवादित केलेले “आर्ट ऑफ वोर “ हे   पुस्तक होते. तो व्हिडिओ माझ्याही पाहण्यात आला होता.

आता परवा ९ डिसेंबरला  मी माझ्या मुळीसह पुण्याला जाताना त्या मॉलमध्ये गेलो आणि मी लगेच व्हीडिओमध्ये दाखविण्यात आलेल्या पुस्तक दालनात गेलो. पूर्वी मी फक्त जिन्याच्या बाजूला असलेली पुस्तके चाळत असे पण या वेळेस वरच्या मजल्यावर गेलो. तिथे असंख्य पुस्तके होती ती. सर्व पुस्तके बघून झाल्यावर खाली आलो आणि तिथे पुस्तके विक्री करत असलेल्या  गृहस्थांची +वीरेन्द्र गुप्ता यांची ओळख करून घेतली. गुप्ताजी  केवळ पुस्तक विक्रेते नाहीत तर ते पुस्तकप्रेमीही आहेत आणि अनेक पुस्तकांची माहिती  त्यांना आहे. मी  व्हीडिओमाधील पुस्तकाचा अनुवादक  आहे असे कळल्यावर त्यांनी अत्यंत आदराने मला बसावयास सांगितले. माझ्या अन्य पुस्तकांची चौकशी केली . निघताना मी गुप्ताजींबरोबर फोटो  घ्यावा अशी विनंती केली तर त्यांनी मला श्रीमंद भागवद्गीतेची प्रत   भेट देताना फोटो काढावा असे सुचवले आणि तो फोटो घेतला गेला.

मित्रांनो, आपण अनेकदा जेव्हा कधी पुण्यास जाल तेव्हा  आवर्जून या मॉलमधील पुस्तक दालणाला भेआवर्जून  आणि पुस्तकपरेमी असलेल्या श्री वीरेन्द्र गुप्ता यांनाही भेटा.      






















Saturday, August 5, 2023

 आपल्याला नोंदी : अहमेदनगऱ् १

 

अहमदनगर या शहराशी माझा तसा कधी संबंध आला नव्हता. तो आला ‘कांकरिया कार्डक’ या

बालनाट्य क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेमुळे. या संस्थेने नुकतीच २५ वर्षे पूर्ण केली आणि त्या निमित्ताने त्यांना एक स्मरणिका प्रकाशित करावयाची होती आणि त्या स्मरणिकेच्या संपादनात साहाय्य आणि मुद्रित शोधन  करावे अशी विनंती माझे नगरकर मित्र जयंत एलुलकर यांनी केली आणि या निमित्ताने माझा नगरशी संबंध आला.

काना, मात्रा, वेलांटी नसलेले गाव अशी नगारची  एक ओळख आहे. तसेही ते गाव अत्यंत रुक्ष आहे असा माझा समज होता. प्रा. मधुकर तोरडमल, सदाशिव अमरापुरकर असे नाट्यकर्मी या गावाचे आहेत अशी ,माहिती होती.

‘रं ग मं च’ या स्मरणिकेचे काम करताना, त्यातील लेख वाचताना लक्षात आले की, कांकरिया करडकाचे डॉ. प्रकाश कांकरिया आणि डॉ. सुधा कांकरिया यांनी फार मोठे काम केले आहे. मागील पंचवीस वर्षे बालनाट्य स्पर्धा आयोजित करणे, तेही कोणाकडून आर्थिक साहाय्य न घेता ही खरोखरीच रंगभूमीची सेवाच म्हटली पाहिजे. मागील पंचवीस वर्षात निदान काही हजार कलाकार या रंगमंचावर येऊन गेले आहेत; आणि आज त्यातील अनेक जण विविध मालिकांतून तसेच हिंदी, मराठी चित्रपटांतून तसेच ओटीटी पटलावर, काही दिग्दर्शक म्हणून काही तंत्रज्ञ म्हणून  आपल्या कलेचे दर्शन घडवित आहेत. कांकरिया करंडकाच्या रंगमंचावर जी लहान पावले पडली त्यांचा मोठा ठसा पुढे कलक्षेत्रावर        

उमटला त्याचे सर्व श्रेय कांकरिया या कलासक्त दाम्पत्याला जाते. स्मरणिकेतील लेखातून

नगरच्या अनेक कलाकारांचा परिचय होतो. तसेच प्रकाश योजना, रंगभूषा, वेशभूषा, दिग्दर्शन, संहिता, सादरीकरण या अंगाने आणि एकूणच बालनाट्य चळवळीची, त्याच अनुषंगाने महाराष्ट्रातील बालनाट्य चळवळीचे अध्वर्यू रत्नाकर मतकरी, सुद्धा करमरकर, ग्रीप्स चळवळ अशी अनेक प्रकारची माहिती मिळते त्यामुळे ही स्मरणिका, संस्मऱणिका झाली आहे असेच म्हणावे लागेल. बालनाट्य चळवळीची विविधांगी माहिती आणि महाराष्ट्रातील बालनाट्य शिबिरे आणि स्पर्धा घेणाऱ्या संस्थांची सूची असल्यामुले या संस्मऱणिकेला एका संदर्भ ग्रंथाचे स्वरूप आले असून ऐतिहासिक दस्तऐवज म्हणूनही उल्लेख करता येईल.

महत्त्वाचे म्हणजे रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने कांकरिया दांपत्याने शहरातील १०१ कलाकारांचा सत्कार त्यांच्या घरी जाऊन केला आणि त्यांच्या प्रती समाजाला वाटणारी कृतज्ञता व्यक्त केली.

स्मरणिकेचे प्रकाशन ७ मे रोजी नगरच्याच माउली हॉलमध्ये अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत ज्येष्ठ कवी श्री फ. मु  शिंदे यांच्या हस्ते झाले.   

डॉ. सुधा  कांकरिया या स्वत: नृत्यांगना आहेत. सलग बारा तास शास्त्रीय नृत्य करण्याचा विकर्म त्यांच्या नावावर आहे. डॉ. प्रकाश आणि डॉ. सुधा  हे दोघेही नेत्रतज्ज्ञ आहेत आणि त्यांचा मुलगा आणि सूनही नेत्रतज्ज्ञ आहेत. आपल्या व्यवसायास अनुसरून ही मंडळी विनामूल्य शिबिरे आयोजित करतात. नगरसारख्या काहीशा रुक्ष वातावरण असलेल्या शहरात कांकरिया दांपत्याने कलेचे नंदनवन फुलविले आहे असेच म्हणावे लागेल.

आणि खरोखरीच अहमदनगरमध्ये कांकरिया दांपत्याने ‘साई बन’ येथे १०० एकर जमिनीवर नंदनवन उभे केले आहे. नगरच्या बाहेर १०० एकर जमीन १९९२ साली घेऊन, जिथे  शब्दश: माळरान होते ,

गवताचे पातेही नव्हते तेथे डॉ. प्रकाश यांनी औद्योगिक क्षेत्रातील सांडपण्यावर प्रक्रिया करून, सर्व जमिनीची यथायोग्य मशागत करून तेथे आज दाट झाडी असलेले जंगल, एक विस्तीर्ण तळे, त्यात नौका विहाराची सोय, झिपलाइन, ध्यानगृह, सूर्योदय आणि सूर्यास्त पाहण्याच्या जागा, कठपुतळीचा खेळ असे अनेक उपक्रम आहेत. या सर्व उपक्रमाचे म्हणजे  शुष्क माळरान ते आजचे ‘साई बन’ येथपर्यंतच प्रवास दर्शविणारी फोटो गॅलरीही तिथे आहे. मुख्य म्हणजे अतिशय सुंदर आणि उत्तम ध्वनि व्यवस्था असलेले देखणे अॅम्फी थिएटर आहे. आजूबाजूला पसरलेल्या निसर्गरम्य वातावरणात कोणत्याही कलाकाराला, कलावंताला इथे कार्यक्रम करायची इच्छा होईल. ८ मे २०२३ या दिवशी डॉ. प्रकाश आणि डॉ. सुधा यांनी, रौप्य महोत्सवाच्या आयोजनात सहभागी असलेल्या सर्वांच्या सन्मान साई बन येथेच केला आणि त्यानंतर स्वादिष्ट भोजनाचा रुचकर अनुभव, म्हणजे आईस्क्रीमवर विराजमान झालेली चेरीच! आवर्जून अनुभव घ्यावा असे हे साई बन आहे.

कांकरिया दांपत्याच्या कला आणि नाट्यप्रेमामुळे हे सर्व घडून आले आणि  जयंत येलुलकर यांनी हे घडवून आणले त्यांचे  आभार                    

                   

     

 नोंदी: अहमदनगर २

कांकरिया करंडकाच्या रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने अहमदनगर जाणे झाले. अहमदनगर येथे माझी आते बहीण डॉ. लीला गोविलकर राहतात. माझे पुण्यात अनेकदा जाणे झाले /होते पण पुण्यापासून जवळ असलेल्या नगरला जाणे झाले नाही आणि त्यामुळे डॉ. लीला गोविलकर यांची भेट कित्येक वर्षांत झाली नाही. आता कांकरिया करंडकाच्या निमित्ताने जातोय तर त्यांची भेट घ्यायचीच असं म्हणत त्यांना फोन केला आणि अपेक्षेप्रमाणे त्यांनीही अतिशय प्रेमाने त्यांच्याच बंगल्यात मुक्कामास  यायला सांगितले.

डॉ. लीला गोविलकर, वय वर्षे फक्त ८५ , ( म्हणून मी ‘अहो जाहो’ असा उल्लेख करतो )असूनही शारीरिक आणि बौद्धिकदृष्ट्या तेज, तल्लख ! त्याचाच अनुभव इथे मांडण्याचा प्रयत्न.

सकाळी त्यांच्या बंगल्यात पहिल्या मजल्यावर असलेल्या गोलाकार बाल्कनीत लीलाताईंशी गप्पा रंगल्या. आधी मुंबईत आणि नंतर अहमदनगरला अध्यापनाचे  काम करणाऱ्या लीलाताईंना  स. ग. मालशे, अ. का. प्रियोळकर यांच्यासारख्या गुरूंचे मार्गदर्शन लाभलेले. भाषा विज्ञान या विषयात त्यांनी डॉक्टरेट जरी केली असली तरी त्यांना सगळ्याच विषयात रस होता. त्यांच्या टेबलावर एकाच वेळेस तीन पुस्तकांची कामे पडलेली होती. लिहून झालेले बरेचसे फूलस्केप तिथे होते. लीलाताईंचे ‘ज्ञानेश्वरीचे वाङमयीन वैभव हे पुस्तक मी वाचले होते. तो धागा मनात ठेवून मी त्यांना म्हटले की “ ज्ञानेश्वरीवर मुकुंदराजांच्या विवेकसिंधुचा  काही अंशी परिणाम आहे असे तुम्ही म्हणता, यात ज्ञानेश्वरांना गौणत्व येत नाही का?” त्या म्हणाल्या “ नाही, तसे होत नाही, विवेकसिंधु आणि ज्ञानेश्वरीतील काही ओव्या यात निश्चितच साम्य आहे पण अभिव्यक्तीत फरक आहे , आणि तसेही मुकुंदराज आणि ज्ञानेश्वर यांच्यात जवळपास १०० वर्षांचे अंतर आहे, या दीर्घ काळात भाषेच्या सर्वच स्वरूपात आमूलाग्र बदल होतो “ आणखीन महत्त्वाचे विधान त्यांनी केले की अनेक साहित्यिक असो, धार्मिक असो, अशा साहित्यकृतीत लोकसाहित्याचा अंश असतोच! श्रवणीयता हा मौखिक साहित्याचा लक्षणीय गुण आहे.” अशा प्रकारे सुरू झालेली ही बौद्धिक चर्चा, अनेक वळणे घेत अनेक तास चालू होती. नामदेव हे खरे सर्वसामान्यांचे संत, ज्ञानेश्वरांच्या  समकालीन असलेले नामदेव, त्यांच्याकडे ज्ञानेश्वरांनी पुढारीपण देऊन टाकले. ज्ञानेश्वर हे काहीसे वरिष्ठ वर्गाशी जोडलेले तर नामदेव यांची सर्व सामान्य लोकांशी नाळ जुळलेली. शिवाय नामदेव हे संसारी होते, तुकाराम संसारी होते, संसारात राहून परमार्थ करता येतो, महदंबा, मुक्ताई , जनाबाई, चोखामेळा, कान्होपात्रा, रामदास अशी चर्चेची रंगत वाढत ती खांडेकर, फडके, जीवनासाठी कला की कलेसाठी जीवन हा वाद; तसेच आर्य हे भरतीयच होते, भारताच्या बाहेरून आलेले नाही, इंडो आर्यन भाषा, भाषेचे संक्रमण, अवेस्ता आणि ऋग्वेद यांच्या भाषेतील साम्य, एका विष्यवारून दुसरा विषय असे कितीतरी  थांबे घेत घेत मी दीड दिवस यथेच्छ बौद्धिक आनंद घेतला.

आपल्या मताविषयी लीलाताई ठाम असतात. एक दोनदा मी थोडेसे वेगळे बोलताच  त्यांनी त्यातील वैचारिक फरक उलगडून दाखविला. सध्या त्यांच्या हातातील तिन्ही प्रकल्प त्यांना वेळेच्या मर्यादेत पूर्ण करायचे होते. त्याविषयी त्यांनी माहिती सांगितली.

त्यांच्याशी बोलताना मला सारखी दुर्गाबाईंची  आठवण येत होती. त्याही बोलण्यात ठाम असत, एक वैचारिक, बौद्धिक करारीपणा त्यांच्या चेहऱ्यावर आणि त्या बोलत असताना जाणवत असे, तोच अनुभव मला लीलाताईंशी बोलताना आला.

“बौद्धिक चर्चेने पोट काही भरत नाही तेव्हा आता जेवायला चला” अशी प्रेमळ सूचना माझ्या सौने आणि पुतणीने  केली तेव्हा आम्ही उठलो. आणि पुन्हा जेवताना तास दीड तास गप्पा रंगल्याच.

त्यांचा निरोप घेऊन निघताना असे वाटले की हा ज्ञानाचा खजिना, स्त्रोत माझ्या इतक्या जवळ असताना मागील अनेक वर्षांत त्यांची माझी भेट झाली नाही. जवळपास २५/३० वर्षांपूर्वी ‘वर्णनात्मक भाषाविज्ञान’

या संदर्भ ग्रंथाचे प्रकाशन आमच्या आरती प्रकाशनातर्फे प्रकाशित झाले होते. त्यानंतर आताची ही भेट  ! खूप काही राहिले असल्याची खंत जाणवणारी आणि बरेच काही मिळाले याचे समाधान देणारी.!

निघताना त्यांनी मला त्यांची २०२१ आणि २०२२ मध्ये प्रकाशित झालेली दोन पुस्तके “जावे संतांच्या गावा’ आणि “संत नामदेव ::अंतरंग दर्शन” ही भेट म्हणून दिली. 

एका उत्तम भेटीची उत्कट आठवण घेऊन आम्ही परतलो.

सुरेश देशपांडे / डोंबिवली                                   

   नोंदी: अहमदनगर २

कांकरिया करंडकाच्या रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने अहमदनगर जाणे झाले. अहमदनगर येथे माझी आते बहीण डॉ. लीला गोविलकर राहतात. माझे पुण्यात अनेकदा जाणे झाले /होते पण पुण्यापासून जवळ असलेल्या नगरला जाणे झाले नाही आणि त्यामुळे डॉ. लीला गोविलकर यांची भेट कित्येक वर्षांत झाली नाही. आता कांकरिया करंडकाच्या निमित्ताने जातोय तर त्यांची भेट घ्यायचीच असं म्हणत त्यांना फोन केला आणि अपेक्षेप्रमाणे त्यांनीही अतिशय प्रेमाने त्यांच्याच बंगल्यात मुक्कामास  यायला सांगितले.

डॉ. लीला गोविलकर, वय वर्षे फक्त ८५ , ( म्हणून मी ‘अहो जाहो’ असा उल्लेख करतो )असूनही शारीरिक आणि बौद्धिकदृष्ट्या तेज, तल्लख ! त्याचाच अनुभव इथे मांडण्याचा प्रयत्न.

सकाळी त्यांच्या बंगल्यात पहिल्या मजल्यावर असलेल्या गोलाकार बाल्कनीत लीलाताईंशी गप्पा रंगल्या. आधी मुंबईत आणि नंतर अहमदनगरला अध्यापनाचे  काम करणाऱ्या लीलाताईंना  स. ग. मालशे, अ. का. प्रियोळकर यांच्यासारख्या गुरूंचे मार्गदर्शन लाभलेले. भाषा विज्ञान या विषयात त्यांनी डॉक्टरेट जरी केली असली तरी त्यांना सगळ्याच विषयात रस होता. त्यांच्या टेबलावर एकाच वेळेस तीन पुस्तकांची कामे पडलेली होती. लिहून झालेले बरेचसे फूलस्केप तिथे होते. लीलाताईंचे ‘ज्ञानेश्वरीचे वाङमयीन वैभव हे पुस्तक मी वाचले होते. तो धागा मनात ठेवून मी त्यांना म्हटले की “ ज्ञानेश्वरीवर मुकुंदराजांच्या विवेकसिंधुचा  काही अंशी परिणाम आहे असे तुम्ही म्हणता, यात ज्ञानेश्वरांना गौणत्व येत नाही का?” त्या म्हणाल्या “ नाही, तसे होत नाही, विवेकसिंधु आणि ज्ञानेश्वरीतील काही ओव्या यात निश्चितच साम्य आहे पण अभिव्यक्तीत फरक आहे , आणि तसेही मुकुंदराज आणि ज्ञानेश्वर यांच्यात जवळपास १०० वर्षांचे अंतर आहे, या दीर्घ काळात भाषेच्या सर्वच स्वरूपात आमूलाग्र बदल होतो “ आणखीन महत्त्वाचे विधान त्यांनी केले की अनेक साहित्यिक असो, धार्मिक असो, अशा साहित्यकृतीत लोकसाहित्याचा अंश असतोच! श्रवणीयता हा मौखिक साहित्याचा लक्षणीय गुण आहे.” अशा प्रकारे सुरू झालेली ही बौद्धिक चर्चा, अनेक वळणे घेत अनेक तास चालू होती. नामदेव हे खरे सर्वसामान्यांचे संत, ज्ञानेश्वरांच्या  समकालीन असलेले नामदेव, त्यांच्याकडे ज्ञानेश्वरांनी पुढारीपण देऊन टाकले. ज्ञानेश्वर हे काहीसे वरिष्ठ वर्गाशी जोडलेले तर नामदेव यांची सर्व सामान्य लोकांशी नाळ जुळलेली. शिवाय नामदेव हे संसारी होते, तुकाराम संसारी होते, संसारात राहून परमार्थ करता येतो, महदंबा, मुक्ताई , जनाबाई, चोखामेळा, कान्होपात्रा, रामदास अशी चर्चेची रंगत वाढत ती खांडेकर, फडके, जीवनासाठी कला की कलेसाठी जीवन हा वाद; तसेच आर्य हे भरतीयच होते, भारताच्या बाहेरून आलेले नाही, इंडो आर्यन भाषा, भाषेचे संक्रमण, अवेस्ता आणि ऋग्वेद यांच्या भाषेतील साम्य, एका विष्यवारून दुसरा विषय असे कितीतरी  थांबे घेत घेत मी दीड दिवस यथेच्छ बौद्धिक आनंद घेतला.

आपल्या मताविषयी लीलाताई ठाम असतात. एक दोनदा मी थोडेसे वेगळे बोलताच  त्यांनी त्यातील वैचारिक फरक उलगडून दाखविला. सध्या त्यांच्या हातातील तिन्ही प्रकल्प त्यांना वेळेच्या मर्यादेत पूर्ण करायचे होते. त्याविषयी त्यांनी माहिती सांगितली.

त्यांच्याशी बोलताना मला सारखी दुर्गाबाईंची  आठवण येत होती. त्याही बोलण्यात ठाम असत, एक वैचारिक, बौद्धिक करारीपणा त्यांच्या चेहऱ्यावर आणि त्या बोलत असताना जाणवत असे, तोच अनुभव मला लीलाताईंशी बोलताना आला.

“बौद्धिक चर्चेने पोट काही भरत नाही तेव्हा आता जेवायला चला” अशी प्रेमळ सूचना माझ्या सौने आणि पुतणीने  केली तेव्हा आम्ही उठलो. आणि पुन्हा जेवताना तास दीड तास गप्पा रंगल्याच.

त्यांचा निरोप घेऊन निघताना असे वाटले की हा ज्ञानाचा खजिना, स्त्रोत माझ्या इतक्या जवळ असताना मागील अनेक वर्षांत त्यांची माझी भेट झाली नाही. जवळपास २५/३० वर्षांपूर्वी ‘वर्णनात्मक भाषाविज्ञान’

या संदर्भ ग्रंथाचे प्रकाशन आमच्या आरती प्रकाशनातर्फे प्रकाशित झाले होते. त्यानंतर आताची ही भेट  ! खूप काही राहिले असल्याची खंत जाणवणारी आणि बरेच काही मिळाले याचे समाधान देणारी.!

निघताना त्यांनी मला त्यांची २०२१ आणि २०२२ मध्ये प्रकाशित झालेली दोन पुस्तके “जावे संतांच्या गावा’ आणि “संत नामदेव ::अंतरंग दर्शन” ही भेट म्हणून दिली. 

एका उत्तम भेटीची उत्कट आठवण घेऊन आम्ही परतलो.

सुरेश देशपांडे / डोंबिवली